मायलेकरे 27
सोड सारे काम सोड सारे धंदे
तान्हेबाळ ग आक्रंदे पाळण्यांत २६१
कळवळलें ग तान्हें त्याला आधी पाज
मग करी कामकाज सूनबाई २६२
मारूं नको बाळा किती कळवळे
असें म्हणून घेतलें आजीबाईनें २६३
झाली आता रात्र झोंप म्हणे आई
चंद्र का वर येई माउलीये २६४
झाली आता रात्र झोप रे चिमण्या तान्ह्या
वर नाचती चांदण्या माउलीये २६५
आई गादी ही कोणाला साधे आंथरूण कोणाला
गादी तुझ्या जन्मदात्या साधे मला माझ्या तान्ह्या २६६
गादीवर आपण निजूं बाप्पाजी निजो खाली
वेडा कुठला म्हणे आई हळूच थापड मारी गाली २६७
कोल्हे कुई कुई आज कां तिन्ही सांजा
थंडी पडेल हो भारी जपा म्हणती बाळराजा २६८
कोल्हे कुई कुई आज का सांगा मशी
थंडी पडेल हो भारी बाळ घ्यावा म्हणताकुशी २६९
का ग हे काजवे करिती लुकलुक
पहाया श्रीमुख तुझे बाळा २७०
काजवे फुलले फुलले लाख लाख
पहाया श्रीमुख तान्हेबाळाचे २७१
कां ग झाडांवर आई काजवे नाचती
तुला ओवाळिती झाडें माडें २७२
वनदेवतांचे कांजवे जणू डोळे
बघाया माझे बाळ त्यांनी रात्र उघडीले २७३
वनदेवतांचे काजवे डोळे झाले
बाळा बघून नाही तृप्ती पुन:पुन: उघडीले २७४
आकाशात तारे काय आई म्हणताती
तुझी राजा स्तोत्रे गाती अखंडीत २७५
आकाशात तारे त्यांचे ओठ कां हालती
संगीत गाणी गाती तान्हेबाळा २७६
थुई थुई उडे कां ग कारंजे उसळे
तुझ्यामुळे उचंबळे तान्हेबाळा २७७
तान्ह्या तुझ्या भाती घालीन बोंडलें
आता नको रे बोंडले भात जेव २७८
रुप्याची ही वाटी आणि चांदीचे बोंडलें
तुझ्या आजीने धाडलें तान्हेबाळा २७९
काल माझ्या ग बाळाचें शेजी केले उष्टावण
आला होता मामा राया घांस भरवी आंगठीनं २८०