बहिण-भाऊ 24
गोर्ये भावजयी नका बोलू टाकामेकी
हळूवार भाईराया चंद्र कोमेजे एकाकी २०१
भाई ग म्हणती आल्या बहिणी भेटाया
भावजया ग म्हणती आल्या नणंदा लुटाया २०२
भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट
भावजया ग म्हणती धरा नणंदा अपुली वाट २०३
भाऊ ग म्हणती बहिणीला घाल वेणी
भावजया ग म्हणती उंदराने नेली फणी २०४
भाऊ म्हणे ग बहिणी बहिणी येई ग घरात
भावजय रागे म्हणे बर्या आहेत उंबर्यात २०५
भाऊ ग म्हणती बहिणीची भरा ओटी
भाऊजया ग म्हणती गहूं जमिनीच्या पोटी २०७
भाऊ म्हणे चोळी शिवी भावजय देना दोरा
नको हो वयनीबाई चोळीचा तो काय तोरा २०८
भाऊ चोळी शिवी भावजय डोळें मोडी
नको हो वयनीभाई चोळीची काय ती गोडी २०९
पिकलेलें लिंबू झाडाला तोलेना
गर्व झालेली बोलेना वयनीबाई २१०
माऊलीची माया काय करील भावजयी
पाण्यावीण जाईजुई सुकवील २११
आईबापांच्या राज्यात खाल्ल्या दुधावरच्या सायी
भावजयांच्या राज्यांत ताक घेण्याची सत्ता नाही २१२
अति प्रीत बहु प्रीतीची दोघेंजण
विडा रंगे कातावीण भाईरायाचा २१३
कपाळीचे कुंकू करिते ढळढळा
तुला लक्ष्मीची कळा वयनीबाई २१४
कपाळीचे कुंकू घामानें भिजलें
तुझें दैव ग चांगलें वयनीबाई २१५
वडील भावजय आईच्या समान
पित्याचा तुला मान भाईराया २१६
दसरा दिवाळी वरसाचे दोन सण
नको करू माझ्यावीण वयनीबाई २१७
भाईरायाच्या शेजारी नये राहूं ग वयनी
कोपर्यातील सार्या मनी भावजया २१८
वयनीबाई भावजयी तुझी रात्र गे सोयरी
कोंबडा परी वैरी आरवला २१९
आमच्या वयनीबाई गंगाबाई कोठे गेल्या
उन्हानें कोमेजल्या जाईजुई २२०