प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 33
पण ते सत्य कधीकाळी ज्या एखाद्या मोजक्या स्वरूपात मांडले गेले असेल तेवढ्याच भागावर निष्ठा बसून, त्या निष्ठेत हटवादीपणा येऊन पूर्वकाळी कधीतरी ते स्वरूप दगडासारखे घट्ट पण दगडासारखेच निर्जीव होऊन बसले असेल, तर त्या सत्याची उत्तरोत्तर वाढ होत जाण्याची व अधिकधिक प्रचीती येत जाण्याची नैसर्गिक क्रिया खुंटते आणि नव्या प्रसंगाने मानवजातीला जी नवी उणीव भासते तिचे निराकरण करण्याकरिता त्या प्रसंगी योग्य त्या स्वरूपात सत्याचा आविष्कार मानवजातीला होत जाण्याची क्रियाही थांबते, सत्याच्या त्या ठरीव जुन्या स्वरूपाखेरीज सत्याची जी इतर विविध अंगे असतील ती दृष्टिआड पडतात व असे झाले की, नव्या युगात ज्या नव्या अडचणी, जे नवे प्रश्न निकरावर येतात त्यांना समर्पक तोड त्या सत्यात सापडत नाही. सत्यातले चैतन्य जाऊन त्याला जडत्व येते व मानवाला चैतन्याची स्फूर्ती देण्याचे जे सत्याचे कार्य, ते थांबून सत्य म्हणजे निर्जीव कल्पना व अर्थहीन आचार एवढेच काय ते शिल्लक राहते आणि मग मनोविकासाच्या व मानवी प्रगतीच्या मार्गावर ती एक अडचण होऊन बसते. तसेच खरोखर पाहू गेले तर भूतकाली ज्या कोणत्या युगात सत्याच्या ह्या एका स्वरूपाचा आविष्कार क्रमश: होत गेला हा तत्कालीन प्रचलित प्रतीके व भाषा यांच्या आवरणात तो मांडला गेला, त्या युगात त्या स्वरूपाचा जितका अर्थबोध होत असे, तितकासुध्दा त्या प्रतीकांनी व त्या भाषेने अर्थबोध पुढच्या काळात होत नसेल. कारण पुढच्या काळात त्याचा संदर्भ वेगळा पडतो, मानसिक परिस्थिती बदललेली असते, समाजात काही वेगळ्याच रीती, काही वेगळीच वहिवाट प्रचलित होऊन ती लोकांच्या अंगवळणी पडलेली असते, आणि त्यामुळे त्या प्राचीन वाङ्मयातले गूढ तत्त्वच नव्हे तर त्या वाङ्मयाचा नुसता साधा अर्थदेखील लोकांना दुर्बोध होऊन बसतो. अरविंद घोष यांनी म्हटले आहे की, कोणतेही एखादे तत्त्व किंवा एखादा सिध्दान्त घेतला तर त्याच्या स्वत:च्या व्याप्तीपुरता तो कितीही सत्य असला तरी ज्या इतर सिध्दान्तांमुळे त्याला मर्यादा पडते व त्याची परिपूर्तीही होते त्या इतर सिध्दान्तांखेरीज तो एकच सिध्दान्त वेगळा काढून तो स्वयंपूर्ण सत्य मानून चालले तर बुध्दीला गुरफटून बांधून ठेवणारे ते एक जाळे होऊन बसते, तो सिध्दान्त म्हणजे नुसती दिशाभूल करणारे एक प्रमाण वचन होऊन बसतो. कारण असले एकाकी सिध्दान्त म्हणजे खरोखर एका सबंध विणलेल्या पटातले धागे आहेत, आणि असे एकाकी धागे वेगळे वेगळे घेऊन चालत नाही.
मानवतेचा विकास होण्याच्या कार्यात धर्मसंप्रदायांचे मोठे साहाय्य झालेले आहे. धर्मसंप्रदायांनी मानवी जीवनात मूल्ये काय असावी व आदर्श कोणते असावे ते निश्चितपणे ठरवून दिलेले आहे, व योग्य दिशेने मानवी जीवन चालावे म्हणून मार्गदर्शक तत्त्वेही दाखवून दिलेली आहेत. पण धर्मसंप्रदायामुळे मानवजातीचे खूप कल्याण झाले असले तरी या धर्मसंप्रदायांनीच सत्याला ठरीव साच्यातले ठरीव पक्के स्वरूप देऊन ते ठरून गेलेल्या प्रमाणवचनांनी बांधून ठेवून सत्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या विधी व आचारांचा मूळचा अर्थ लवकरच नाहीसा होऊन त्यांना केवळ ठराविक कार्यक्रमाचे रूप येते अशा नाना विधींचे व आचारांचे स्तोम या धर्मसंप्रदायांनीच माजवले आहे. मानवाच्या भोवती सगळीकडे पसरलेल्या विश्वातील अज्ञाताचे गूढ केवढे गहन आहे व त्याबद्दल माणसाला किती पूज्यभाव वाटला पाहिजे हे या धर्मसंप्रदायांनी माणसाच्या मनावर बिंबवता झाले असे की, त्या अज्ञाताचेच नव्हे तर समाजाच्या प्रगतीच्या आड येणार्या अडचणींचे देखील आकलन करण्याची खटपट व्यर्थ आहे अशी समजूत होऊन बसली. प्रत्येकाला चौकसबुध्दीने स्वत:विचार करायला लावण्याऐवजी, प्रचारात असलेली रूढ व्यवस्था, रूढ धर्मविधी, प्रचलित समाजरचना, सारांश प्रत्येक गोष्ट सध्या आहे तशी निमूटपणे मान्य करण्याचे तत्त्वज्ञान या धर्मसंप्रदायांनी शिकवले. ज्याच्या आज्ञेवाचून कोठेही काहीही घडत नाही अशा कोणा निसर्गातीत अतिमानुष कर्त्याच्या हाती विश्वाचा कारभार आहे अशी श्रध्दा बनल्यामुळे समाजात एक प्रकारची बेजबाबदार वृत्ती आली आहे आणि चौकसपणे व्यवस्थित विचार करणार्या बुध्दीऐवजी भावनेच्या आहारी जाणारी हळवी मनोवृत्ती माणसांच्या अंगी आली आहे. धर्म या संस्थेने अगणित मानवी जीवांना सुखशांती लाभली व धर्माने ठरवून दिलेल्या मूल्यामुळे समाजाला स्थैर्य आले हे नि:संशय आहे; परंतु मानवी समाजाची स्वत:त पालट घडवून आणण्याची व स्वत:ची प्रगती करून घेण्याची जी नैसर्गिक वृत्ती आहे तिला धर्मामुळे बंधने पडली आहेत.
धर्मसंप्रदायाच्या वाटेने चालले तर त्या वाटेवर लागणार्या ह्या खाच-खळग्यांपैकी पुष्कळसे खाचखळगे तत्त्वज्ञानाच्या वाटेने चालल्याने टळतात, आणि तत्त्वज्ञानाची शिकवण मनुष्याला चौकस करणारी, त्याला आपल्या स्वत:च्या बुध्दीने विचार करायला लावणारी आहे. पण मानवी जीवन व त्यात येणार्या नित्याच्या नव्या नव्या अडचणी यांच्या धकाधकीपासून चार हात दूर राहून तत्वज्ञानशास्त्राने आपले स्वतंत्र शोभिवंत निर्मल निवासस्थान थाटले आहे व तेथेच वस्ती करून जीवनाच्या अंतिम उद्देशावरच आपले सारे लक्ष लावले आहे, त्यामुळे त्या शास्त्राला मानवी जीवनाशी आपला संबंध जोडता आला नाही. तर्कशास्त्र व बुध्दिप्रामाण्य यांच्या अनुरोधाने ते शास्त्र चालत आले आहे, आणि त्यामुळे त्या शास्त्राची प्रगती नानाविध दिशांनी खूपच झाली आहे. पण ते तर्कशास्त्र बुध्दीच्या क्षेत्रातच फार वाढून त्याचा अतिरेक झाला, विचारक्षेत्रापलीकडे प्रत्यक्षात काय आहे याची त्या शास्त्राला क्षिती नव्हती.