प्रकरण ५ : युगायुगांतून 37
हिंदुस्थानातील आर्यधर्म हा मुख्यत: राष्ट्रधर्म होता, या राष्ट्रपुरता तो मर्यादित होता. या राष्ट्रातील सर्वांना चातुरर्वर्ण्याच्या चौकटीत त्याने बसविले होते, त्या सामाजिक व्यवस्थेमुळेही आर्यधर्माला राष्ट्रीय असे राष्ट्रापुरते मर्यादित स्वरूप आले होते. आर्यधर्माचा प्रचार करणारे धर्मोपदेशक दूरवर गेले नाहीत; इतरांना स्वत:च्या धर्माची दीक्षा त्यांनी दिली नाही; भारताच्या सीमांच्या पलीकडे त्यांनी पाहिले नाही. त्यांचे सर्व काम देशात होते, ते गाजावाजा न करता, न कळत मनाची पकड घेत सारखे सुरू होते. जुन्यानव्याचे मीलन केले जात होते. नवीन लोक येत ते तेथल्या व्यवस्थेत विलीन होऊन त्यांची स्वत:ची बहुधा एखादी नवीन जात बने. त्या काळात बाह्य जगासंबंधीची ही वृत्ती स्वाभाविक होती. कारण दळणवळण मुष्किलीचे होते व परदेशाशी संबंध जोडण्याची फारशी आवश्यकताही भासत नसे. व्यापार किंवा काही अन्य कारणास्तव बाह्य जगाशी संबंध असे, परंतु हिंदी जीवनावर किंवा व्यवहारावर त्याचा फारसा परिणाम होत नसे. भारतीय जीवनाचा समुद्र स्वयंतृप्त होता. नाना प्रवाहांना स्वच्छंद विहार करू देण्याइतका तो विविध व विशाल होता. स्वत:मध्ये तो मग्न होता, स्वत:ची त्याला जाणीव होती. आपल्या सीमेपलीकडे, दुनियेत काय घडत आहे याची फिकीर त्याने कधी केली नाही. अशा या शांत सागराच्या मध्येच एक मोठा झरा उसळून वर आला. स्वच्छ आणि निर्मळ जलधारा त्यातून भरपूर वाहू लागली. त्या समुद्राच्या वरच्या भागावर क्षणभर तरंग उठले; लाटा उठल्या; आणि या लाटा दूरवर गेल्या. समुद्राच्या मर्यादा विसरून त्या सर्वत्र पसरल्या. मनुष्यकृत आणि निसर्गकृत सीमा ओलांडून त्या धावत सुटल्या. बुध्दाच्या शिकवणीच्या या झर्याचा संदेश सार्या भरतखंडाला होता, इतकेच नव्हे, तर सार्या मानवजातीला होता. चांगले जीवन जगा असे त्यांनी सर्व मानवांना हाक मारून सांगितले. जाती, वर्ण, देश, राष्ट्र कशाच्याच मर्यादा त्यांच्यासमोर नव्हत्या, त्याच्यासमोर अखिल मानवजात उभी होती.
तत्कालीन भारताला ही अतिभारतीय दृष्टी नवीन होती. मोठ्या प्रमाणावर या दृष्टीचा अवलंब करून वागणारा पहिला पुरुष म्हणजे सम्राट अशोक. त्याने आपले धर्मप्रसारक व आपले राजकीय प्रतिनिधी दिगंतात धाडले. भारताला बाह्य जगाची जाणीव येऊ लागली, आणि ख्रिस्त शकाच्या पहिल्या काही शतकांत प्रचंड प्रमाणावर वसाहती स्थापण्याचा महान उद्योग भारतीयांनी जो केला, त्याला ही नवीन जाणीवच प्रेरणारूप झाली असावी. हिंदू राजांनीच वसाहतीच्या त्या साहसांना सर्व प्रकारे उत्तेजन दिले होते, आणि या वसाहतवाल्यांनी ब्राह्मणधर्म आणि आर्यसंस्कृती सर्वत्र नेली. स्वयंतृप्त धर्म आणि स्वयंतृप्त संस्कृती यांना या नवीन अनुभव होता. जगापासून स्वत:ला अलिप्त ठेवू पाहणार्या चातुरर्वर्ण्यप्रधान समाजरचनेचा हा नवीन विकास होता. प्रभावी प्रेरणेमुळे व त्यांच्या त्या मूळच्या स्वयंतृत्प दृष्टीत फरक पडल्यामुळे हे घडणे शक्य झाले. ही प्रेरणा नाना शक्तींतून मिळाली असेल. वाढत्या सामाजिक गरजांमुळे, वाढत्या व्यापारामुळे. दृष्टीत हा बदल झाला असेल. परंतु बौध्दधर्मामुळे जे परकीयांशी संबंध आले ते सर्वांत महत्त्वाचे कारण असावे. त्या काळातील हिंदुधर्म सामर्थ्यसंपन्न होता. अपरंपार उत्साह त्याच्यात उसळत होता, परंतु परराष्ट्राकडे त्याने फारसे लक्ष दिले नव्हते. नवीन बौध्दधर्मात सर्व मानवांचा समावेश करण्याची जी वृत्ती होती तिचा हिंदुधर्मातील उत्साहशक्तीवर परिणाम होऊन तीही सर्वत्र पसरू लागली, नाना देशांत जाऊ लागली.
बौध्दधर्माचा आर्यधर्मावर आणखी एक परिणाम म्हणजे विधिवितानांचे अवडंबर कमी झाले; पशुयज्ञ कमी झाले; लोकांतील नानाविध धर्मप्रकार कमी झाले. वेद आणि उपनिषदे यांत आधीच असलेल्या अहिंसा तत्त्वावर बौध्दधर्माने आणि त्याहून अधिक जैनधर्माने जोर दिला. आसमंताच्या समग्र जीवनाबद्दल अधिक आदर वाटू लागला. मानवी प्राणच नव्हे, तर पशुपक्ष्यांचेही प्राण मोलाचे वाटू लागले आणि या सर्व गोष्टींच्या पाठीमागे भलेपणाने जगण्याची अधिक उच्च जीवन, सुंदरतर जीवन जगण्याची धडपड सुरू होतीच.