मुलगी 10
तुझ्या गालांवरी सांग कोणी ग गोंदले
फूल कोणी ग टोचलें गुलाबाचे ४१
पिकले तोडलें तसे तुझे बाळे ओठ
भरे ना माझे पोट पाहुनीया ४२
बापाची लाडकी बाप म्हणे कोठे गेली
हांसत दारी आली उषाताई ४३
मुलगी वाढते जशी चंद्रम्याची कोर
बापाला पडे घोर अंतरंगी ४४
मुलगी वाढते दिवसेंदिवस
घोर लागतो जिवास बाप्पाजींच्या ४५
मुलगी वाढते मनीं चिंताही वाढते
चिंता सतत रडवी मायबापां ४६
बाप म्हणे लेकी लेकी गुळाचे घागरी
लावण्यरूप तुझें घालूं कोणाचे पदरीं ४७
बाप म्हणे लेकी माझें साखरेचें पोतें
तुझ्या नशिबाला जामीन कोण होते ४८
बाप म्हणे लेकी लाडकी होऊं नको
जाशील परघरीं वेडी माया लावू नको ४९
बाप म्हणे लेकी तूं ग धर्माची पायरी
सून सत्तेची सोयरी वैनीबाई ५०
लेकीचें जन्मणें जसा पानांचा पानमळा
ज्याची त्याने नेली बया शोषला ग तुझा गळा ५१
बाप्पाजी हो बाप्पा लेकी फार म्हणूं नका
जसा चिमणुल्यांचा थापा उडुनीं गेला ५२
सगळया झाल्या लेकी शेजी म्हणे झाल्या झाल्या
बाप ग म्हणे दाही दिशा चिमण्या गेल्या ५३
बाळपट्टी खण रुपयाला एक
परकराजोगी लेक अक्काबाईची ५४
बाळपट्टी खण रुपयाला दोन
परकराजोगी सून अक्काबाईला ५५
मुलगी पाहूं आले पुण्याचे पुणेकर
जरीचे परकर घालूं केले ५६
मुलीला पाहूं आले पुण्याचे वाईचे
नाना फडणीसांचे कारकून ५७
मुलीला पाहूं आले आधीं चहा करा
मग मुलीला पहा उषाताई ५८
मुलगी पाहूं आले पुण्याचे पुणेकर
बिंदीपट्टा अलंकार घालू केले ५९
नवरी पाहूं आले काय पाहतां कूडभिंती
मुलगी सुरतेचे मोतीं उषाताई ६०