प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 17
समन्वय व मेळ
चातुरर्वर्ण्याचा आरंभ
हिंदुस्थानात आर्यांच्या आगमनामुळे वांशिक आणि राजकीय असे नवे प्रश्न निर्माण झाले. द्राविडी लोक जित असले तरी त्यांच्यापाठीमागे संस्कृतीची प्राचीन परंपरा होती, परंतु आर्य जेते असल्यामुळे द्राविडांपेक्षा स्वत:ला फारच श्रेष्ठ समजत यात शंका नाही; व त्यामुळे या दोघांमध्ये फार मोठे अंतर पडले होते. शिवाय मागासलेल्या अशा मूळच्या आदिवासींच्याही काही जातिजमाती होत्या. त्या जंगलात राहात किंवा भ्रमन्ती करीत. या भिन्नभिन्न अशा मानववंशांच्या संघर्षातून व अन्योन्य क्रियाप्रतिक्रियांतून हळूहळू हे चातुरर्वर्ण्य उदयाला आले. पुढील काही शतकांत या चातुरर्वण्यांचा भारतीय जीवनावर अति खोल परिणाम व्हावयाचा होता. आर्यांत किंवा अनार्यांत हे चातुरर्वर्ण्य मुळात नव्हते असे दिसते. भिन्नभिन्न वंशांच्या लोकांची एकच सामाजिक संघटना करण्याचा तो एक प्रयत्न होता. त्या काळी प्रत्यक्ष असलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन केलेली ती एक संगतवार व्यवस्था होती. पुढे या व्यवस्थेतूनच अध:पात आला आणि आजही हे चातुरर्वर्ण्य म्हणजेच एक शाप किंवा ओझे झाले आहे हे वेगळे. परंतु पुढच्या काळात काय झाले त्यावरून प्राचीन काळी निर्माण झालेल्या व्यवस्थेवर मत देणे चूक आहे. चातुरर्वर्ण्य त्या काळातील परिस्थितीला व विचारांना अनुरूप होते. बहुतेक सर्वच प्राचीन संस्कृतीतून अशी ही वर्गवारी, क्रमवारी लावलेली दिसून येईल. एक चीनच दिसायला अपवाद दिसतो. इराणातील आर्यांतही ससेनियन काळात चातुर्विध विभागणी होती. परंतु त्याला जातिभेदाचे कडक स्वरूप पुढे आले नाही. पुष्कळशा प्राचीन संस्कृती-ग्रीक संस्कृतीसुध्दा-सर्वसाधारण जनतेच्या गुलामगिरीवर आधारलेल्या होत्या. हिंदुस्थानात किरकोळ स्वरूपात घरकामापुरती दासदासींची प्रथा असली तरी सारी जनताची जनता गुलाम म्हणून राबणारी नव्हती. प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात चातुरर्वर्ण्यासारखीच विभागणी केलेली आढळते. मध्ययुगीन कॅथॉलिक धर्मातही ही पध्दती होती.
प्रथम आर्य व अनार्य असे दोन स्पष्ट भेद पडले आणि हाच चातुरर्वर्ण्याचा जातिभेदाचा आरंभ होय. या अनार्यांमध्ये शिवाय द्रविडी आणि आदिवासी असे भेद होते. आरंभी हे सारे आर्य एका वर्गात होते, श्रमविभागाची कल्पना फारशी नव्हती. आर्य शब्द ज्या धातूपासून आला आहे त्या धातूचा अर्थ जमीन लागवडीस आणणे असा आहे. हे सारे आर्य शेतकरी होते. कृषी, शेती हा श्रेष्ठ धंदा मानला जाई. जमीन कसणाराच कधी उपाध्यायाचे तर कधी योध्दयाचे किंवा व्यापार्याचे अशी वेगवेगळी कामे करी. उपाध्यायांची अशी खास जात नव्हती. अनार्यांपासून आर्यांना वेगळे ठेवण्यासाठी म्हणून मुळात जातिभेद जन्माला आला, परंतु आर्यांवरच त्याची प्रतिक्रिया सुरू झाली. श्रमविभागाचे तत्व येऊन त्याच्या विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून घेण्याची प्रथा वाढली, आणि जे नवीन वर्ग पाडण्यात आले होते त्यांना जातीचे स्वरूप प्राप्त झाले.
ज्या काळात जितांचा समूळ उच्छेद करण्याची किंवा त्यांना दास करण्याची सर्वत्र प्रथा रूढ होती; त्या काळात या चातुरर्वर्ण्याने अधिक अहिंसक मार्गाने हा प्रश्न सोडविला; निरनिराळ्या धंद्यांतील वाढत्या प्रावीण्याशी हा मार्ग जुळत होता. समाजात जीवनाचा क्रम लावण्यात आला, कृषी करणारे तसेच व्यापारी, कारागीर या सर्वांचा वैश्य वर्ण झाला. राज्यकर्ते, योध्दे यांचा क्षत्रिय वर्ण झाला; धर्मकर्मे संपादणारे आणि विचार करणारे, राष्ट्राची ध्येये संभाळणारे, जिवंत ठेवणारे आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे यांचा ब्राह्मण वर्ण झाला. या तीन वर्णाच्याखाली चौथा शूद्र वर्ण होता. शेतकर्यांच्या खेरीज नुसती मजुरी करणारे व काही इतर धंदाव्यवसाय न येणारे जे लोक होते त्यांचा शूद्र वर्ण बनला, तो या त्रैवर्णिकांच्या खालचा झाला. या देशातील मूळच्या आदिवासींचे अनेक संघ होते; त्यांना हळूहळू या चातुरर्वर्ण्यात सामावून घेण्यात येऊन सामाजिक क्रमातील शेवटचा जो शूद्र वर्ण त्यात घालण्यात आले. चातुरर्वर्ण्याच्या बाहेरच्यांना अशा रीतीने चातुरर्वर्ण्यात घेऊन आत्मसात करण्याची ही क्रिया अखंड चालली होती. ही वर्णव्यवस्था पूर्वीच्या काळी वाहत्या पाण्यासारखी असावी, व पाण्यात पाणी तेव्हाच मिसळत असले पाहिजे. पण पुढे पुढे बर्याच काळानंतर हे वाहते स्वरूप जाऊन वर्णव्यवस्था कडक झाली. सत्ताधारी वर्गाला अधिक हक्क असत, सोयी असत. जो कोणी राज्य जिंकून किंवा अन्य मार्गांनी सत्ताधीश होई त्याला त्याची इच्छा असेल तर क्षत्रिय वर्गात स्थान मिळे व कोणत्या तरी प्राचीन आर्यवीराच्या नावाशी संबंध जोडणारी त्याची वंशावळी तो भाटाकडून तयार करवी.
आर्य शब्दातील आरंभीचा वंशवाचक अर्थ हळूहळू लोपून आर्य म्हणजे थोर, उदारचरित असा अर्थ रूढ झाला. तसेच अनार्य शब्दातीलही वंशवाचकत्व लोपून त्याचा अर्थ हलका, क्षुद्र असा झाला व भटक्या जाती, जंगलात राहणारे यांना हे नाव पडले.