प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 20
माझा वारसा कोणता आहे ? कशाचा मी वारसदार ? गेल्या सहस्त्रावधी लक्षावधी वर्षांत मानवजातीने जे जे मिळविले त्याचा मी वारसदार आहे; मानवजातीचे सारे विचार, सर्व भावना, तिची सुखदु:खे, तिच्या वेदना, यातना, आनंद, सर्वांचा मी वारसदार आहे; तिच्या विजयोन्मादाच्या गर्जना नि तिच्या पराभवसमयीच्या केविलवाण्या किंकाळ्या यांचा मी वारसदार आहे; हजारो लाखे वर्षांपासून सुरू झालेले ते आश्चर्यकारक साहस जे आजही पुढे चालले आहे, आपणांस खुणा करून बोलावीत आहे, त्या साहसाचा मी वारसदार आहे. हे सारे आणि इतर पुष्कळसे या सर्वांचा मी इतर मानवांसह वारसदार आहे. परंतु आपणा भारतवासीयांचा आणखी एक विशिष्ट वारसा आहे, अगदी केवळ आपलाच असे त्याला म्हणता येणार नाही, तरीही तो वारसा आपणालाच अधिक अंशाने मिळालेला आहे; ती देणगी आपल्या रक्तात आहे, आपल्या सर्व जीवनात आहे, आपल्या अणुरेणूंत आहे, रोमारोमात भरलेली आहे. आपण आज जे काही आहो आणि उद्या जे काही होणार आहो त्या सर्वांना आकार त्या विशिष्ट वारशाने दिलेला आहे.
या विशिष्ट वारशाचा, आजच्या काळात त्या वारशाचा कसा उपयोग करायचा हा विचार कितीतरी दिवसांपासून माझ्या मनात घोळत आहे, आणि यासंबंधीच काही लिहावे असे माझ्या मनात आहे. अर्थात हा विषय अति गहन आहे, गुंतागुंतीचा आहे. माझी छाती दडपूनही जाते. परंतु मी फार खोल न जाता या विषयाला निदान वरवर स्पर्श तरी करीत जाणार आहे. या विषयाचा समग्र प्रपंच, संपूर्ण ऊहापोह मी करू शकणार नाही. परंतु अशा प्रयत्नामुळे माझ्या मनाचे मी काही देणे दिले असे होईल; माझे स्वत:चे मन मला अधिक स्पष्ट दिसेल; विचाराच्या नि कृतीच्या पुढच्या पायर्यांसाठी त्याची मला तयारी करता येईल.
हे सारे लिहीत असताना माझी दृष्टी वैयक्तिक राहणार हे उघडच आहे. माझ्या मनात हा एकंदर विचार कसा आला, कसा वाढला, कसा साकार झाला, त्याने माझ्यावर काय परिणाम केला, माझ्या कृत्यांवर त्याची काय प्रतिक्रिया झाली हे सारे येथे येईल. कधी कधी तर अगदी व्यक्तिगत असे अनुभवही येथे येतील. विषयाच्या एकंदर व्यापक स्वरूपाशी त्यांचा संबंधही नसेल. परंतु त्या अनुभवांनी माझ्या मनोबुध्दीला विशेष रंग दिला असल्यामुळे एकंदर प्रश्नाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीवरही त्यामुळे परिणाम झालेला असणारच. आपण निरनिराळे देश व त्यांतील जनता यांच्याविषयी जी मते बनवितो ती अनेक गोष्टींवर आधारलेली असतात. ती बनविताना वैयक्तिक संबंध जर काही आले असतील तर त्यांचा फार परिणाम होतो. एखाद्या देशाच्या लोकांशी आपला जर व्यक्तिगत संबंध आला तर त्यांच्याविषयी आपण चुकीची मते बनवण्याचा बराचसा संभव असतो, त्यांना आपण सर्वस्वी परकी व विभिन्न असे मानतो.