सुखदु:खाचे अनुभव 35
माझ्या ग मैत्रीणी आहेत सात-आठ
एकीला द्यावा पाट बसावया ४८१
माझ्या ग मैत्रीणी आहेत किती पहा
कितीदां देऊं चहा सांगा तुम्ही ४८२
गोंडीयांची वेणी मोगर्या दाटली
सखी सासर्या भेटली मैनाताई ४८३
मैत्रीणींच्या मेळ्यामध्ये चांगली कोण दिसे
हिरवा जी शालू नेसे शांताबाई ४८४
मैत्रीणींचा मेळा वेशीं खोळंबला
शृंगार नाही झाला अजूनी माझा ४८५
तुझा माझा मैत्रपणा मैत्रपणा काय देऊ
एका ताटी दोघी जेवूं मनूबाई ४८६
तुझा माझा मैत्रपणा एका घागरीतले पाणी
नको कपट धरू मनीं शांताबाई ४८७
तुझा माझा मैत्रपणा मैत्रपणा काय देऊ
एका लवंग दोघी खाऊ मनूबाई ४८८
तुझा माझा मैत्रपणा मैत्रपणा काय देऊ
एका घोटे पाणी पिऊ मनूताई ४८९
माझ्या ग मैत्रिणी साधुसंतांच्या बायका
त्यांच्या मुखींचे आयका रामनाम ४९०
मैत्रिणीकडे गेल्ये मैत्रीण गुंतली कामाला
हार गुंफीते रामाला तुळशीबागेच्या ४९१
मिळाल्या भेटल्या गुजाच्या गजकरणी
लहानपणींच्या मैत्रीणी ताई माई ४९२
आपण गुजू बोलूं कशाला हवा दिवा
आहे चांदण्याची हवा शांताबाई ४९३
तिन्हीसांजा झाल्या दिव्यांतील वात डोले
सखी माझी गोष्ट बोले हृदयातील ४९४
आपण मैत्रीणी ये ग बोलू गूज
सुखदु:ख तुझं माझं शांताबाई ४९५
किती ग वरसांनी भेटलो दोघीजणी
साठलें किती मनीं बोलूं आता ४९६
काय तूं पुसशी पळसा तीन पानें
संसारी समाधानें नांदू सखी ४९७
कधी रागावती बोलती कधीं गोड
मैत्रीणी अशी खोड कंथा माझ्या ४९८
रूप ना लावण्य एक नाही गुण अंगी
संसार त्याच्या संगी करणें दैवीं ४९९
रूप ना लावण्य नाहीं धन ग संपदा
चुरीते परी पदा उषाताई ५००