प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 58
''मी भोवतालची सद्य:स्थिती पाहू लागलो म्हणजे आपले वैभव स्वाभिमानाने मिरवणारी एक संस्कृती ढासळते आहे, तिचे भग्नावशेष जिकडे तिकडे पडत आहेत असे मला दिसते आणि वाटते की किती विफल आहे ही संस्कृती. असे वाटले तरी मानवाचे भवितव्य उज्ज्वल आहे ही श्रध्दा सोडून देण्याचे घोर पाप मी करणार नाही. मानवाची उत्क्रांती कशी होत गेली त्या इतिहासातील या युध्दाच्या आपत्तींचा, उत्पातांचा काळ संपला व सेवेच्या, त्यागाच्या वृत्तीने सारे वातावरण निर्मळ झाले म्हणजे या इतिहासाच्या एका नव्या पर्वाचा आरंभ होईल अशी आशा करणे मला अधिक उचित वाटते. ह्या नव्या पर्वाचा उष:काल कदाचित या आपल्या पूर्व क्षितीजावर या सूर्योदयाच्या दिशेकडून पसरेल. इतरांना जिंकून त्यांना आपले अंकित करून ठेवण्याच्या मार्गाने मानव चालला आहे, पण एक दिवस असा उगवेत की, ह्या मार्गावर वाटेल त्याने हरवलेला त्याच्या जन्मजात मानवतेचा ठेवा शोधून परत मिळविण्याकरिता तोच मानव त्याच अपराजित वृत्तीने परत फिरेल व जे आडवे येईल ते बाजूला सारून आपले हरपलेले श्रेय पुन्हा मिळवील.
''स्वसामर्थाचा गर्व चढून उद्दाम वृत्ती आली की तिच्याबरोबरच कोणती संकटे ओढवतात ते आज आपल्या डोळ्यांसमोर दिसते आहे; पण संपूर्ण ज्ञानी ॠषींनी जे पूर्वीच सांगून ठेवले तेच सर्वस्वी खरे आहे असे ठरण्याचा दिवसही निश्चित येईलच. 'अन्यायाने वागून माणसाला वैभव लाभेल, दृष्टीला जे प्रिय वाटते त्याची प्राप्ती होईल, शत्रूंना जिंकता येईल, पण मुळाशी कीड लागून त्याचा नाश होईल.''
खरे आहे रवींद्रनाथांचे म्हणणे. मानवजातीवर श्रध्दा ठेवली पाहिजे, ती सोडून चालणार नाही. ईश्वरावर श्रध्दा ठेवली नाही तरी एक वेळ चालेल, पण मानवजातीवरची आपली श्रध्दा जर आपण सोडू लागले व त्यामुळे क्रमप्राप्त म्हणून कशातच काही अर्थ नाही, सारे विफल आहे असे मानू लागलो तर आपण जगायचे तरी कोणत्या आशेवर ? पण वेळ अशी आली होती की, कशावरही श्रध्दा ठेवणे मोठे कठीण होते, अखेर सत्याचाच जय होणार असे मानणे मोठे जड जात होते.
मला थकवा आला होता व मन मोठे व्याकुळ झाले होते, तेव्हा चार दिवस हवापालट करून पाहावा म्हणून मी हिमालयाच्या आतील दर्याखोर्यांतल्या कुलू या ठिकाणी निघून गेलो.