प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 83
जॉन स्टुअर्ट मिल्ल यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात म्हटले आहे, ''मानवजातीच्या विचारपध्दतीच्या मुळातच मोठे स्थित्यंतर झाल्याखेरीज, मानवजातीच्या वाट्याला आलेले भोग टाळून तिच्या भवितव्यात मोठीशी सुधारणा घडवून आणणे शक्य नाही अशी आता माझी खात्री झाली आहे.'' पण खरे म्हणजे मानवाच्या अवतीभोवती जो पालट होत जातो, जीवनाच्या धकाधकीच्या मामल्यात त्याला जो यत्न करावा लागतो व त्याबरोबरच जीवनात त्याला जे दु:ख व यातना सोसाव्या लागतात त्यामुळेच त्याच्या मूळ विचारप्रकृतीत हे स्थित्यंतर घडत जाते. आणि म्हणून, एकीकडे प्रत्यक्ष त्या विचारातच स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्रयत्न चालू ठेवून त्याहीपेक्षा अवश्य हे की, ज्या परिस्थितीतून हे विचार निघावयाचे व वाढावयाचे, ती परिस्थितीच मुळात बदलली पाहिजे. विचार व परिस्थिती ही एकमेकावर अवलंबून असतात, त्यांचा आपसात एकमेकावर परिणाम होतच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे माणसागणिक मनाचे प्रकार अनंत होतात, त्यामुळे सत्याचे रूप प्रत्येकाला वेगळे स्वतंत्र दिसते आणि पुष्कळ वेळा असे घडते की, दुसर्याचा दृष्टिकोण समजणे आपल्याला जमत नाही. असे घडले की त्यातून विरोध उत्पन्न होतो, आणि यामधून क्रियाप्रतिक्रिया होता होता सत्याचे अधिक संपूर्ण अधिक एकजीव रूप प्रतीत होते. आपल्याला अशी जाणीव राहिली पाहिजे की, सत्याला अनेक बाजू असतात, कोण्या एखाद्या समूहाला वा राष्ट्राला सत्याचे जे रूप प्रतीत झाले तेच काय ते सत्य अशी स्थिती नाही. हाच प्रकार आचारात, कोठलीही गोष्ट करण्याच्या भिन्न भिन्न रीतीत येतो. लोक वेगळे व परिस्थिती वेगळी, अशा स्थितीत त्यांच्या रीतीही वेगळ्या असू शकतील. हिंदुस्थान, चीन वगैरे वेगवेगळ्या राष्ट्रांतून लोकांच्या जीवनाच्या रीतीने उत्क्रांती होत होत प्रत्येकाचा काही एक विशिष्ट जीवनक्रम प्रचारात आला, व तो चिरकाल टिकावा अशी व्यवस्था झाली. प्रत्येकाची कल्पना अशी की आपला जीवनक्रम काय तो योग्य, आणि अद्यापही या भ्रामक कल्पनेचे भूषण मानणारे अनेक गर्विष्ठ लोक आहेतच. युरोप व अमेरिकेतील लोकांचा एक विशिष्ट जीवनक्रम हल्ली ठरून गेला आहे आणि त्याचे आजच्या जगात प्राबल्य आहे. युरोप व अमेरिकेतल्या लोकांना असे वाटत असते की, आपलाच जीवनक्रम काय तो योग्य. पण जीवनक्रमाच्या अनेक प्रकारांपैकी कोणताही एकच प्रकार काय तो योग्य व इष्ट असेल असे नाही, प्रत्येकाला इतरांपासून घेण्याजोगे असे काही काही निघेल. निदान हिंदुस्थान व चीन यांनी इतरांपासून धडा शिकण्यासारखे पुष्कळच आहे, कारण त्यांच्यात आता निष्क्रिय जडता आली आहे, आणि पाश्चात्य देश वर्तमानयुगप्रवृत्ती दाखविणारी उदाहरणे आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्यात कार्यप्रवृत्ती आहे, त्यांच्यात पालट होत जातो, आणि त्यांची वर्धिष्णुवृत्ती वारंवार आत्मनाशाचे व नरमेधाच्या हत्याकांडाचे कार्य करण्यात गुंतलेली असली तरी ती विकासाची शक्ती तरी त्यांच्यात आहे.
कधी स्वत:ची स्तुतिस्तोत्रे गात बसावे, तर कधी स्वत:ची कीव करीत सुटावे असे आळीपाळीने करीत राहण्याची हिंदुस्थानातील लोकांची वृत्ती आहे, आणि अन्यत्रही कदाचित हीच प्रवृत्ती आढळेल. हे दोन्ही प्रकार अनिष्ट आहेत, आपल्याला कमीपणा आणणारे आहेत. खरे जीवन समजावून घ्यावयाचे असेल तर नुसती हळवी वृत्ती किंवा भावनेने भारलेली दृष्टी काही उपयोगाची नाही, त्याकरिता प्रत्यक्ष त्या जीवनातल्या वस्तुस्थितीला, धीराने, काही संकोच न करता तोंड दिले पाहिजे. जीवनात उद्भवणार्या प्रश्नाशी ज्यांचा संबंध येत नाही तसल्या हेतुशून्य व काव्यमय गूढांच्या शोधात गुंगून राहण्याला आपल्याला सवड नाही. कारण, नियतीची पावले सारखी पुढे पडत चाललेली असतात, आपण फावल्या वेळी तिकडे लक्ष देऊ म्हटले तर ती काही आपल्याकरिता खोळंबून राहणार नाही. तसेच, मानवी जीवनाच्या अंतर्गत मनोव्यापारांची अर्थसूचकता लक्षात न घेता, नुसत्या बाह्य जीवनातल्या वरवर दिसणार्या गोष्टीतच आपण गढून जाता कामा नये. जीवनाच्या ह्या बाह्य व अंतर्गत भागांचा समतोल राखणे, त्यांचा मेळ घालणे, अवश्य आहे. स्पिनोझा या तत्त्वज्ञान्याने सतराव्या शतकात लिहून ठेवले आहे, ''मन आणि सारा निसर्ग एकमेकाशी संयुक्त आहेत व त्यांच्या घनिष्ठ संबंधाचे ज्ञान होण्यातच मानवाचे अंतिम कल्याण आहे....मनाला हे ज्ञान जितके अधिकाधिक होत जाते तितके त्याबरोबरच मानसिक प्रेरणांचे व निसर्गातील व्यवस्थेचे ज्ञानही वाढत जाते. मनाला आपल्या मानसिक प्रेरणांचे ज्ञान व आपल्या सामर्थ्याची जाणीव जितकी अधिक, तितकी त्याची स्वत:ला योग्य वळण लावण्याची, स्वत:चे नियमन करण्याची शक्तीही अधिकाधिक होत जाते, आणि निसर्गव्यवस्थेचे ज्ञान जितके अधिक, तितकी निरुपयोगी गोष्टींच्या उपाधीपासून स्वत:ला सोडवून घेण्याची त्या मनाची शक्तीही वाढते. असा हा सारा क्रम आहे.''