प्रकरण ६ : नवीन समस्या 46
१७८४ मध्ये वॉरन हेस्टिंग्जनेही निजामाविषयी लिहिले आहे. ''त्याच्या राज्याचे क्षेत्रफळ फारसे नाही; उत्पन्नही बेताचेच. लष्करी शक्ती यथातथाच दिसून येते; त्याने सबंध आयुष्यात स्वत: शौर्य, कसलेही धाडस दाखविल्याचे उदाहरण नाही. त्याच्यासमोर एकच राजकीय सूत्र असे, शेजार्यास भांडणे लावायची आणि त्यांच्या अडचणींचा आणि दुबळेपणाचा आपण फायदा करून घ्यायचा, परंतु लढाईत स्वत: मात्र कोणत्याच बाजूला उभे राहायचे नाही. युध्दाचा धोका पत्करण्याऐवजी वाटेल त्या अपमानास्पद अटीही तो मान्य करील आणि वाटेल ते द्यायला तयार होईल.'' *
------------------------
* एडवर्ड थॉम्प्सनच्या ''The Making of the Indian Princes-हिंदी संस्थानांची निर्मिती'' (१९४३). या पुस्तकातील उतारा, पृष्ठ १.
अठराव्या शतकात हिंदुस्थानचे प्रभुत्व मिळविण्यासाठी चार सत्ता धडपडत होत्या.
त्यांपैकी दोन हिंदी होत्या; मराठे आणि हैदर व हैदरचा मुलगा टिपू; दोन परकी सत्ता होत्या : फ्रेंच आणि ब्रिटिश. त्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षात तरी असे दिसते की, सबंध हिंदुस्थानावर सत्ता स्थापण्याइतकी मराठ्यांची भाग्यरेषा प्रबळ आहे हे निश्चित व मोगलानंतर मराठेच हिंदुस्थानचे स्वामी होणार. १७३७ मध्येच त्यांच्या फौजा दिल्लीत थडकल्या होत्या आणि त्यांना विरोध करायला दुसरी प्रबळ सत्ता नव्हती.
आणि ह्याच वेळेस १७३९ मध्ये वायव्येकडे एक प्रचंड उत्पात झाला. इराणचा नादिरशहा जाळीत, मारीत, लुटालूट करीत दिल्लीवर चालून आला. अपरंपार लूट घेऊन व प्रसिध्द मयूरासन घेऊन तो परत गेला. दिल्लीचे राजे मेषपात्र असल्यामुळे, त्यांना लढाईचा गंधही नसल्यामुळे, नादिरशहाला काहीच जड गेले नाही. मराठ्यांची त्याची गाठ पडलीच नाही. एका अर्थी त्याच्या स्वारीने मराठ्यांचे काम सोपेच झाले. ते लवकरच पंजाबपर्यंत पसरले. मराठ्यांची अधिसत्ता स्पष्टपणे पुन्हा नजरेच्या टप्प्यात आली.
नादिरशहाच्या स्वारीचे दोन परिणाम झाले. दिल्लीच्या साम्राज्यावर मोगल बादशहांची सत्ता व मत्ता चालते असा जो काही पोकळ भ्रम होता तो त्याने पार नाहीसा केला. यापुढे ते केवळ पोकळ छायारूप होऊन जो कोणी बलवान असे त्याच्या हातातील बाहुले होत व राजपदाचे झालेले भूत, इतकाच त्यांचा मान उरला. नादिरशहाच्या स्वारीपूर्वीच ते या स्थितीत येऊन पोचलेले होते, त्याने अवकळा पुरी आणली एवढेच. परंतु परंपरा आणि दीर्घकालीन रूढी यांची मानवी मनावर एवढी पकड असते की प्लासीच्या लढाईपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि इतरही लोक दिल्लीच्या नामधारी बाहुल्याकडे नम्रभावाने नजराणे पाठवीत असत, खंडणी या अर्थी भेटी पाठवीत असत, आणि पुढेही फ्रेंच कंपनी स्वत:ला दिल्लीच्या बादशहाचे मुतालिक मानून कारभार करी. १८३५ पर्यंत दिल्लीच्या बादशहाच्या नावे नाणे पाडले जाई.