प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 73
लोकशाही व साम्राज्यशाही ही एका ठिकाणी एकत्र कशी नांदू शकत नाहीत, राज्य लोकशाही स्वरूपाचे असले तरी त्या राज्याच्या अंकित असलेल्या वसाहतीवर त्याची सत्ता कशी अन्यायाने दडपशाही करून चालवली जाते, आणि मग त्या राज्याचा अध:पात होऊन ते किती लवकर रसातळाला जाते, याची उदाहरणे अथेन्सच्या इतिहासात भरपूर आहेत. स्वातंत्र्य आणि साम्राज्य यांचे समर्थन करायला आजदेखील कोणी पुढे सरसावले तरी त्याला आपल्या पक्षाचे समर्थन थ्युसिडायडिसपेक्षा अधिक शैलीने अधिक वक्तृत्वपूर्ण भाषेत करता येणार नाही. ''आम्ही मानवसंस्कृतीचे अग्रणी, मानवाच्या उत्क्रांतीपथावरचे अग्रेसर वीर आहोत. आमच्या संगतीचा लाभ व्हावा, संभाषणाचा योग यावा याकरता अधिक कल्याणकारक आशीर्वाद देणे मानवाच्या हाती नाही. आमच्या सत्तेच्या कक्षेत वावरणे हे परावलंबीपणाचे लक्षण नसून उलट तो कष्टसाध्य सन्मान आहे. आम्ही जे काही अर्पण करतो त्याचे मोल सार्या पौर्वात्य देशांतील सारी संपत्ती एकत्र करूनही देण्यासारखे नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आणून आम्ही आपले कार्य आनंदाने उत्साहपूर्वक चालविले पाहिजे व ज्यांच्याकडून संपत्तीचा व साधनांचा हा सारा ओघ आम्हाला अर्पण केला जातो त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी अखेर त्यांना आमचे ॠण फेडता येणे शक्य नाही असा आत्मविश्वास बाळगून आम्ही त्या संपत्तीचा व साधनांचा उपभोग घेत राहिले पाहिजे. कारण असीम प्रयत्न करून, नाना यातना भोगून, अनेकवार रणांगणावर आमच्या प्राणांच्या आहुती देऊन या सार्या साधनेच्या अंती आम्ही मानवी शक्तीचे रहस्य हस्तगत केले आहे, आणि त्यातच मानवाने सुखाचा लाभ करून घेण्याची गुरुकिल्लीही सापडते. हे रहस्य अनेकांनी शोधून पाहिले व त्यांनी केवळ काहीएक तर्क म्हणून त्याची अनेक भिन्नभिन्न नावेही सांगितली आहेत, पण त्या रहस्याचे खरे नाव जाणून त्या रहस्याला सत्य स्वरूपात आपल्या नगरात वसवून तेथे त्याला सुखाने नांदविणारे असे केवळ आम्हीच. आम्ही त्याला ज्या नावाने ओळखतो ते नाव 'स्वातंत्र्य', कारण ह्याच गुरूने आम्हाला असे शिकविले आहे की, सेवा म्हणजेच स्वातंत्र्य. तेव्हा स्वत:चे हित साधण्याच्या हेतूने नव्हे, तर स्वातंत्र्याच्या अंगी जो निर्भय आत्मविश्वास असतो त्या आत्मविश्वासाने आम्ही आमच्या कृपेचा लाभ निरपेक्षपणे इतरांना करून देतो याचे तुम्हाला आश्चर्य वाटते काय ?''
स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या घोषणा सर्वत्र मोठमोठ्याने दुमदुमत आहेत, पण ते मिळते आहे मात्र निवडक थोड्यांनाच, अशा आजच्या काळात त्या थ्युसिडायडिसच्या स्वातंत्र्यघोषातले सूर आपल्या ओळखीचे नेहमीचे वाटतात. त्यात सत्य आहे आणि सत्याला नकारही आहे. थ्युसिडायडिसची दृष्टी भूमध्यसमुद्राभोवतीच्या देशांतील लोकांपुरतीच मर्यादित होती, त्याबाहेरच्या जगातील इतर लोकांविषयी त्याला फारशी माहिती नव्हती. त्याच्या त्या प्रख्यात अथेन्स नगराचा त्याला अभिमान होता, तेथले ते स्वातंत्र्य म्हणजेच सौख्याचे, मानवी शक्तीचे रहस्य आहे अशी त्या स्वातंत्र्याची त्याने प्रशंसा चालविली होती. पण त्याला अशी जाणीव झाली नाही की, त्याच स्वातंत्र्याचा ध्यास इतरांनाही लागला असेल. ह्याच स्वातंत्र्यप्रेमी अथेन्स नगरच्या राज्याने दुसरे एक मेलॉसनगर होते त्याच्यावर स्वारी करून तेथे लूट व जाळपोळ करून ते उद्ध्वस्त केले आणि तेथे वयात आलेल्या सर्व पुरुषांची कत्तल करून सारी बायकापोरे धरून आणून त्यांना गुलामांच्या बाजारात विकले. अथेन्सचे साम्राज्य, स्वातंत्र्य याविषयी थ्युसिडायडिसचे लिखाण चालले असतानाच दुसरीकडे अथेन्सचे साम्राज्य ढासळून पडले होते, स्वातंत्र्याची हत्या झाली होती.
कारण, स्वतंत्रदेशी सत्तेचे व दास्याचे साहचर्य फार काळ टिकणे शक्य नाही, अखेर एकाची दुसर्यावर मात होतेच, आणि साम्राज्याचे वैभव, साम्राज्याच्या गर्वाचे घर खाली कोसळून पडायला फारसा वेळ लागत नाही. पूर्वी कधीही नव्हते इतके हल्लीच्या काळी स्वातंत्र्य अविभाज्य झालेले आहे. पेरिक्लिजला अत्यंत प्रिय असलेल्या त्याच्या त्या नगराची गौरवपूर्ण भाषेत त्याने स्तुती केल्यानंतर लागलीच थोड्या काळाने त्या नगराचा पराजय झाला व त्या नगरातल्या अॅक्रोपोलिस या बालेकिल्ल्यात स्पार्टन शत्रुसेनेने आपले ठाणे वसविले. पण, सौंदर्य, चातुर्य, स्वातंत्र्य आणि धैर्य या गुणांवर जडलेली त्याची भक्ती त्याच्या भाषेत व्यक्त होत असल्यामुळे, केवळ त्याच्या काळच्या अथेन्सच्याच नव्हे तर अथेन्सहून व्यापक अशा सार्या जगाच्याच दृष्टीने त्याच्या भाषेची सार्थकता पटून अद्यापही मन विचलित होते, थरारते.