देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13
शबरीची बोरें रामें मटकावीली
शबरी मुक्त केली संसारात १०१
सीतेच्या शोधासाठी रामानें दिली सरी
मारुति ग राया मग पडला विचारी १०२
सीतेच्या शोधासाठी रामानें दिली माळ
समुद्र लंघुनी गेले अंजनीचें बाळ १०३
अशोकाचे खाली सीता रडतसे
मारुती देतसे आश्वासन १०४
अशोकाचे खाली सीताबाई शोक करी
हनुमंते खूण दिली रामरायाची १०५
अशोकाचे खाली सीतेची गळेसरी
तेथें मारुतीची फेरी रात्रंदीस १०६
अशोकाचे खाली सीतेचा कमरपट्टा
तेथें मारुती झपाटी रात्रंदीस १०७
अशोकाचे खाली सीतामाईचे कांकण
तेथे मारुती राखण रात्रंदिवस १०८
अशोकाचे खाली सीताबाईची हो नथ
तेथे मारुतीचा पथ रात्रंदिवस १०९
अशोकाची फुलें शेंदरी रंगाची
फार आवडीची जानकीच्या ११०
अशोकाच्या झाडा फुलांचा नित्य बहर
सीतादेवीच्या डोळयांचा त्याला मिळतो पाझर १११
अशोकाची फुलें झुबके झुबके
पाहते कौतुकें दु:खी सीता ११२
अशोकाच्या झाडा सीता घाली पाणी
नेत्र येतात भरोनी रात्रंदीस ११३
अशोकवनाची कां ही सुकुमार फुलें
जानकीच्या नेत्रातील पोसली ती नित्य जळें ११४
अशोकवनींच्या फुलांना कां गोड वास
जानकीचा त्यांना लागे नित्य नित्य श्वासोच्छ्वास ११५
अशोकवनांत फुलांचा सडा पडे
परंतु सीता रडे रात्रंदीस ११६
सागरावरती सेतु बांधिला बाणांचा
दशरथाच्या पुत्राचा पराक्रम ११७
सागरावरती सेतु बांधला वानरी
तुझ्यासाठी ग सुंदरी सीताबाई ११८
राम टाकी शिळा परि बुडाल्या त्या तळीं
रामाच्या नांवाची शिळा परि तरे जळीं ११९
हसून मारुती म्हणे रामा रघुनाथ
देवा, तुमच्याहीपेक्षां तुमच्या नांवाची योग्यता १२०