सुखदु:खाचे अनुभव 40
गोपूबाळ वसंत बाळ हे दोघे जोडीचे
शेले चुनाडीचे पांघुरले ५८१
शंकरबाळ मोरूबाळ हे दोघे जोडीचे
माझ्या आवडीचे दोन हिरे ५८२
शंकरबाळ मधुबाळ हे दोघे गडी गडी
जशी भीमार्जुनांची जोडी घरामध्यें ५८३
एका छत्रीखाली कोण ग चालती
मामेयाच्या संगे भाचे बाहेर निघती ५८४
गंगूबाई रंगूबाई या दोघी मावश्याभाच्या
डोकीवरी कुंच्या रेशमाच्या ५८५
धाकटी वैनी मोठी वैनी भांडती कडाकडा
मध्ये साखरेचा खडा गोपूबाळ ५८६
धाकटी वैनी मोठी वैनी जावांचा ग जोडा
कोथिंबीरी चुडा भरीयेला ५८७
भांडशी भांड गड्या तुझ्या तोंडाची जाते वाफ
भल्या बापाची मी लेक नेदी जाप ५८८
शेजारी भांडतो करीतो हमरी तुमरी
बोले ना उषाताई थोरामोठ्यांची ग नारी ५८९
साखरेचे लाडू वाटेच्या पाहुण्यांना
श्रीधरपंत मेहुण्यांना एकादशी ५९०
सांवळे मेहुण्यांना समई नाही दिली
चंद्रज्योत उभी केली शांताताई ५९१
मनोहरपंत मेहुणे आपल्या आईचे बालक
दिली पुतळी ठळक कमळाताई ५९२
हाती दौत-लेखणी कलमदानीं गोंडे
कारकून हिंडे बाप्पाजींचा ५९३
माझें ओटीवर बुकांचे कीं ओझे
वकील नांव तुझें आप्पाराया ५९४
चौसुपी माझें घर कितींदा काढूं केर
माझे भाग्यवंत दीर घरी आलें ५९५
माझा नव्हें कोणी माझ्या बहिणीबाळेचा
हिरा मोहनमाळेचा गोपूबाळ ५९६
माझा नव्हे कोणी माझ्या बहिणीचा होशी
मला मावशी म्हणशी चंदूबाळा ५९७
माझ्या ग घरांत सदा येती आप्त इष्ट
माझ्या घराचे अभीष्ट चिंतितात ५९८
नदीपलीकडे कोणाच्या मोर्या गायी
आजोबा आजीबाई दान देती ५९९
नदीपलीकडे कोणाची वांसरें
तेथे तुझे ग सासरे उषाताई ६००
चिठी बरोबर आंबे द्या पाठवून
त्यात ठेवावे लिहून उषाताईला ६०१
लेकी झाल्या लोकी सुना झाल्या लेकी
हातींचे काम घेती मायबाईच्या ६०२
लेकी झाल्या लेकुरवाळया सुनांना आली न्हाणे
दैवाची देते वाणि आक्काबाई ६०३
नातवंडे पतवंडे भरली ओसरी
दैवाची बैसली आजीबाई ६०४
नातवंडाची आजी पतवंडांना दूध पाजी
दैवाची आहे माझी आजीबाई ६०५