प्रकरण ६ : नवीन समस्या 28
प्राचीन हिंदी समाजरचनेतील स्वायत्त ग्रामसंस्था आणि जातिव्यवस्था किंवा चातुरर्वर्ण्य हे दोन प्रमुख विशेष होते. तिसरा विशेष म्हणजे संयुक्त किंवा एकत्र कुटुंबपध्दती. यात कुटुंबांच्या मिळकतीत सारेच सामाईक भागीदार असत व भागीदारातील कोणी मेला तर त्याचा भाग इतर भागीदारांकडे जाई. कुटुंबात पिता किंवा जो कोणी वडील असेल तो मुख्य असे व व्यवस्थापक या नात्याने तो वागे. रोमन कुटुंबातील सर्व सत्ताधीश या नात्याने तो वागत नसे. काही ठराविक परिस्थितीत व भागीदारांना तशी इच्छा झाली तर मिळकतीची वाटणी करण्याला मुभा होती. कुटुंबातील सर्वांच्या गरजा सामुदायिक मिळकतीतून भागविल्या गेल्या पाहिजेत असे गृहीत धरण्यात येत असे, मग कोणी मिळवते असोत वा नसोत. याचा अपरिहार्य परिणाम असा झाला की, कुटुंबापैकी काही थोड्यांना खूप, पुष्कळसे मिळण्याऐवजी सर्वांनाच किमानपक्षी थोडेतरी नक्की मिळण्याची येथे हमी असे. अपंग, दुबळे, भ्रमिष्ट सर्वांचा सांभाळ होई, एक प्रकारचा सर्वांचा विमा होता. सर्वांचे संरक्षण असे, त्याचबरोबर सर्वांचे काम नमूद केलेले असे, आणि कोणाला काय मिळायचे तेही स्पष्ट असे. कमी अधिक मिळकत येथे नसे. वैयक्तिक फायद्याकडे दृष्टी न ठेवता, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेस वाव न देता, सर्व कुटुंबाच्या दृष्टीने, कुटुंबाच्या फायद्याच्या दृष्टीने पाहावे असा कटाक्ष होता. वाढत्या वयात मोठ्या कुटुंबात राहावे लागत असल्याने मुलांमधील आपल्याभावेती सर्वांनी फिरावे ही स्वयंकेंद्रित वृत्तीही कमी होऊन एक प्रकारच्या सामुदायिक वृत्तीला अनुकूलता त्यांच्यात वाढे.
पाश्चिमात्यांच्या विशेषत: अमेरिकेतील अतिव्यक्तिवादी संस्कृतीत जे काही दिसते त्याच्या अगदी उलट हा प्रकार आहे. अमेरिकेत व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेला उत्तेजन देण्यात येते; व्यक्तीचा स्वार्थ हाच तेथे सर्वांचा हेतू असतो. जो चुणचुणीत असतो, पुढे घुसणारा असतो, त्याला सारे निवडक मिळते. मागच्या रांगेत राहणारे मुखस्तंभी, दुर्बळ बाजूला कोपर्यात पडतात.
हिंदुस्थानातही एकत्र कुटुंबपध्दती झपाट्याने नाहीशी होत आहे; वैयक्तिक प्रवृत्ती वाढत आहे. जीवनाच्या आर्थिक पार्श्वभूमीतच यामुळे महत्त्वाचे फेरफार होणार आहेत असे नसून, कसे वागावे या बाबतीतही महत्त्वाचे प्रश्न उद्भाणार आहेत.
हिंदी समाजरचनेचे तीन खांब वर सांगितल्याप्रमाणे व्यक्तीवर आधारलेले नव्हते तर संघावर, समूहावर आधारलेले होते. सामाजिक संरक्षण हे ध्येय होते; ती ती जात, तो तो समूह यांना शाश्वती असावी, स्थिरता असावी आणि एकंदरीत सर्व समाजाचे अस्तित्व टिकून राहावे हे ध्येय होते. प्रगती हे ध्येय नव्हते आणि यामुळे प्रगती मागासली. त्या त्या संघटनेच्या मर्यादेच्या आत— मग ती संघटना ग्रामीण असो, एखाद्या जातीची असो वा एकत्र कुटुंबाची असो, त्यातील सर्व व्यक्ती ज्यात भाग घेत असे सामुदायिक जीवन असे; समानतेची, लोकशाहीची भावना असे. आजही त्या त्या जातीच्या पंचायती लोकशाही पध्दतीनेच कामकाज चालवितात. एखादा निरक्षर खेडूतही लोकनियुक्त समितीत राजकीय हेतूंसाठी वा अन्य कारणांसाठी जायला उत्सुक असलेला पाहून एकेकाळी मला नवल वाटे आणि त्या लोकनियुक्त समितीत तो चांगले कामही करी. तेथे त्याला काही मोठे नवीन आहे असे वाटले नाही. ती पध्दत त्याने लवकरच उचलली. त्याच्या जीवना संबंधीचे प्रश्न आले तर तो फारच उपयोगी पडे आणि सहजासहजी त्याला कोणी गप्प बसवू पाहील तर ते शक्य होत नसे. परंतु लहानलहान समूहात, आपसात, तट पाडून भांडत बसण्याची वृत्तीही दुर्दैवाने दिसून येते.