प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 13
प्राचीन काळी आणि काही अंशी आजही काही लोकांना या विश्वाचे कोडे उलगडावे म्हणून एक प्रकारचे वेड लागले आहे. परंतु यामुळे हल्लीच्या (सामाजिक) नि वैयक्तिक प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. विश्वाचे कोडे उलगडता न आल्यामुळे शेवटी ते निराश होऊन निष्क्रिय बनतात किंवा क्षुद्र गोष्टीत, एखाद्या हटवादी, धर्मांध पंथात अखेर त्यांचे समाधान होते. आपणास दूर करता येतील अशी पुष्कळ सामाजिक दु:खे (निदान हिंदुस्थानात) पूर्वजन्माचे फळ आहे असे प्रतिपादण्यात येते. आदमने देवाची आज्ञा मोडण्याचे जे मूळ पाप केले त्यामुळे जग दु:खमय झाले आहे, किंवा मानवी स्वभावच मुळी असा आहे म्हणून ही दु:खे आहेत, त्यात बदल होणे कठीण आहे, किंवा समाजरचना अनादी आहे, ईश्वरनिर्मित आहे, तिच्यामुळे ही दु:खे आहेत असे मानण्यात येऊ लागते. अशा रीतीने बुध्दिपूर्वक विचार करण्याची, शास्त्रीय दृष्टीने विचारवृत्तीच नष्ट होते. बुध्दीचा उपयोगच केला जात नाही आणि भोळसटपणा, अंधश्रध्दा, विचारहीन रूढी नि आचार, सामाजिक विषमता या सार्यांना माणूस कवटाळून असतो. शास्त्रीय दृष्टी, आपली बुध्दी यांच्या साहाय्यानेही आपण इच्छेनुरूप फार पुढे जाऊ शकत नाही, ही गोष्ट खरी. जगातील घडामोडींवर अनंत गोष्टींचे परिणाम होत असतात. अनेक कार्यकारणात्मक संबंध असतात; त्यांचे कमी अधिक परिणाम होत असतात. त्या सर्वांचे स्वरूप नीट समजून घेणे आपल्या शक्तीपलीकडचे असते. परंतु असे असले तरी त्या घडामोडी घडविणारी समर्थ शक्ती काय आहे ते शोधण्याचा निदान प्रयत्न करणे शक्य आहे, व बाह्य सृष्टीतील घडामोडींचे निरीक्षण करून, प्रयोग करून, अनुभव घेऊन, चुका करता करता शहाणे होऊन, चाचपडत वाट काढता काढता आपले ज्ञान वाढत जाईल व सत्याचे स्वरूप निश्चित होत जाईल.
यासाठी वर सांगितलेल्या मर्यादा सांभाळून मार्क्सवादी दृष्टी आजच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या मर्यादेत योग्य आहे असे वाटे. ती आजच्या युगाला शोभेशी आहे. परंतु ही मार्क्सवादी दृष्टी घेऊनही त्यावरून निघणारी उत्तरे व प्राचीन वा अर्वाचीन घडामोडींचा त्या दृष्टीने लावलेला अर्थ हा काही मनाला पटण्यासारखा बिनचूक नव्हता. समाजाच्या वाढीचे, विकासाचे मार्क्सने सांगितलेले नियम, त्यांचे त्याने केलेले पृथकरण आश्चर्य करण्याइतपत चांगलेच बरोबर आहे. परंतु त्याने लगेच घडणारी जी भविष्ये वर्तविली ती बरोबर ठरली नाहीत. मार्क्सनंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यांचा उलगडा त्याच्या पध्दतीने लावता येत नाही. नंतरच्या काही घडामोडींना लेनिनने मार्क्सची दृष्टी यशस्वी रीतीने लावून दाखविली. परंतु त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी जगात झाल्या आहेत. फॅसिस्ट नि नाझी संप्रदाय आणि त्यांच्या पाठीमागे असणार्या अनेक गोष्टी यांचा उदय झाला आहे. यंत्रविद्येची झपाट्याने वाढ होत आहे. विज्ञानशास्त्रात प्रचंड वाढ होत असून, ते सारे नवे शोधबोध प्रत्यक्षात उपयोगात आणण्यात येत आहेत. जगाचे सारे चित्र प्रचंड वेगाने बदलत आहे आणि नवे नवे प्रश्न उद्भवत आहेत.
आणि म्हणून जरी मी समाजवादी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टी अंगीकारिल्या, तरी त्यांच्यामागे जे अनेक वादप्रवाद निर्माण झाले त्यात मी कधी गुरफटलो नाही. हिंदुस्थानातील डावे गट पुष्कळ वेळा सिध्दान्तांचा कीस पाडीत बसतात. आपआपसात वाद वाढवून उखाळ्यापाखाळ्या काढून उत्साह व शक्ती दवडीत असतात. मला हे आवडत नसे. या लोकांशी दमाने घेणे माझ्या जिवावर येई. कोरड्या चर्चेचे कौतुक मला कधी वाटत नाही. जीवन फार गुंतागुंतीचे असते. ते सुटसुटीत नाही. एखाद्या ठोकळ्यात ते बसवता येणार नाही. आपल्या आजच्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखून जर आपण जीवनाकडे पाहू तर ते आपणास पुष्कळसे तर्काच्या कसोटीला न उतरणारे असे दिसेल. आपल्या बौध्दिक मर्यादांत ते बसवू म्हटले तरी बसणार नाही.
माझ्यासमोर खरा प्रश्न आहे तो व्यक्तिगत जीवनाचा, सामाजिक जीवनाचा, सुसंवादी जीवनाचा. व्यक्तीच्या बाह्य नि आंतर-जीवनात मेळ असावा, योग्य समतोलपणा असावा, व्यक्तींचे व सामाजिक घटकांचे संबंध नीट, व्यवस्थित असावेत, त्यांच्यात योग्य ते सहकार्य असावे, उत्तरोत्तर अधिक विकास व्हावा, अधिक उच्च पातळीवर जीवन जावे, समाजाची वाढ व्हावी, मानववंश अखंड पुढे जात असावा, त्याची साहसबुध्दी अकुंठितपणे पुढे जात राहावी- हे प्रश्न माझ्यापुढे असतात. हे प्रश्न सोडविताना शास्त्रीय दृष्टीप्रमाणे बुध्दी वापरावी, निरीरक्षण-परिक्षण करावे, सम्यक् ज्ञान वापरावे. सत्यशोधनाच्या कामी ही शास्त्रीय पध्दती नेहमीच हुकमी काम देईल असे नाही. कारण कला नि काव्य, तसेच काही अतींद्रिय अनुभव यांचे एक निराळेच जग असते; शास्त्रीय वस्तुनिष्ठ पध्दती तेथे निरूपयोगी ठरते. त्या पध्दतीने या गोष्टी हाती लागत नाहीत, त्या निसटतात. म्हणून सत्याचे शाश्वत स्वरूप समजून घेण्याचे, अंत:प्रेरणा व तसले दुसरे मार्ग अजिबात झुगारून देता येणार नाहीत. विज्ञानासाठीही या मार्गांची जरूरी असते. परंतु एवढे खरे की, आपण बुध्दीच्या कसोटीवर घासून घेतलेल्या ज्ञानावरच विसंबून राहावे. ते जे प्रत्यक्ष इंद्रियगम्य ज्ञान तोच आपला आधार असावा. त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात प्रयोग करून पडताळा बघावा आणि मानवाच्या दैनंदिन गरजा, आपले हे रोजचे जीवन, त्यातील प्रश्न यांच्याशी संबंध नसणार्या अशा विचारसिंधूत, कल्पनासिंधूत उगीच डुंबत बसू नये, या मोहापासून दूर राहावे. जिवंत तत्त्वज्ञानाला आजच्या प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे.