प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 45
रामायण-महाभारतात तपोवनातील विद्यापीठांचे उल्लेख वरचेवर येतात. हे आश्रम, ही विद्यापीठे शहरापासून फार लांब नसत. या तपोवन-विद्यापीठात मोठमोठे पण्डित, त्या त्या शास्त्रातील तज्ज्ञ अशी अधिकारी माणसे असत. त्यांच्याजवळ शिकण्यासाठी विद्यार्थी जात. या विद्यापीठांतून नाना विषयांचे शिक्षण मिळे. लष्करी शिक्षणही देण्यात येई. नागरी जीवनातील नाना मोह टाळण्यासाठी, आणि संयमी व्रती असे जीवन छात्रांना कंठिता यावे म्हणून ही विद्यापीठे जरा दूर तपोवनात असत. काही वर्षे असे अध्ययन केल्यावर छात्र आपआपल्या घरी जाऊन, गृहस्थाश्रमात प्रवेश करून मग गृहस्थ-नागरिक व्हावे अशी कल्पना होती. ही तपोवनातील जी विद्यापीठे, त्यातून बेताचेच विद्यार्थी असतील. परंतु एखाद्या लोकप्रिय गुरुच्या आश्रमात पुष्कळच संख्या असे.
बनारस हे विद्येचे माहेरघर फार प्राचीन कालापासून आहे व बुध्दाच्या काळातही ज्ञानाचे, विद्येचे केंद्र म्हणून काशी प्रसिध्द होती. काशीजवळच्याच मृगोपवनात बुध्दाने आपले पहिले प्रवचन केले. परंतु हिंदुस्थानच्या इतर ठिकाणी त्या वेळेस व नंतर जशी विद्यापीठे होती तसे विद्यापीठ काशीला होते असे दिसत नाही. तेथे अनेक आचार्य असत, आणि त्यांच्याजवळ अध्ययनोत्सुक शिष्य असत. या भिन्नभिन्न गुरुकुलांमध्ये पुष्कळ वेळा मोठमोठे वाद चालत, खडाजंगी चर्चा होत.
परंतु तिकडे वायव्येस अर्वाचीन पेशावरजवळ तक्षिला-तक्षशिला नावाचे एक विख्यात विद्यापीठ होते. हे विद्यापीठ विज्ञानासाठी व कलेकरता प्रसिध्द होते. म्हणून हिंदुस्थानच्या दूरदूरच्या भागातले विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे मुलगे, एकेकटे, कोणी बरोबर रक्षणार्थ न घेता तक्षशिला येथे शिकण्यास जात आहेत असे उल्लेख जातक-कथांतून कितीतरी ठिकाणी येतात. मध्य आशिया व अफगाणिस्थान इकडूनही विद्यार्थी येत असावेत, कारण तक्षशिलेचे विद्यापीठ अशा मोक्याच्या जागीच होते. तक्षशिला येथील पदवीधर होणे हा त्या काळात सन्मान व कीर्ती समजली जाई. तक्षशिला विद्यापीठात आयुर्वेदाचे अध्ययन केलेल्या वैद्यावर लोकांची फार श्रध्दा असे. बुध्दाची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडे तेव्हा तेव्हा त्याच्या भक्तगणांनी अशा एका प्रख्यात भिषग्वराला आणले असा उल्लेख आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला पाणिनी या विद्यापीठाचाच विद्यार्थी होता असे म्हणतात.
हे विद्यापीठ बुध्दपूर्वकालीन होते आणि ते ब्राह्मणी विद्येचे स्थान होते. बुध्दकालात बुध्दधर्मीय विद्येचेही हे केंद्र होऊन सबंध हिंदुस्थानातून आणि आसपासच्या सीमाप्रांतांतून कितीतरी विद्यार्थी तेथे शिकायला येत. मौर्य साम्राज्यातील वायव्य प्रांताची ती राजधानी होती.
अतिप्राचीन पहिला स्मृतिकार मनू ह्याच्या मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांची स्थिती वाईटच म्हणायला पाहिजे. नेहमी कोणाचे तरी रक्षण असावे, पिता, पती, पुत्र कोणाच्या तरी आधाराने त्यांनी राहावे. कायदा त्यांना जवळजवळ मालमत्तेची एक जिवंत वस्तू अशा रीतीनेच मानी. परंतु रामायण-महाभारतातील अनेक कथा पाहिल्या तर प्रत्यक्ष व्यवहारात या कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसे असे दिसते. घरी आणि समाजात त्यांना मानाचे स्थान होते. स्वत: मनूच म्हणतो, ''जेथे स्त्रियांना पूज्य म्हणून मानले जाते, तेथेच देव आनंदाने नांदतात.'' तक्षशिला किंवा दुसर्या कोणत्या प्राचीन विद्यापीठात स्त्रिया शिकत असल्याचा उल्लेख नाही. परंतु त्या कोठे तरी शिकत असल्याच पाहिजेत, कारण विदुषी-ब्रह्मवादिनी स्त्रियांचा सर्वत्र उल्लेख येतो. आजच्या काळाच्या मानाचे प्राचीन हिंदी स्त्रियांची स्थिती कायद्यात जरी चांगली नसली तरी तत्कालीन प्राचीन ग्रीक लोकांच्या स्त्रियांपेक्षा किंवा पुढे रोमन आणि आरंभीच्या ख्रिश्चन काळातील स्त्रियांपेक्षा, मध्ययुगीनच नव्हे, तर अगदी अर्वाचीन काळाच्या, एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या युरोपातील स्त्रियांच्या स्थितीपेक्षा ती कितीतरी पटीने चांगली होती.
मनूनंतर पुढे जे निरनिराळे स्मृतिकार झाले त्या सर्वांनी धंद्यातील भागीदारीविषयी लिहिले आहे. मनू फक्त धर्मोपदेशक वर्गाचा विशेषेकरून उल्लेख करतो. याज्ञवल्क्याने व्यापार, शेती यांतील भागीदारीचा उल्लेख केला आहे. नंतरचा एक स्मृतिकार नारद म्हणतो, ''धंद्यात ज्या मानाने भांडवल सारखे किंवा मोठे-लहान घातले असेल, त्या मानाने भागीदाराचा नफा व तोटा असला पाहिजे. तसेच मालाचा साठा करून ठेवणे, धान्य, जकाती, नुकसान, गलबताचे भाडे, कचेरीचा खर्च हे सर्व करारात ठरल्याप्रमाणे प्रत्येक भागीदाराने दिले पाहिजे.