मुलगी 14
अहेर की आला माहेरींची घटी
घटीवर मुठी मोतीयांच्या १२१
अक्षतांनी जड झाला उषाताई तुझा माथा
अहेर देता घेता दमलीस १२२
माडीखालीं माडी माडीखाली तळघर
तेथे तुझा गौरीहर उषाताई १२३
अष्टपुत्री कांचोळी आजोळींची नेस
गौरीहरी बैस उषाताई १२४
हौसदार मोठे कमळाबाईचे चुलते
गौरीहरी ग फुलते नागचाफे १२५
आणील रुखवत मुलीची आई उभी
उघडून पाहूं दोघीं ताईबाई १२६
आणीले रुखवत मंडपी राहूं द्या
वडील मानाची येऊं द्या ताईबाई १२७
आणीले रुखवत बत्तीस ताटांचे
नवर्या मुलीचे गोत मोठे उषाताईचे १२८
वाजत गाजत आले रुखवत
भोवती मैत्र येत गोपूबाळाचे १२९
आले रुखवत आता उठा घाई करा
घोडा आहे उभा दारा शृंगारलेला १३०
सजलेला घोडा वर वर बसवीला
एकच घोष झाला वाजंत्र्यांचा १३१
नवरा मुलगा हत्तीवर उभा करा
करवलीचा चुडा भरा कमळाताईला १३२
नवरा मुलगा हत्तीवर चढे
दोन्ही बिंदी उजेड पडे चकचकाट १३३
चौघडे कडाडती उडतात बार
चालला हो वर उषाताईचा १३४
शिंगे वाजवीती कुणी वाजवीती झांजा
मुहूर्त तिन्हीसांजा गोरजाचा १३५
वरापाठीमागे मानाच्या वर्हाडणी
अप्सरा स्वर्गातूनी उतरल्या १३६
निघाल्या बायका अपुला करून शृंगार
पैठण्या पीतांबर झळकती १३७
धन्य धन्य वाटे मनांत वरमाये
आनंद न समाये हृदयात १३८
घोडा सजलेला घोडयाला शोभे तुरा
बसला वर हिरा गोपूबाळ १३९
घोडा सजलेला त्याच्यापायी चांदी तोडा
वराच्या पायी जोडा शोभतसे १४०