देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12
रामकुंडावरी रामरायाची बिछाई
तेथे विडा देते सांवळी सीताबाई ८१
रामाला आला घाम सीता पुसते घोळानें
पाहतसे तिच्या मुखा रामराया ग प्रेमाने ८२
रामराया आला घाम सीताबाई घाली वारा
पतिसंगतीत प्रेमें वनवास कंठी सारा ८३
रामरायाला पडसें सीता देते त्याला आलें
पंचवटीमध्ये त्यांचे पर्णकुटी घर झालें ८४
रामराया लावी जाई-मोगर्यांची फुलें
सांवळी सीताबाई शिंपीतसे त्यांना जळें ८५
रामाला पुसते सीता पाखरांची नांवे
रामरायाने हसावें कौतुकानें ८६
सीता रागावली रानी रुसुन बैसली
रामरायें हसविली स्पर्शमात्रें ८७
लक्षुमण आणी सीतामाईला मोरपीसें
सांवळी सीताबाई त्यांचे करीतसे पंखे ८८
राम-लक्षुमण जसे मोतीयांचे बाण
मध्यें शोभे सूर्यपान सीताबाई ८९
राम-लक्षुमण मोतीयांची जोडी
मध्यें शोभते लालडी सीताबाई ९०
राम-लक्षुमण जसे धनुष्य बाण
मध्यें लावण्याची खाण सीतादेवी ९१
रामलक्षुमण जसे मोतीयांचे हार
शेवंती सुकुमार सीताबाई ९२
सीता वनवासी झाडांशी सांगे गोष्टी
दुष्ट ग रावण तेथे ठेवी पापी दृष्टी ९३
सोन्याच्या चोळीचा मोह सीतेला सुटला
कोण प्रपंची वीटला सर्व सुखा ९४
सीतेला लोभ जडे रामराया मोह पडे
होणार तें ते घडे लल्लाटीचें ९५
जटायू तो पक्षी रामासाठी मेला
मरून धन्य झाला संसारात ९६
शबरीची बोरे उष्टीमाष्टीं खाशी
तूं रे दिसशी अधाशी रामराया ९७
शबरीची बोरे उष्टीमाष्टी खाशी
शतजन्मांचा उपाशी रामराया ९८
शबरीची बोरें एकटा राम खाई
सीतेचें त्याच्याशीं मग गोड भांडण होई ९९
शबरीची बोरें अमृताहून गोड
कोण ठेविल त्यांना खोड त्रैलोक्यांत १००