प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 81
अशा दृष्टीने विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या युगात वावरतो आहोत त्यातील सर्वोच्च ध्येयांशी समरस होऊन आपण आपले कार्य केले पाहिजे, मात्र ती ध्येये आहेत त्यापेक्षा अधिक ध्येये आपल्यापुढे ठेवावयाला किंवा त्या ध्येयांना आपल्या विशिष्ट राष्ट्रीय मूळप्रकृतीला, आपल्या नैसर्गिक स्वभावाला अनुकूल असे वळण द्यावयाला प्रत्यवाय नाही. मानवता कल्याण-वाद-प्रवृत्त व विज्ञानशास्त्रप्रवृत्त असे दोन वर्ग या ध्येयांचे पाडता येतील. वरकरणी पाहू गेले तर या दोन प्रवृत्तींचा एकमेकीशी विरोध आतापर्यंत होत आला आहे, परंतु आतापर्यंत नि:शंकपणे मान्य केल्या गेलेल्या सर्वच मूल्यांविषयी शंका घेणार्या विचारसरणीची जी प्रचंड लाट वर्तमानकाळी उसळली आहे तिच्यापुढे या दोन प्रवृत्तींमधीलच नव्हे, तर बाह्य सृष्टीविषयीचे विज्ञानशास्त्र व अंत:सृष्टीविषयीचे आत्मनिरीक्षणशास्त्र यांच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या सीमा देखील पुसट होऊन त्यांच्यातले भेद नाहीसे होत आहेत. मानवताकल्याणवादप्रवृत्ती व विज्ञानशास्त्रप्रवृत्ती यांचे उत्तरोत्तर संयोगीकरण चालले आहे, आणि ह्या संयोगातून विज्ञानशास्त्रीय पध्दतीने मानवतेचे कल्याण साधण्याची प्रवृत्ती आली आहे. आपल्या पध्दतीने जेवढे प्रत्यक्षसिध्द झाले असेल तेवढेच मान्य करण्याचा विज्ञानशास्त्राचा आग्रह अद्यापही असला तरी ते शास्त्रदेखील ज्ञानाच्या इतर प्रांतांच्या अगदी निकट येऊन पोचले आहे, निदान आपल्या पध्दतीखेरीज दुसर्या कोणत्याही पध्दतीविषयी जो तिरस्कार त्या शास्त्राला वाटत असे तो तरी खास नाहीसा झाला आहे. आपली पंचेंद्रिये व त्यांच्या द्वारा जेवढ्याचे ज्ञान होईल तेवढ्यातच काही सारे विश्व सामावलेले नाही हे स्पष्ट आहे. विज्ञानशास्त्रज्ञांनी जडभौतिक सृष्टीचे जे काही चित्र ठरवले होते त्यात गेल्या पंचवीस वर्षात खूपच मोठी उलटापालट झाली आहे. जुन्या विज्ञानशास्त्राची कल्पना अशी की, निसर्ग विद्वान शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत की, विज्ञानशास्त्राचे सारसर्वस्व ''निसर्ग म्हणजे मानवाव्यतिरिक्त काही भिन्न, ही मानवाची कल्पना विलयाला गेली आहे'' हेच आहे. एकूण पुन्हा अशी अवस्था आली आहे की, उपनिषदांतील विचारवंतांना ज्या प्रश्नाची मोठी अडचण आली होती तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. आता हा ज्ञानविषय कसा होऊ शकेल ? बाह्य वस्तू पाहू शकणार्या डोळ्यांना आपले स्वत:चे दर्शन व्हावे कसे ? बाह्यसृष्टी ही अंत:सृष्टीतच समाविष्ट, त्याच तत्त्वाची बनलेली असली तर आपल्याला जे काही गोचर होते किंवा आपण जे काही कल्पतो ती केवळ आपल्या मनानेच निर्माण केलेली एक मूर्त कल्पना आहे, मनाचा एक विक्षेप आहे, आणि मग विश्व, निसर्ग, आत्मा, मन, देह ही सारी, सारी अंत:सृष्टी व बहि:सृष्टी एकाच तत्त्वाची. तेव्हा या विशाल पसार्याच्या प्रचंड योजनेचे वस्तुनिष्ठ ज्ञान, आपल्या ह्या मर्यादित बुध्दीच्या चौकटीत आपल्याला होणार तरी कसे ? विज्ञानशास्त्राचा या प्रश्नाशी दुरून दुरून संबंध येऊ लागला आहे व त्यांची उत्तरे जरी विज्ञानशास्त्राच्या हाती लागली नाहीत तरी वर्तमानकालातील दृढनिश्चयी आस्थायुक्त विज्ञानशास्त्रवेत्ते हे पूर्वीच्या काळातील तत्त्वज्ञानवेत्ते व धर्मवेत्ते यांचे प्रतिमारूपच आहेत. प्रोफेसर आल्बर्ट आईन्स्टीन म्हणतात, ''कायावाचामनेकरून अत्यंत आस्थेने विज्ञानशास्त्राला वाहून घेतलेले कार्यकर्ते हेच या आपल्या या जडभौतिकवादाच्या युगातले खरे धर्मनिष्ठ लोक होत.''*
----------------------
* पन्नास वर्षांपूर्वीच स्वामी विवेकानंदांचे सुध्दा असे मत होते की, आधुनिक विज्ञानशास्त्र म्हणजे मानवाच्या खर्या धार्मिक बुध्दीचाच एक आविष्कार आहे, कारण विज्ञानशास्त्राने आपल्या परीने आस्थापूर्वक रीतीने सत्याचाच शोध चालविला आहे.
या सार्याचे एकूण तात्पर्य हे की, विचारवंतांची विज्ञानशास्त्रावर श्रध्दा आहे खरी, पण त्यांना अशीही भीती पडली आहे की, केवळ प्रत्यक्ष अनुभवाला आले तेवढेच खरे मानून चालणारे हेतुशून्य विज्ञानशास्त्र नुसते एकटे या कामी पुरे पडणार नाही. जीवनाला इतक्या खूप सामग्रीचा संसार पुरविण्याच्या नादात विज्ञानशास्त्राचे जीवनाच्या हेतूकडे तर दुर्लक्ष झाले नसेल ? आता प्रयत्न असा चालला आहे की, अनुभवाने आकलन होऊ शकणारी जडभौतिक वास्तव सृष्टी व त्या जडभौतिकवादाकडे अवास्तव लक्ष लागल्यामुळे तिकडे माणसाचे अंतर्याम, मानवी प्राण कासावीस होत चालले, असे उत्तरोत्तर स्पष्ट दिसून येऊ लागले. प्राचीन काळी तत्त्वज्ञान्यांना जो पेच पडला होता तो वेगळ्या रूपाने वेगळ्या संदर्भात पुन्हा पुढे आला आहे; सृष्टीतील इंद्रियगोचर आधिभौतिक जीवन व मानवी व्यक्तीचे अंतर्यामी आध्यात्मिक जीवन या दोन्हींचा मेळ कसा बसवावा ? वैद्यांना आता कळून आले आहे की, एक व्यक्ती घ्या किंवा त्यांचा समष्टिरूपाने बनलेला समाज घ्या, त्यांच्या नुसत्या देहावर उपाययोजना करून भागत नाही. अलीकडच्या काही वर्षांच्या कालात, मानसिक रोगनिदानपध्दतीने शोधाअंती ठरविलेल्या निर्णयांचे उत्तम ज्ञान असलेल्या डॉक्टरांनी, रोगाचे निदान करताना इंद्रियरचनाविकृती व इंद्रियव्यापारविकृती असे रोगांचे दोन परस्पर विरोधीवर्ग मानणे सोडून दिले आहे. प्लेटो म्हणतो, रोगावर उपाययोजना करण्याच्या पध्दतीतील सर्वांत मोठा दोष हा की, वस्तुत: देह व आत्मा मिळून एकच आविभाज्य व्यक्ती असूनही देहाचे वैद्य वेगळे व आत्म्याचे वैद्य वेगळे अशी स्थिती आहे.