प्रकरण ५ : युगायुगांतून 8
प्रगतीचा विचार आणि सुरक्षिततेचा, सुस्थित राहण्याचा विचार या दोहोंत बहुधा एक प्रकारचा निश्चित विरोध असतो. दोहोंचा मेळ बसत नाही; एका विचाराला बदल हवा असतो, पुढे जाणे पाहिजे असते; तर दुसर्या विचाराला कोठेतरी सुरक्षित बंदरात पडून राहणे, कोठेतरी नीट स्थिर राहणे हे आवडते. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवाव्या असे वाटते. प्रगतीचा विचार अर्वाचीन आहे. पाश्चिमात्य जगातही तो नवीन आहे; कारण त्यांच्याहीकडे प्राचीन आणि मध्ययुगातील संस्कृती चालू होत्या, तेव्हाही मागे गेला तो काळ सुवर्ण काळ होता, आता अवनती आली आहे असे मानण्याकडे प्रवृत्ती असेच. हिंदुस्थानातही प्राचीन काळाचे गुणगान करण्याची, ते सत्ययुग हे कलियुग असे म्हणण्याची सर्वत्र प्रथा होती व आहे. तेथे जी संस्कृती उभारण्यात आली ती विशेषत: सुरक्षितता आणि स्थिरता यांच्या पायावर उभारण्यात आली आणि त्या दृष्टीने पश्चिमेकडील कोणत्याही संस्कृतीपेक्षा ही भारतीय संस्कृती अधिक यशस्वी ठरली यात शंका नाही. चातुरर्वर्ण्य आणि एकत्र कुटुंबपध्दती यांच्या आधारावर सामाजिक इमारत उभी करण्यात आली, आणि या विशिष्ट सामाजिक रचनेत ती विशिष्ट ध्येये परिपूर्णही झाली. कारण त्या त्या विशिष्ट वर्गाला एक प्रकरची सामाजिक सुरक्षितता असे आणि व्यक्तीलाही वार्धक्यात, किंवा काही कारणामुळे पंगुपणा आला, दुर्बलता आली तर आधार मिळे. अशा समाजव्यवस्थेत दुर्बळांचा सांभाळ होत असला तरी प्रबळांचे पाय थोडे मागे ओढले जात असतात हे काही अंशी खरे आहे. सर्वसामान्यपणाला या व्यवस्थेत उत्तेजन मिळते, परंतु सामान्यत्वाच्या जो पलीकडचा आहे, जो असामान्य आहे-चांगल्या अर्थी वा वाईट अर्थी-त्याचा कोंडमारा करून ते साधते. या व्यवस्थेत सर्वांना एका पातळीतच राहावे लागते, सगळे मिळून वर चढतात किंवा सगळेच्या सगळे खाली घसरतात, त्यामुळे एखाद्या व्यक्तीपुरता वाव कमी उरतो. एकीकडे भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहावे, तर ते अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे, आणि त्या तत्त्वज्ञानाची बहुतेक सारी खटपट व्यक्तीचा अंतर्विकास होता होता वैयक्तिक पूर्णावस्था यावी म्हणून आहे, पण गंमत अशी की दुसरीकडे भारतीय समाजशास्त्राकडे पाहावे तर त्याचा सारा भर जातीवर आहे. त्याची सारी खटपट वर्गा-वर्गाचा हिशेब धरून चालली आहे. व्यक्तीला विचारांचे स्वातंत्र्य होते, जे आवडेल, रुचेल त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे, श्रध्दा ठेवण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु ह्याच व्यक्तीला सामाजिक आणि त्याच्या विशिष्ट जातीच्या चालीरीतींना धरूनच चालावे लागे.
व्यक्तीला ही सामाजिक व जातीची बंधने कडक असली तरी समाजाला व जातीला मात्र सामुदायिक हिशेबाने खूप लवचिकपणाही ह्या समाजव्यवस्थेत होता व असा कोणताही निर्बंध किंवा सामाजिक नियम नव्हता की, जो रूढीच्या जोरावर बदलता येत नसे. जे नवीन वर्ग किंवा समुदाय भारतीय समाजात आले त्यांना आपल्या नव्या चालीरीती ठेवण्याची मुभा होती. आपले आचार, आपले पूजाप्रकार ठेवता येत असत. आणि अशी विभिन्नता असूनही ते एक पोटजात होऊन त्यांच्यापेक्षा मूळच्या एखाद्या मोठ्या सामाजिक वर्णाचे, जातीचे मानले जात. विदेशीयांना मिळवून घ्यायला, आत्मसात करायला हा लवचिकपणाच उपयोगी पडला. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे काही मूलभूत नीतितत्त्वे, जीवनाकडे पाहण्याची एक विशिष्ट तत्त्वज्ञानात्मक दृष्टी, दुसर्या लोकांच्या मार्गाविषयी एक प्रकारची सहिष्णुता, यांची सर्वसामान्य पार्श्वभूमी होती.
जोपर्यंत सुरक्षितता आणि सुस्थिरता हीच ध्येये दृष्टीसमोर होती तोपर्यंत ही व्यवस्था कमीअधिक प्रमाणात बरी चालली, आणि आर्थिक स्थित्यंतरामुळे या समाज-व्यवस्थेचा पाया ढासळत चालला तेव्हासुध्दा थोडीफार सोय पाहण्याची पध्दत आल्यामुळे ही व्यवस्था चालू राहिली. परंतु सामाजिक प्रगतीची एक नवीन स्फोटक विचारसरणी जेव्हा आली व जुन्या स्थितीप्रिय विचारसरणीशी तिचे जमणे अशक्य झाले तेव्हा या समाजव्यवस्थेची खरी कसोटीची वेळ आली. पश्चिमेकडे झाले त्याप्रमाणे पूर्वेकडीलही प्राचीन, दृढमूल झालेल्या समाजपध्दतीचे आता उत्पादन सुरू झाले आहे. पश्चिमेकडे प्रगतीचाच उंच सुरात पुकारा अद्यापही सुरू असला तरी सुरक्षिततेचाही आवाज आता तेथे निघू लागला आहे. हिंदुस्थानात सुरक्षितता कोठे नसल्यामुळेच जुन्या चाकोरीतून बाहेर पडणे अपरिहार्य व आवश्यक होऊन बसले आहे, व अधिक सुरक्षितता ज्याने मिळेल तोच प्रगतीचा मार्ग ह्या दृष्टीने सारे विचार करू लागले आहेत.