संकीर्ण 10
समुद्राचे काठीं दर्भाचें आसन
तेथें तुमचें संध्यास्नान काकाराया १०१
काय सांगू सखे आंबा पिकलासे टिकशी
येतील गरुडपक्षी घेऊन जाती १०२
काय सांगू सखे आंबा पिकला डहाळी
नेतील गरुडमाळी वेळ होता १०३
समुद्राच्या काठीं कुवारल्यांची दाटी
परकर-चोळया वांटी अक्काबाई १०४
कुंकवाचा पुडा अक्काबाईला सांपडला
आयुष्याचा लाभ झाला तिच्या कंथा १०५
देवांचा देव्हारा फुलांनी वजवीला
मंत्रांनी पूजीला बाप्पारायांनी १०६
हरिश्चंद्र राजा तारामती राणी
डोंबाघरीं पाणी भरताती १०७
व्याह्यांच्या पंगतीला केला साखरभात
मुदळ्याजोगा हात वैनीबाईंचा १०८
वैनीबाई सुगरिणी तुझा हिंग करपला
कचेरीस वास गेला भाईरायाच्या १०९
नाकीची ग नथ पडली घंगाळांत
मैना गुंतली संसारांत वैनीबाई ११०
दुपार संपली झाली संध्याकाळ
हातीं घेती जपमाळ जपावया १११
माझ्या घरीं ग पाहुणे दत्तात्रेयस्वामी आले
पादुका विसरले पंचवटी ११२
माझ्या घरीं ग पाहुणे दत्तात्रेय दिगंबर
चंदनें देवघर सारवीलें ११३
पंचवटीमध्यें पिवळें झाड केतकीचें
रामापरीस सीतेचें गोरेपण ११४
ब्राह्मणाच्या मुली तुला कामाचा कंटाळा
कुंकवाची चिरी तुझ्यापारीशाकपाळा ११५
माझे अंगणांत भात भात मोजिला खंडी खंडी
लुगडें घेती रेवदंडी काकाराया ११६
नागोबा माझे बाप नागिन माझी आई
लांडें पुच्छ माझे भाई सुखी राही ११७
नागिन ग बाई तुझा नागोबा कोठें गेला
गारुड्यानें नेला खेळावया ११८
देहाचा देव्हारा त्याला आत्म्याचें कुलूप
हिंदुस्तानांत मुलूख भाईरायाचा ११९
मुंबई मद्रास मागे पुढें तास
किती वाजले तपास गोपूबाळा १२०