मुलगी 17
मंत्र उच्चारिती चाललासे होंम
डोळयां जातो धूम उषाताईच्या १८१
मंत्र उच्चारिती चाललासे होम
होतसे भारी श्रम उषाताईला १८२
कोवळी सांवळी जशी शेवंतीची कळी
दमली भागली उषाताई १८३
कोंवळी कोंवळी सुंदर सांवळी
घामाघूम भारी झाली उषाताई १८४
आणिले दागीने तबकी भरून
शोभले चौगुण उषाताई १८५
आधीच सोन्याची आणि सोन्याने मढली
अत्यंत शोभली उषाताई १८६
हाती गोठतोडे भाळी बिंद बिजवर
गळा शोभे चंद्रहार उषाताईच्या १८७
नाकी मोठी नथ तोंडा पडली साउली
चित्रशाळेची बाहुली उषाताई १८८
ठुशापेटयांखाली कंठयाचे बारा सर
दिल्या घरी राज्य कर उषाताई १८९
ठुशा पेटयांखाली तन्मणीला बारा घोंस
दिल्या घरी राज्य कर उषाताई १९०
पिवळी नागीण चंदन वेलीला
तसा पट्टा कमरेला उषाताईच्या १९१
गोंडस सुकुमार हात चिमणे कोंवळे
जड तोडयांनी वांकले उषाताईचे १९२
तोडीच्या वाकींनीं शोभती दोन्ही भुजा
फाकते तेज:प्रभा उषाताईची १९३
पांच पेडी वेणी वेणीला पन्हळ
मुद राखडी सांभाळ उषाताई १९४
करवंदी मोत्यांची नथ लाखाच्या मोलाची
कोवळया नाकाची उषाताई १९५
नक्षत्री आकाश फुलांनी फुलवेल
भूषणी शोभेल उषाताई १९६
फुलांच्या गुच्छांनी वांकतो कोवळा वेल
तशी नवरी लवेल दागिन्यांनी १९७
वाजत गाजत हळदीला नेती
अंगाला लाविती वधूवरांच्या १९८
नवर्यापरीस नवरी आहे गोरी
हळद लावा थोडी उषाताईला १९९
नवर्यापरीस नवरी आहे काळी
आणा फुलांची हो जाळी उषाताईला २००