तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 1
रसपरिचय
महाराष्ट्रातील सर्वांत थोर नगरी कोणती ? जेथे साधुसंतांनी प्रेमाचा पाऊस पाडला ती विठूची पंढरपुरी. पंढरपुराचे वर्णन करता करता बायकांना जणू उचंबळून येत आहे. पंढरपुरास जावे, भीमेच्या, त्या चंद्रभागेच्या तीरावर क्षणभर उभे राहावे आणि मुक्त व्हावे :
जाऊं ग पंढरी उभी राहूं ग भीवरी
तेणे मुक्ती चारी येती हाता
पंढरपुरातील आषाढी-कार्तिकीचा सोहळा कोण वर्णन करील ? परंतु ही थोडी चव घ्या :
पंढरपुरांत विण्याशीं वीणा दाटे
साधुला संत भेटे वाळवंटी
वीण्याला लागे वीणा दिंडीला भेटी दिंडी
यात्रेला येती झुंडी पंढरीस
टाळ-मृदंगाचा विठूच्या नामाचा
गजर पुण्याचा पंढरींत
आषाढीची यात्रा जमावी, प्रेमाचा पूर यावा, परंतु अशाच वेळी एखादे वेळेस प्रचंड पाऊस पडून चंद्रभागेस पूर यावा. मग कोण गडबड ! कोणी नारळ फोडतात, कोणी पाणी उतरावे म्हणून लिंबू फेकतात :
भरली चंद्रभागा नाव निघाली बुडाया
नेला नारळ फोडाया रखुमाईला
भरली चंद्रभागा लिंबू टाका उतार्याला
जाणें आहे सातार्याला भाईरायाला
परंतु पूर ओसरत नाही. पाण्याच्या लाटा आपटत असतात. इतरांची गोष्ट दूरच राहो; परंतु प्रत्यक्ष विठोबाचाही टाळ-वीणा भिजते. रखुमाईची चोळी शेवटी उंचावर वाळत घालण्यात येते:
भरली चंद्रभागा पाणी करी सणासणा
भिजला टाळवीणा विठ्ठलाची
भरली चंद्रभागा पाणी लागलें भिंतीला
चोळी वाळते खुंटीला रखुमाईची
पंढरपुरात फुलांना तोटा नाही. तुळशीच्या बागा, झेंडू- जिकडे तिकडे फुलेच फुले :
पंढरीसी जाता पंढरी लाललाल
पेरिली मखमल विठ्ठलाची
पंढरीसी जातां पंढरी हिरवीगार
तुळशीला आला भर विठ्ठलाच्या
माळणी विठोबाला व रखुमाईला फुलांचे शृंगारसाज करतात:
पंढरपुरांत माळिणी ठमा रमा
फुलांचा पायजमा विठ्ठलाला
पंढरपुरांत माळिणी उंच काठी
फुलांची चिंचपेटी रखमाईला