देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20
राजसूय यज्ञी द्रौपदी वाढी लोणचे
कृष्णाचें पान कोणचे विचारीते २४१
राजसूय यज्ञी घंटानाद झाला
कृष्ण सांगे अर्जुनाला शुकमहाराज आला २४२
राजसूय यज्ञीं पूजा झाली ग कोणाची
झाली गोपाळकृष्णाची गोविंदाची २४३
द्रौपदीमाई म्हणे नव्हे माझा सख्खा भाऊ
मायेचा कृष्णनाथ किती त्याची वाट पाहूं २४४
द्रौपदीमाई म्हणे जळो देवा माझें जिणें
कौरवांच्या सभे दुष्ट गांजीयेले दुर्योधनें २४५
वस्त्र फेडी दुर्योधन पहिला पितांबर
पाठीशी दामोदर द्रौपदीच्या २४६
वस्त्र फेडी दुर्योधन दुसरी पैठणी
पाठीशी चक्रपाणी द्रौपदीच्या २४७
वस्त्र फेडी दुर्योधन तिसरी वल्लरी
पाठीशी मुरारी द्रौपदीच्या २४८
वस्त्र फेडी दुर्योधन चवथा ग शेला
पाठीशी सांवळा द्रौपदीच्या २४९
वस्त्र फेडी दुर्योधन पांचवें अमोल
पाठीशी घननीळ द्रौपदीच्या २५०
वस्त्र फेडी दुर्योधन सहावें जरतारी
पाठीशी कंसारी द्रौपदीच्या २५१
वस्त्रें फेडूनीयां पापी चांडाळ दमला
कैवारी कृष्ण झाला द्रौपदीचा २५२
तुळशीपानांच्या लावील्या पत्रावळी
जेवीले वनमाळी द्वारकेंत २५३
देव भावाचा भुकेला विदुराच्या कण्या खातो
अर्जुनाचे घोडे धुतो नारायण २५४
देव भावाचा भुकेला विदुराच्या कण्या भक्षी
अर्जुनाचे घोडे रक्षी नारायण २५५
पांडवाची घरे सोनियाच्या भिंती
एवढया इमारती सोडून गेले रात्री २५६
चक्रव्यूही शिरे पुत्र प्रतापी पार्थाचा
भाचा प्रत्यक्ष कृष्णाचा अभिमन्यु २५७
चक्रव्यूही शिरे लाडका अर्जुनाचा
पति उत्तराबाईचा अभिमन्यु २५८
अभिमन्यू बाळ सिंहाचे ग पिलुं
लागले सारे पळू कौरवांचे २५९
अभिमन्यु बाळ गरूडाचें ग पिलू
लागले सारे पळू कौरवांचे २६०