प्रकरण ६ : नवीन समस्या 29
लोकशाही पध्दती या देशात संपूर्णपणे माहीत होती. एवढेच नव्हे तर सामाजिक जीवनात, स्थानिक कारभारात, धंदेवाईक संघांत, धार्मिक सरिषदांत, सर्वत्र याच पध्दतीने कामकाज चाले. सर्वसामान्य व्यवहाराची हीच रीत होती. जातिव्यवस्थेत काही दोष असले तरी त्या त्या जातींनी ही लोकशाही पध्दती जिवंत ठेवली. काम कसे चालवायचे, निवडणूक कशी करायची, वादविवाद कसे करायचे यासंबंधीचे सविस्तर नियम होते. बौध्दधर्मीयांच्या आरंभीच्या सभापरिषदा कशा भरत याविषयी लिहिताना झेटलंडसाहेब लिहितात, ''आपणाला आश्चर्य वाटेल की दोन हजार वर्षांपूर्वीच्या त्या बौध्दधर्मीय परिषदांतून एक प्रकारची पार्लमेंटरी पध्दती होती. आपल्या सामान्य प्रतिनिधींच्या सभेत ज्याप्रमाणे 'स्पीकर' असतो, त्याप्रमाणे बौध्दधर्मीय सभांतही विशिष्ट अधिकारी असे आणि तो सभेची प्रतिष्ठा सांभाळी. आपल्या पार्लमेंटरी पध्दतीत मुख्य प्रतोद असतो, त्याप्रमाणे या सभांतही दुसरा एक अधिकारी असे. अवश्य तेवढे सभासद उपस्थित राहतील याची तो काळजी घेई. ज्याला सुरुवात करायची असे तो आपली सूचना सभेसमोर मांडी. मग तिच्यावर वादविवाद होई. कधी कधी ती चर्चा एकदाच होई, तर कधी कधी तीन वेळा होई. आपल्याकडे एखादे बिल पास व्हायला त्याचे तीनदा वाचन व्हावे लागते, त्यातलाच हा प्रकार दिसतो. वादविवादात मतभेद आहे असे दिसून आले तर बहुमताने निर्णय घेत. मतदान गुप्तपध्दतीचे असे.'' *
प्राचीन हिंदी सामाजिक रचनेत याप्रमाणे काही गुण होते आणि असे काही गुण नसते तर ती रचना इतकी वर्षे टिकती ना हे उघड आहे. या सामाजिक रचनेला आधार भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ध्येयाचा होता. मनुष्याचा विकास होऊन तो परिपूर्ण व्हावा, धनसंचय वृत्तीपेक्षा चांगुलपणा, खरेपणा, मनाला आल्हाद देणारे सर्व गुण मानवी जीवनात यावे, ते जीवन 'सत्यं शिवं सुंदरम्' व्हावे हे ते ध्येय होते. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा ही एकत्र येणार नाहीत असा या सामजरचनेत प्रयत्न होता. व्यक्ती व समूह यांच्या हक्कांवर भर न देता, त्यांच्या कर्तव्यावर भर दिला होता. स्मृतींमधून निरनिराळ्या वर्णांची कर्तव्यकर्मे, त्यांचे त्यांचे धर्म यांची वर्णने आहेत. परंतु त्यांच्या हक्कांची सनद कोठे दिलेली नाही. व्यक्तिसमूह विशेषत: खेडेगावे, स्वयंपूर्ण असावीत असा उद्देश होता. वेगळ्या अर्थी समाजातल्या जातीसुध्दा अशा स्वयंपूर्ण करण्याचा उद्देशही होता. ही समाजव्यवस्था चोहोबाजूंनी बंद केलेली होती. या चारी बाजूंच्या चौकटीत आतल्या आत त्यातील जातींत लवचिकपणा होता, बदलण्याची मुभा होती, स्वतंत्रता होती, परंतु अपरिहार्यपणे हे हळूहळू कमी होऊन कडकपणा वाढला, तुटक वृत्ती वाढली. उत्तरोत्तर विकासक्षमता जात चालली व बुध्दीचे नवीन नवीन झरे मोकळे करणे थांबले. प्रबळ मिरासदार वर्ग क्रांतिकारक बदल होऊ देत नसत व ज्ञानही दुसर्या वर्गात पसरणार नाही अशी त्यांनी खबरदारी घेतली. वरिष्ठ वर्गातील लोकांना माहीत असे की त्यात तथ्य नाही, अशा भोळसट कल्पना मुद्दाम तशाच राहू दिल्या गेल्या, एवढेच नव्हे, तर त्यात आणखी भर घालण्यात आली. राष्ट्रीय अर्थव्यवस्थाच नव्हे, राष्ट्राची विचारशक्तीही गतिहीन, नुसते जुने मानणारी, हलण्याची शक्तीसुध्दा न राहिलेली विकासहीन, प्रगतिहीन झाली.
-------------------
* जी. टी. गॅरॅट यांच्या ''The Legaoy of India'', 'हिंदुस्थानचा वारसा'- या पुस्तकातून उद्धृत.