मायलेकरे 25
अंगणांत किती नाचती फुलवेल
बाळाचा चाले खेळ त्यांच्यासंगे २२१
माझ्या अंगणात वानरे येती जाती
वाकुल्या दाखविती तान्हेबाळा २२२
माझ्या अंगणात कारंजे थुईथुई
रांगतसे भुई तान्हेबाळ २२३
माझ्या अंगणात कारंजे नाचे उडे
बघून जाते रडे तान्हेयाचे २२४
माझ्या अंगणात वासरें बागडती
बाळके धावती त्यांच्यासंगे २२५
घागर्या घुळुघुळु दणाणला सोपा
खेळतो प्राणसखा तान्हेबाळ २२६
घागर्यांचा नाद पडतो माझ्या कानी
खेळतो वृंदावनी तान्हेबाळ २२७
माझे तान्हेबाळ खेळाया जाई लांब
हातावरी जांब पिकलेला २२८
माझे तान्हेबाळ खेळाया जाई दुरी
हातावरी पुरी साखर मागे २२९
घरांत काम करूं चित्त माझे नाही स्थीर
दारी खेळ रघुवीर तान्हेबाळ २३०
तिन्हीसांजा झाल्या गुरावासरांची वेळ
वाटेवेगळा तूं खेळ गोपूबाळ २३१
अंगणात रावा परसावांत साळुबाई
मधुबाळा कमळाबाई हांक मारी २३२
पांखरे घरा गेली बाहेर सांजावले
खेळून आली बाळे आईपाशी २३३
गायी घरी आल्या देव मावळला
बाळ नाही आला कैसा घरी २३४
गायीच्या पान्ह्यासाठी वांसरे हंबरती
खेळुनी बाळ येतो तिन्हीसांजा २३५
तिन्हीसांजा झाल्या दिवे लागले घरांत
गायी चाटती गोठयांत वांसरांना २३६
तिन्हीसांजा झाल्या दिवे लागले घरांत
बाळा पाळण्यांत आंदुळती २३७
कितीं हाका मारूं उभी राहुनी दारांत
चंद्र कोणाच्या वाड्यांत तान्हेबाळ २३८
बाळ खेळू जाये वडासाउलीये
घरी माउलीये साद घाली २३९
पारवा दारावरी सारी रात्र निंद घाली
माझे बाळ गाणें गाई पाळण्यांत २४०