प्रकरण ६ : नवीन समस्या 2
परंतु इस्लाम देणार्या पैगंबरांनीच आपल्या अरब लोकांत चैतन्य ओतले, एक प्रकारची नवीन श्रध्दा आणि स्फूर्ती त्यांच्यात निर्मिली, हे खरे आहे. एका नव्या धर्माचे, ध्येयाचे आपण शिपाई आहोत, झेंडा घेऊन जाणारे आहोत ही भावना हृदयात जागृत होऊन एक प्रकारचा कमालीचा आत्मविश्वास व उत्कटता त्यांच्या जीवनात आली. ही वृत्ती जेव्हा एखाद्या राष्ट्रातील तमाम लोकांत संचारते तेव्हा सारा इतिहास बदलतो. त्यांच्या यशाचे व विजयाचे दुसरे एक कारण म्हणजे उत्तर आफ्रिकेतील त्याप्रमाणेच मध्य व पश्चिम आशियातील राज्ये डबघाईस आलेली होती; किडलेली, सडलेली होती. उत्तर आफ्रिकेतील ख्रिश्चन लोक आपआपसात झगडत होते, रक्तपात करीत होते. त्याच वेळी तेथे जो ख्रिश्चन धर्म होता तो संकुचित, अनुदार असा होता. अरब मुसलमानांची वृत्ती अधिक सहिष्णू होती. मानवी बंधुत्वाचा संदेश देत ते येत होते. त्यामुळे दोहोंतील फरक चटकन डोळ्यांत भरे. ख्रिश्चन लोकांच्या रोज उठून चाललेल्या मारामारीला कंटाळलेली जनता एकजात इस्लामच्या झेंड्याखाली येऊन उभी राहिली.
अरब लोक स्वत:बरोबर जी संस्कृती दूरदूरच्या देशांत घेऊन जात होते, ती सदैव बदलत होती, विकसत होती. तिच्यावर इस्लाममधील नवीन विचारांचा शिक्का असेच, परंतु तिला केवळ इस्लामी संस्कृती म्हणणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते. तसे म्हणणे म्हणजे केवळ गोंधळ केल्यासारखे होईल. इस्लामी राजधानी दमास्कस येथे होती. तेथे राहायला लागल्यावर अरबांनी आपली जुनी साधी राहणी सोडली, आणि अधिक सुधारलेली शिष्ट अशी राहणी व संस्कृती स्वीकारली. या काळात अरब-सीरियन संस्कृतीचा काळ असे म्हणायला हवे. या संस्कृतीत रोमन संस्कृतीचे प्रवाह येऊन मिसळले. परंतु दमास्कस सोडून राजधानी जेव्हा बगदाद येथे आणण्यात आली, तेव्हा प्राचीन इराणी परंपरेचे या अरब संस्कृतीवर खूप परिणाम झाले. अरब-पार्शियन अशी मिश्र संस्कृती जन्माला आली आणि इस्लामच्या ताब्यात असलेल्या बहुतेक देशांत तीच पसरली, तिचा पगडा बसला.
अरबांना ठायीठायी विजय मिळविणे कठीण गेले नाही; भराभरा ते सर्वत्र पसरले. परंतु हिंदुस्थानात मात्र त्या वेळेस आणि पुढेही फारसे ते आले नाहीत. एका सिंधप्रान्तात फक्त ते शिरले. परकीय आक्रमणाचा परिणामकारक प्रतिकार करण्याइतपत त्या वेळेस हिंदुस्थान बलाढ्य होता काय ? बहुधा असावा, कारण नाहीतर कित्येक शतके हिंदुस्थानवर खरीखुरी स्वारी करीपर्यंत गेली याचा उलगडा होत नाही. अरबांतही अंतर्गत यादवी होती. सिंधही बगदादपासून संबंध सोडून स्वतंत्र मुस्लिम राज्य म्हणून वावरू लागला. परंतु हिंदुस्थानवर स्वारी झाली नाही तरी हिंदी व अरब जगात संबंध वाढतच होते; प्रवासी जात-येत होते; वकिलांची अदलाबदल होत होती; हिंदी ग्रंथ- विशेषत: गणित व ज्योतिष यांवरचे—बगदादला नेण्यात आले. त्यांची अरबीत भाषांतरे केली गेली. कितीतरी हिंदी धन्वंतरीही बगदादला जाऊन राहिले. हे व्यापारी व सांस्कृतिक संबंध उत्तर हिंदुस्थानापुरतेच मर्यादित नव्हते. दक्षिण हिंदुस्थानातील राज्येही त्यात भागीदार होती. विशेषत: पश्चिम किनार्यावरील राष्ट्रकूटांचा अधिक व्यापारी संबंध होता.