प्रकरण ५ : युगायुगांतून 86
परंतु उत्तरेचे आता जरी तितके प्रभुत्व राहिले नसले, पूर्वीचे स्थान उरले नसले, नाना छोट्या राज्यांत सारी उत्तर जरी विभागली गेली असली, तरीही उत्तरेकडचे जीवन अद्याप समृध्द व सुसंस्कृत राहिले होते. सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानात्मक चळवळींची कितीतरी केंद्रे उत्तर हिंदुस्थानात होती. पूर्वीप्रमाणे अजूनही काशी हे धार्मिक व तत्त्वज्ञानात्मक विचारांचे केंद्र होते व जो कोणी नवीन सिध्दान्त मांडी, एखादा नवीन विचार सांगे, त्याला प्रथम काशीत जाऊन ते सिध्द करावे लागे. तसेच बौध्दधर्मीय आणि ब्राह्मणधर्मीय ज्ञानाचे काश्मीरही पुष्कळ वर्षे माहेरघर होते. उत्तर हिंदुस्थान मोठमोठी विद्यापीठे भरभराईत होती, त्यांपैकी नालंदा विद्यापीठाची कीर्ती देशभर होती. तेथील अध्ययन-अध्यापनाची मोठी ख्याती होती. नालंदाला अध्ययन झालेला म्हणजे मोठा विद्वान व सुसंस्कृत मानला जाई. त्या विद्यापीठात प्रवेश मिळणे सोपे नसे, कारण काही एका विशिष्ट दर्जाचे ज्ञान ज्याच्याजवळ असेल त्यालाच तेथे प्रवेश मिळे. निरनिराळ्या विषयांत पारंगत होण्याची तेथे सोय होती. चीन, जपान, तिबेट येवढेच नव्हे, तर असे सांगतात की कोरिया, मंगोलिया, बुखारा येथूनही विद्यार्थी नालंदा येथे येत. बौध्दधर्म आणि ब्राह्मणधर्म या दोहोंचे धार्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक शिक्षण तेथे मिळेच, परंतु इतरही अनेक भोतिक विषयांचे, व्यावहारिक विद्यांचे शिक्षण तेथे देण्यात येई. तेथे कला मंदिर होते, शिल्पकलेचे खाते होते, आयुर्वेदाची शाखा होती; शेतकी शिक्षण होते, दुग्धालय होते, पशुसंवर्धन शाळा होती. विद्यापीठात सारे बौध्दिक वातावरण असे. मोठमोठ्या चर्चा चालत, खंडन-मंडणाच्या खडाजंगी होत. भारतीय संस्कृतीच्या बाहेरच्या जगात जो प्रसार झाला त्याचे श्रेय नालंदातून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना बरेचसे आहे.
दुसरी महत्त्वाची विद्यापीठाची जागा म्हणजे विक्रमशीला. हे विद्यापीठ बिहारमधील हल्लीच्या भागलपूरजवळ होते. काठेवाडात वल्लभी येथेही एक मोठे विद्यापीठ होते. गुप्तकाळात उज्जयिनीचे विद्यापीठ चांगलेच भरभराटले होते. दक्षिणेकडे अमरावतीचे विद्यापीठ विख्यात होते.
परंतु पहिल्या हजार वर्षांचा हा काळ संपत आला तेव्हा त्या सुधारणासंपन्न जीवनपध्दतीचा सायंकाळ जवळ आला असे वाटू लागले. प्रभातकाळची प्रभा लोपून दूर गेली. मध्यान्हही उलटून गेला होता. तिसरा प्रहर सुरू होता. दक्षिणेकडे अजूनही चैतन्य होते, उत्साहशक्ती होती, ती काही शतके राहिली. हिंदी वसाहतींतून ख्रिस्त शकाच्या दुसर्या हजार वर्षांच्या थेट मध्यापर्यंत समाजाचे जीवन जोरात चालले होते, वाढत होते, पण त्यांना ताजे रक्त पुरविणारे हृदय, भारत निर्जीव झालेला, नाडीचे ठोके मंद झालेले दिसतात. आणि हळूहळू त्यामुळे सार्या अवयवांवरच अवकळा आणि प्रेतकळा आली. आठव्या शतकातील शंकाराचार्यांनंतर तत्वज्ञानात थोर पुरुष कोणी दिसत नाही. नंतरचे सारे भाष्यकार, टीकाकार व वादपंडित तसे पाहिले तर शंकराचार्यसुध्दा दक्षिणेकडचेच. जिज्ञासूवृत्तीचा लोप होऊन, बुध्दीची संशोधनात्मक वृत्ती जाऊन, तेच तेच ठरवी घटापटाचे तर्कशास्त्र, वांझोटे वादविवाद काय ते सुरू राहिलेले दिसतात. बौध्दधर्म आणि ब्राह्मणधर्म- या दोहोंचाही अध:पात झाला व शेकडो प्रकारचे क्षुद्र पूजाप्रकार रूढ झाले, विशेषत: शाक्तांचे बीभत्स प्रकार, तांत्रिकांचे वाममार्ग, योगशास्त्राची विकृत रूपे ठायी ठायी दिसू लागली.