प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 20
भारतीय संस्कृतीची अखंड धारा
अशा रीतीने ह्या अतिप्राचीन काळातच संस्कृती व सुधारणा यांचे आरंभीचे अंकुर आपणांस दिसतात. हेच अंकुर पुढे वाढले, बहरले. आणि तीच फुलकुसुमित समृध्द अशी संस्कृती अनेक फेरफार होत असूनही आजपर्यंत चालत आलेली आहे. या प्राचीन काळात हिंदी संस्कृतीची मूलभूत ध्येये, हिंदी संस्कृतीतील विधायक तत्त्वे आकार घेताना दिसतात. या ध्येयांनी आणि जीवनाकडे व जगाकडे पाहण्याची जी दृष्टी तेव्हा निश्चित झाली, त्या दृष्टीने पुढच्या काळातील वाङ्मय, तत्त्वज्ञान, नाटक व नृत्य या सर्वांवर आपार परिणाम केला आहे. त्याबरोबरच त्या काळातही वर्ज्य-अवर्ज्य, शिवाशिव, विटाळ-चांडाळ या कल्पनेचीही बीजे दिसतात. हीच बीजे फोफावून अखेर त्याचा परिणाम मनुष्याचे जीवन प्रत्येक गोष्टीत जखडून टाकणार्या हल्लीच्या जातिभेदाच्या मगरमिठीत झाला. मुळात जे चातुरर्वर्ण्य तत्कालीन परिस्थितीची नीट घडी बसविण्यासाठी व समाजाला स्थिरता यावी, सामर्थ्य यावे म्हणून निर्माण झाले, त्याचाच अखेर तुरुंग निर्माण होऊन त्यातच समाज पिचत राहिला व मनुष्याचे मन गुदमरून गेले. समाजाला स्थैर्य मिळाले पण ते मिळण्याकरता अखेर प्रगतीचा बळी द्यावा लागला.
परंतु प्रगतीची अखेर लवकर झाली नाही. मध्यंतरी कितीतरी दीर्घ काळ गेला, आणि या दीर्घ काळात चातुरर्वर्ण्याच्या चौकटीत राहूनही मूळचा जोरदार अंकुर शतमार्गांनी फोफावला. सर्व गोष्टींतील प्रगतीची मूळची रसरशीत प्रेरणा सर्व भारतवर्षभर पसरून भारतवर्षाच्या बाहेरही पूर्व समुद्रावरून पलीकडे गेली, आणि तिच्यातील टिकून राहण्याची शक्ती अशी चिवट होती की, पुन्हा पुन्हा हल्ले आले, स्वार्या आल्या तरी ती उभीच. आचार्य मॅक्डोनल 'संस्कृत वाङ्मयाचा इतिहास' या आपल्या ग्रंथात लिहितात, ''भारतीय वाङ्मयाचे महत्त्व ते स्वयंभू आहे म्हणून आहे.'' ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीस ग्रीकांनी हिंदुस्थानवर स्वारी केली. परंतु त्या स्वारीच्या आधीच हिंदी लोकांनी स्वत:ची भारतीय संस्कृती संपूर्णपणे विकसित करून ठेवली होती. तिच्यावर परकीयांची छाया पडली नव्हती; आणि पुढे इराणी, तुराणी, ग्रीक, सिथियन, मुसलमान यांच्या लाटांवर लाटा स्वार्या करीत, मुलूख जिंकीत आल्या तरी या इंडो-आर्यन वंशाचे राष्ट्रीय जीवन व राष्ट्रीय वाङ्मय यांचा विकास अप्रतिहत चालूच राहिला; ब्रिटिशांची सत्ता स्थापन होईपर्यंत बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा विशेष परिणाम भारतीय जीवनाच्या व वाङ्मयाच्या राष्ट्रीय वाढीवर झाला नाही, त्याला निराळे वळण, निराळे स्वरूप कोणी देऊ शकला नाही. अशा प्रकारे सर्वतंत्र स्वतंत्र असा विकास, अशी स्वत:ची स्वतंत्र उत्क्रांती करून घेतल्याचा अनुभव इंडो-युरोपियनांच्या समूहातील दुसर्या कोणत्याही शाखेला आलेला नाही. भाषा, साहित्य, धार्मिक श्रध्दा व धार्मिक विधी, सामाजिक चालीरीती, नाट्यादी कला इत्यादी गोष्टींत तीन हजार वर्षांहून अधिक काळ अप्रतिहित विकास करीत गेल्याचे चीनखेरीज दुसरे उदाहरण झालेले नाही. परंतु हिंदुस्थान काही या काळात एकलकोंडा अलग होऊन बसला नव्हता. सार्या जगाशी त्याचे संबंध येत होते. इराण, ग्रीस, चीन, मध्य आशिया आणि इतर भाग यांच्याशी भारताचा अव्याहत व जिवंत संबंध होता. हे संबंध सारखे चालू असूनही मूळची संस्कृती घवघवीत राहिली. म्हणून असे म्हणणे भाग आहे की, त्या संस्कृतीतच असे टिकून राहण्याचे काही अद्भुत सामर्थ्य, जीवन नीट समजून घेण्याची विद्या, जीवनाच्या अंत:स्फूर्तीचे झरे असले पाहिजेत. कारण तीन-चार हजार वर्षे अशी अव्याहत विकासाची परंपरा टिकणे ही अद्भुत व असामान्य गोष्ट आहे.'' सुप्रसिध्द पंडित आणि पौर्वात्य विद्याविशारद मॅक्समुल्लर या गोष्टीवर भर देऊन म्हणतात, ''हिन्दू विचाराचे अतिप्राचीन स्वरूप आणि आजचे अती अर्वाचीन स्वरूप यांच्यात तीन हजार वर्षांवर अक्षरश: अखंड परंपरा टिकली आहे.'' १८८२ मध्ये केंब्रिज विद्यापीठासमोर आपल्या व्याख्यानात मॅक्समुल्लर अगदी भरात येऊन म्हणाले, ''निसर्गाने दिलेल्या सौंदर्य, सामर्थ्य आणि संपत्ती यांनी जास्तीतजास्त संपन्न असा देश या भूतलावर तुम्ही पाहू जाल, असा एखादा स्वर्ग पृथ्वीवर कोठे आहे म्हणून शोधाल, तर मी तुम्हांला हिंदुस्थानाकडे बोट करून दाखवीन. मला जर कोणी विचारले की कोणत्या आकाशाखाली मानवी मनाने स्वत:च्या उत्तमोत्तम शक्तींचा जास्तीत जास्त विकास करून घेतला, जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा महत्तम प्रश्नावर खोल-गंभीर विचार केला आणि प्लेटो व कान्ट यांची पारायणे करणारांचे एकदम डोळे उघडावे अशी उत्तरे कोणी शोधून काढली तर मी पुन्हा हिंदुस्थानाकडेच बोट करीन. आपण युरोपातील लोक ग्रीक, रोमन आणि सेमिटिक जातींतील ज्यू यांच्या विचारावर पोसलेले आहोत. आपले आंतरिक जीवन अधिक संपूर्ण व्हावे, अधिक व्यापक व्हावे, अधिक विश्वात्मक व्हावे, थोडक्यात खर्या अर्थाने ते मानवी व्हावे, या जगातील जीवनासाठी म्हणूनच केवळ नव्हे, तर ते आमूलाग्र बदलून आध्यात्मिक शाश्वत जीवनासाठी आपले हे जीवन जगावे असे वाटत असेल, आज आपणाला जरूर असलेले, आपले विकृत जीवन दुरुस्त करणारे रसायन कोठे मिळणार असेल तर मी पुन्हा हिंदुस्थानाकडेच बोट करीन.''
जवळजवळ अर्ध्या शतकानंतर याच सुरात रोमाँ रोलाँ लिहितात, ''अतिप्राचीन काली या भूतलावर मानवी जीवनाचे मायामय स्वप्न सुरू झाल्यापासून चैतन्यपूर्ण मानवांना पडलेली सर्व आशास्वप्ने जर कोठे घर करून राहिली असतील तर ते घर हिंदुस्थान.''