सुखदु:खाचे अनुभव 21
मंदिरी सप्ताह भागवत चाले
बाप्पाजी तेथें गेले ऐकावया २०१
मंदिरी सप्ताह झालासे आरंभ
मामंजी त्यांत दंग ऐकावया २०२
हरदास आले पुण्याचे वाईचे
अलोट लोकांचे जाती थवे २०३
आले हरदास राजधानीहून
ऐकाया कीर्तन संत जाती २०४
संत आले गांवी दर्शनाला चला जाऊं
घरी नका कथा राहूं सखी सांगे २०५
संत आले गांवा चला त्यांची करूं सेवा
हेत माझा पुरवावा एवढा की २०६
दागीना मागत्यें म्हणूनी म्हणतां वेडी
कोण माझी हौस फेडी तुम्हांवीण २०७
काळी चंद्रकला घेऊन मला द्यावी
हौस माझी पुरवावी तुम्ही कंथा २०८
काळी चंद्रकळा शोभेल गोर्या अंगा
म्हणाल आली रंभा स्वर्गातून २०९
नको हो पैठणी नको मला शालू शेले
भाळ असो भरलेले कुंकवाने २१०
नको मज बिंदी नको तो चंद्रहार
पुरे एक अलंकार मंगळसूत्र २११
दागिना मागत्ये एक आज तुम्हांपाशी
जन्मोजन्मी ठेवा दासीला या पायापाशी २१२
दागिना मागत्यें कंथा नाहीं म्हणूं नका
पत्नी प्रेमाची भुकेली नको तिला पैसा रुका २१३
दागिना मागत्यें परस्त्रीला माना माता
कंथा आपण साधूं या संसारांत परमार्था २१४
देशील रे देवा देशील ते थोडें
मी मागत्यें रोकडे हळदीकुंकू २१५
पुतळयांची माळ पडते निर्यांवरी
कंथाच्या राज्यावरी उषाताई २१६
आयुष्य मी चिंती सासुबाईच्या होनीरीं
माझ्या कुंकवाची चिरी जन्मवेरी २१७
देई देवा मज देशील तितुकें पुरें
अक्षय माझे चुडे जन्मवेरी २१८
देई देवा मज संततीला सोने
विश्रांतीला बाळ तान्हें मांडीवरी २१९
देई देवा मज हळदीचे तेज
कुंकवाचे राज्य जन्मवेरी २२०