प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 25
राममोहन रॉयांचा अनेक वृत्तपत्रांशी संबंध होता. प्रथम ते बंगाली आणि इंग्रजी दोन्ही भाषांत चालणारे एक नियतकालिक चालवीत होते. पुढे हिंदुस्थानभर प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी पार्शियन भाषेत एक साप्ताहिक सुरू केले; कारण त्या वेळेस हिंदुस्थानातील सुसंस्कृतांची पर्शियन ही सर्वत्र चालणारी भाषा झाली होती. परंतु वृत्तपत्रांच्या नियंत्रणाचा १८२३ मध्ये एक कायदा झाला आणि राममोहन रॉयांच्या पत्रालाही झळ लागली. या जुलमी कायद्याविरुध्द राममोहन आणि इतर मंडळी यांनी जोरदार चळवळ करून इंग्लंडमधील राजाकडेही अर्ज पाठवला.
राममोहनांच्या वृत्तपत्रीय कामगिरीचा त्यांच्या सुधारणाविषयक चळवळींशी निकट संबंध होता. राममोहनांची दृष्टी सर्वसंग्राहक आणि व्यापक होती. सनातनी लोकांना त्यांचा राग येई, व राममोहनांनी पुरस्कारलेल्या अनेक सुधारणांनाही त्यांचा विरोध असे. परंतु काही निष्ठावंत अनुयायीही त्यांना मिळाले. त्यांत ठाकूर घराण्याचा अवश्य उल्लेख केला पाहिजे. बंगालच्या पुनरुज्जीवनात या ठाकूर घराण्याने पुढे अलौकिक कामगिरी केलेली आहे. दिल्लीच्या सम्राटातर्फे राममोहन हे इंग्लंडला गेले आणि तिकडेच ब्रिस्टल येथे ते एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षांचे आत मरण पावले.
राममोहन, ठाकूर घराणे व काही दुसरे लोक यांनी खाजगी रीतीने इंग्रजीचा अभ्यास केला. इंग्रजी शाळा-कॉलेजे नव्हती व हिंदी लोकांना इंग्रजी शिकवायला सरकारचा सक्त विरोध होता. १७८१ मध्ये कलकत्ता सरकारने कलकत्त्यास संस्कृतच्या अभ्यासासाठी हिंदू कॉलेज आणि अरेबिकच्या अभ्यासासाठी कलकत्ता मद्रसा अशा दोन संस्था सुरू केल्या. १८१७ साली काही हिंदू व युरोपियन यांनी कलकत्त्यास हिंदू कॉलेज सुरू केले; पुढे तेचे प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणून प्रसिध्दी पावले. १७९१ मध्ये बनारसलाही एक संस्कृत कॉलेज सुरू केले गेले. एकोणिसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात काही मिशनरी शाळांतून इंग्रजी शिकविले जाऊ लागले असावे. हिंदी लोकांना इंग्रजी शिकवायला हरकत नाही असा एक विचार सरकारी गोटात १८२० ते १८३० मध्ये सुरू झाला होता, परंतु त्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र प्रयोगादाखल म्हणून दिल्लीच्या अरेबिक शाळेला आणि कलकत्त्यातील काही शिक्षणसंस्थांना इंग्रजीचे वर्ग जोडण्यात आले. १८३५ च्या फेब्रुवारीत मेकॉलेची 'शिक्षणासंबंधीची मते' हा प्रसिध्द रिपोर्ट सरकारकडे दाखल झाला आणि इंग्रजी शिकवायला हरकत नाही असा त्यात अखेरचा निर्णय घेण्यात आला. कलकत्त्यात पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू झाले, आणि १८५७ मध्येच कलकत्ता, मद्रास आणि मुंबई विद्यापीठे सुरू झाली.
ब्रिटिश सरकार हिंदी लोकांना इंग्रजी शिकवायला तयार नव्हते तर त्याहूनही इंग्रजांना संस्कृत शिकवायला ब्राह्मण पंडितांचा अधिक विरोध होता. अर्थात ब्राह्मण पंडितांच्या या विरोधाची कारणे वेगळी होती. कलकत्त्याच्या सर्वश्रेष्ठ न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर वुईल्यम जोन्स हिंदुस्थानात आला. तो पंडित, अनेक भाषापारंगत होता. संस्कृत शिकण्याची त्याने इच्छा दर्शविली. परंतु भरपूर पारितोषिक देऊ करूनही परकीयाला, आपल्या पोटात शिरू पाहणार्याला पवित्र संस्कृत भाषा शिकवायला एकही ब्राह्मण तयार होईना. शेवटी एका ब्राह्मणेतर वैद्याजवळ, त्याच्या सगळ्या विचित्र व कठीण शर्ती मान्य करून जोन्स संस्कृत शिकू लागला. कारण हिंदुस्थानची प्राचीन भाषा शिकण्याची त्याला उत्कट इच्छा होती. संस्कृत भाषेची त्याला मोहिनी पडली, विशेषत: संस्कृतातील पुरातन नाट्यवाङ्मय जेव्हा त्याला आढळले तेव्हा त्याला त्याचा छंद लागला. संस्कृत वाङ्मयातील रत्नांची ओळख युरोपला जोन्सच्या लेखामुळे व भाषांतरामुळेच झाली. १७८४ मध्ये वुईल्यम जोन्सने बंगाल एशिअॅटिक सोसायटी स्थापिली. तिचेच पुढे रॉयल एशिअॅटिक सोसायटीत रूपांतर झाले. प्राचीन भारतीय वाङ्मयाचा पुन्हा शोध लावून जोन्स व इतर अनेक युरोपियन पंडितांनी भारताला ॠणी करून ठेवले आहे. हे वाङ्मय त्या त्या काळात अज्ञात होते असे नाही, ते माहिती होते. परंतु हळूहळू मूठभर लोकांपुरतेच ते मर्यादित राहिले होते. पुढे पार्शियन भाषा हीच मुख्य सांस्कृतिक भाषा झाल्यामुळे लोकांचे मन संस्कृतपासून परावृत्त झाले. हस्तलिखितांचा शोध सुरू झाला तेव्हा फारच थोड्यांना माहीत असलेले अज्ञात ग्रंथ उजेडात येऊ लागले, आणि जे अपरंपार वाङ्मय असे पुढे आले त्याचा अर्वाचीन टीकाशास्त्रातील नवीन पध्दतीने अभ्यास झाल्यामुळे ह्या नव्याने सापडलेल्या विशाल वाङ्मयाची वेगळीच पार्श्वभूमी दिसू लागली.