बहिण-भाऊ 14
दूरच्या देशींचा शीतळ वारा आला
सुखी मी अईकयीला भाऊराया ११
दूरच्या देशींचा सुगंधी येतो वात
असेल सुखांत भाईराया १२
लागेल घालावी फार मोठी ओंवाळणी
चिंता काय अशी मनी भाईराया १३
पान फूल पुरे पुरे अक्षता सुपारी
नको शेला जरतारी भाईराया १४
नको धन नको मुद्रा नको मोतियांचा हार
देई प्रेमाश्रूंची धार भाईराया १५
दादा बाळपणीं तुला चावा मीं घेतला
त्याचा काय राग आला आज तुला १६
दाणे भातुकलीचे खाशी म्हणून बोलल्ये
तेंच काय मनीं धरिलें आज दादा १७
आपराध पोटीं प्रेम थोरांचें घालीत
येई धांवत धांवत भाईराया १८
पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा रागावेल
चंद्र आग का ओकेल कांहीं केल्या १९
पाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेल
कस्तूरी का सोडील निज वास २०
पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा हो रुसेल
कधीं सोनें का कुसेल कांहीं केल्या २१
पाठच्या बहिणीवरी भाऊ का रागावेल
रंग का बदलेल आकाशाचा २२
पाठच्या बहिणीवरी जरी रागावेल भाऊ
तरी म्हणेल कोण राहूं संसारांत २३
सोड सारा राग रुसवा टाक सारा
पुसाव्या माझ्या धारा लोचनींच्या २४
सोड सारा राग तुला राग ना शोभत
येई धांवत धांवत भाईराया २५