संकीर्ण 8
आपण गुज बोलूं कशाला हवी शेजी
गुजाजोगी आहे माझी काकूबाई ६१
जातें कुरुंदाचें खुंटा आवळीचा
गळा माझ्या सांवळीचा आहे गोड ६२
जाते कुरुंदाचें खुंटा पाषाणाचा
वर हात कांकणाचा उषाताईचा ६३
जातियाचें तोंड जशी खोबर्याची वाटी
याचा कारागीर नांदतो बालेघाटीं ६४
वेदशाळेमध्यें पाहीले कावळे
धैर्यते मावळे बाप्पाजींचे ६५
गणपतीला नैवेद्या बदामाचा शिरा
पालगडगांवचा हिरा पंढरीबाळ ६६
गौरी बाळंतीण उन्हाळयांत झाली
कांचेची माडी केली शंकरांनी ६७
बाळपट्टी खण पट्टीला चवल
शिंपी करतो नवल चोळीयेचें ६८
हल्लींच्या मुलींना काम नको डोळ्यांपुढे
लक्ष सदा लिहिण्याकडे उषाताईचें ६९
मला हौस मोठी वांकड्या भांगाची
भाळी टिकली कुंकवाची तिळाएवढी ७०
देव देवळांत कृष्ण कमळांत
भानु आभाळांत चंद्रसूर्य ७१
दिवस गेला कामाखालीं रात्र झाली आनंदाची
पोथी वाचली गोविंदाची दादारायांनी ७२
संकष्टी चतुर्थी माझा आहे नेम
भाचा सांगेन ब्राह्मण गोपूबाळ ७३
हल्लींच्या बायका चकरें घालिती
वर फूल तें खोविती शेवंतीचे ७४
शंकराला बेल विष्णूला तुळस
दवडा आळस सर्वजण ७५
सूर्योदयापूर्वी प्रात:स्नान
जाईल शीण गोपूबाळा ७६
सूर्योदयापूर्वी करी प्रात:स्नान
कर रामनाम मंत्र जप ७७
समईत घाली उषाताई तेलवात
करी सांजवात देवापाशी ७८
चांदीचे ताटांत नैवेद्या आणीला
डोळे भरून पाहिला वनमाळी ७९
तांब्याच्या टोपांत उडदाचें वरण
एकादशीचे मरण मज यावे ८०