प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 14
परंतु ग्रामोद्योगांच्या विध्वंसामुळे ग्रामराज्यांना जोराचा तडाखा बसला. उद्योगधंदे आणि शेती यांतील मेळ नाहीसा झाला. पारंपारिक श्रमविभागाचे तत्त्व धुळीस मिळाले. परंपरागत धंद्यात नसलेल्या मोकळ्या व्यक्तींना कोठल्याही समूहाच्या उद्योगात गुंतविणे सोपे राहिले नाही. जमीनदारी पध्दतीमुळे आणखी जबर आघात झाला. जमिनीच्या मालकी पध्दतीतच आमूलाग्र फरक करण्यात आला. आजपर्यंत जमिनीवर सामुदायिक मालकी होती. जमिनीवर नसली तरी जमिनीच्या उत्पन्नावर सामुदायिक सत्ता होती. भारतीय पध्दतीतील चांगुलपणा न आवडल्यामुळे किंवा हेतुपुरस्सर स्वत:चे काही हेतू मनात धरून ब्रिटिशांनी ही जमीनदारी पध्दती आणिली. ब्रिटिश गव्हर्नर इंग्लंडमधील जमीनदार पध्दतीचे अभिमानी आणि प्रतिनिधी होते. त्यांनी स्वत:च्या देशातील पध्दतीनुरूप येथे प्रकार सुरू केला. आरंभी थोड्या मुदतीचे शेती सारा वसूल करून पाठवणारे पुढे हेचे जमीनदार झाले. जमीन आणि तिचे उत्पन्न यावरील ग्रामसंस्थेची सत्ता संपूर्णपणे नष्ट करण्यात आली; आजपर्यंत ग्रामसंस्थेचे जे काम असे, तिच्याकडे जी व्यवस्था असे, त्या सर्वांचा मालक हा नवीन उपटसुंभ जमीनदार बनला. गावातील सर्व लोकांचा म्हणून गावाचा कारभार चाले व गावचे जीवनव्यवहार सामुदायिक असत. ती पध्दती मोडली व अधिकार असत तेही हळूहळू नाहीसे होऊ लागले.
जमिनीची मालकी देण्याच्या या पध्दतीमुळे आर्थिक व्यवस्थेत मोठा फेर झाला असे नव्हे, तर त्याचे परिणाम अधिक खोलवर गेले व सहकारी पध्दतीने सामुदायिक सामाजिक जीवन चालविण्याची व्यवस्था असावी अशी जी या देशातील योजना असे त्या योजनेवरच घाव पडला. जमिनीची मालकी असणारा एक नवीन वर्ग उदयाला आला. इंग्रज सरकारने निर्माण केलेला हा वर्ग त्या सरकारशी अधिक एकरूप होऊन वागे. जुनी पध्दती नष्ट झाल्यामुळे नवे प्रश्न उत्पन्न झाले. हिंदु-मुसलमानांचा नवीन प्रश्न यातूनच उत्पन्न झालेला दिसेल. जमीनदारी पध्दत प्रथम बंगाल, बिहारमध्ये निर्माण करण्यात आली. कायमधारा पध्दतीच्या नावाखाली नवीन जमीनदारवर्ग उत्पन्न करण्यात आले. परंतु जमिनीचा सारा कायम ठराविक केल्यामुळे तो वाढवता येत नसल्यामुळे, सरकारचे या पध्दतीत नुकसान आहे असे आढळून आले. त्यामुळे भारताच्या इतर भागात कायमधारा पध्दती अमलात आणली गेली नाही. वेळोवेळी शेतसार्यात पुन:पुन्हा वाढ करण्यात येई. काही प्रांतामध्ये रयतवारी पध्दती रूढ करण्यात येऊन लहानलहान जमिनीचे मालक असे शेतकरी निर्माण करण्यात आले. शेतसारा वसूल करण्याच्या बाबतीतील अत्यंत अनुदार धोरणामुळे बंगालमधील जुना जमीनदारवर्ग भिकेस लागला, व त्यांच्या जागी पैसेवाले व व्यापारीवर्गातले लोक आले. अशा रीतीने बंगाल हा प्रामुख्याने हिंदु जमीनदारांचा प्रांत बनला. त्यांची कुळे हिंदु व मुसलमान दोन्ही धर्मांची होती, तरी अधिक मुसलमान होती.
इंग्रजी नमुन्यावर ब्रिटिशांनी येथे बडेबडे जमीनदार निर्मिले. कारण कोट्यवधी शेतकर्यांशी झिगझिग करीत बसण्यापेक्षा मूठभर लोकांशी संबंधी ठेवणे कमी जिकिरीचे होते. शेतसारा शक्य तितका अधिक आणि शक्य तितक्या त्वरित मिळावा हा यात हेतू होता. एखाद्या जमीनदाराने ठरीव वेळी शेतसारा भरला नाही तर त्याला काढून दुसर्याची नेमणूक केली जाई. तसेच ब्रिटिशांच्या हिताशी ज्यांचे हितसंबंध निगडित आहेत असा वर्ग निर्माण करणे जरूर आहे असेही सरकारला वाटत होते. भारतातील ब्रिटिश अंमलदारांना बंडाची सदैव भीती वाटे व त्यांच्या पत्रव्यवहारात ही भीती नेहमी दिसून येते. १८२९ मध्ये गर्व्हनर जनरल बेंटिंक म्हणाला, ''बहुजनसमाजाने बंड केले तर बचाव कसा होणार असे जर कोणी म्हणेल तर त्याला मी सांगेन की, कायमधारापध्दती काही बाबतीत निरुपयोगी ठरली असली तरी एक फायदा तिच्यामुळे झाला आहे. ब्रिटिशांची सत्ता येथे अनिर्बंधपणे राहण्यात ज्यांचा फायदा आहे, आणि बहुजनसमाजावर ज्यांची पूर्ण हुकमत आहे असा एक जमीनदारवर्ग आपण निर्माण केला आहे.''