ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 7
थंडी पडे भारी मळे करपले
ओठ ते ग फुटले तान्हे बाळाचे ४१
थंडी पडे भारी फुटले तुझे ओठ
कोकमतेलाचें तूं बोट लाव बाळा ४२
थंडी पडे भारी तुला बंडी मी घालीन
राही बाळा तूं निजून अंथरुणांत ४३
थंडी पडे भारी तारे थरारती
करी तूं गुरंगुटी तान्हे बाळा ४४
दुपारचें ऊन दगडांच्या झाल्या लाह्या
तोंड कोमेजे देसाया भाईराया ४५
दुपारचें ऊन लागते रे तुला
माझ्या गुलाबाच्या फुला गोपूबाळा ४६
दुपारचें ऊन झळा झळाळा लागती
बाळे माझी कोमेजती सुकुमार ४७
दुपारचें ऊन पाय ग भाजती
त्यांत बाळ कडेवरती माउलीच्या ४८
दुपारचें ऊन नको जाऊं तूं बाहेर
तूं रे राजा सुकुमार फुलावाणी ४९
दुपारचे ऊन बाळ खेळायाला गेले
कोकंबासारखें तोंड लाल लाल झालें ५०
दुपारचें ऊन कोण ग साहील
समुद्र आटेल अशा ऊने ५१
दुपारचे ऊन पांखरें शांत शांत
आईच्या मांडीवरी तान्हें बाळ निवांत ५२
दुपारचें ऊन बाहेर बघवेना
बाहेर निघवेना घडीभर ५३
दुपारचें ऊन इंगळांची वृष्टि
हिरवी सारी सृष्टि जळून गेली ५४
कडक उन्हाळा रानांत नाहीं पाणी
देव आश्चर्य करितो झाडा पल्लव फोडूनी ५५
कडक उन्हाळा पाण्याचा नही पत्ता
देव आश्चर्य करितो झाडां फुटे नवा पत्ता ५६
छत्र धरी शिरी त्याचा लखलखाट पडे
सूर्यनाथ चढे रथावरी ५७
उगवले सूर्यदेव आधी उगवे माझ्या दारीं
मग पृथ्वीवरी उजेड पडे ५८
सूर्य वर आला अंधार गेला दूर
दरींत करी घर भांबावोनी ५९
सूर्य वर आला किरीट किरणांचा
पांखरां फुटें वाचा झाडांवरी ६०