सुभाषिते 5
सुभाषिते : ओव्या
डोंगर चढून भेटावें देवाला
यत्नानें यशाला मिळवावें १
नको ग कधींही संसारी बोलू खोटे
त्यानें गेले मोठमोठे अधोगती २
नको ग कधींही संगती दुर्जनांची
भेट ती नरकांची मृत्युलोकी ३
रामाच्या नांवाचा पापी कंटाळा करीती
निवळ टाकून पाणी गढूळ भरीती ४
माझें माझें म्हणून प्राणी संसारीं भुलतो
निवळ सोडून पाणी गढूळ भरीतो ५
साखर मुंगीला मध तो माशीला
तैसें सज्जनचित्ताला रामनाम ६
शिकती तराया पाण्यांत पडून
संसारी वावरून मुक्त व्हावे ७
वाण्याच्या दुकानी भाव नाही कापराला
मूर्खाशीं बोलतां शीण येई चतुराला ८
चंदना पडती विळखे सर्पाचे
तैसे दुर्जनांचे सज्जनांना ९
बळीचीये दारीं तिष्ठतो वामन
भक्ताचे आधीन भगवंत १०
भक्ताला जवळ दुष्टा सदा लांब
प्रल्हादासाठीं खांब स्वीकारीला ११
कुणी नाहीं रे कुणाचा आत्मा नव्हे रे कुडीचा
आहे संसार घडीचा नाशीवंत १२
कुणी नाहीं रे कुणाचा पुत्र नव्हे ग पोटींचा
येईल कामाला धर्म पांचा ग बोटींचा १३
कुणी नाहीं रे कुणाचा कशाला हसा रडा
आहे संसार बुडबुडा नाशीवंत १४
कुणी नाही रे कुणाचा कशाला खोटें बळ
संसार मृगजळ नाशीवंत १५
वृध्द मायबाप सेवावे पूजावे
हेंच समजावें धर्मसार १६
वृध्द मायबाप जशीं पिकलेली फळें
तयांची चरणकमळें नित्य वंदू १७
रामराम म्हणुनी जपती माझे ओठ
जिव्हेबाई घ्यावा घोट अमृताचा १८
रामराम म्हणुनी जपती माझ्या दाढा
घेई अमृताचा काढा जिव्हेबाई १९
कुतरा भुंकतो मांजर देखून
गर्जती पंचानन हत्तीसाठी २०