पहिली माझी ओवी 6
सहावी माझी ओंवी सहा हे ग ऋतु
वसंत परंतु त्यांचा राजा ६१
सहावी माझी ओंवी सहा तोंडे षडानना
नमूं देवा गजानना त्याच्या भावा ६२
एकटी दुसरी तिसरीला चिंधी
चवथीला बिंदी उषाताईला ६३
एकटी दुसरी तिसरीला माळ
चवथीला चंद्रहार घालूं केला ६४
पहिली माझी ओंवी पहिले वहिले
भक्ती वंदीले मायबाप ६५
पहिली माझी ओंवी पहिली कामाला
स्मरतें रामाला अंतरंगी ६६
पहिली माझी ओंवी पहिला ग पुत्र
व्हावा संसारांत म्हणतात ६७
दहावी माझी ओंवी दश इंद्रियांचा
अकराव्या मनाचा खेळ सारा ६८
बारावी माझी ओंवी बारा अक्षरांचा मंत्र
ध्रुव बाळाने पवित्र जप केला ६९
सरसकट माझी ओंवी सरसकट सहा देवां
आरती महादेवा कापुराची ७०
पहिली माझी ओंवी सदा एकीचें पालन
घरीं बेकी होता जाण राज्य गेलें ७१
दुसरी माझी ओंवी दुहीला मिळता वाव
परक्यांनी डाव साधीयेला ७२
तिसरी माझी ओंवी लाभ तिसर्याचा
दोघांच्या भांडणाचा शेवट हा ७३
चवथी माझी ओवी चारांचें ऐकावें
हट्टाला सोडावें संसारात ७४
ओंवीला आरंभ केला पेटीला कप्पे कप्पे
लिहिणार माझे सख्खे भाईराय ७५
ओंवीला आरंभ केला पेटीला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा भाईरायाचा ७६