प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 19
परंतु आता मी कुदळ बाजूला ठेवून हातात लेखणी घेतली आहे. डेहराडूनमधील अर्धवट राहिलेल्या हस्तलिखिताची जी दशा झाली तीच कदाचित याही वेळच्या लिखाणाची होईल. वर्तमानकाळाचा, प्रत्यक्ष कार्यात भाग घेऊन जोपर्यंत मी अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी मला लिहिता येणार नाही. वर्तमानकाळात प्रत्यक्ष काही कार्य करावयाचे असले म्हणजे तो काळ स्वच्छपणे स्पष्ट डोळ्यांसमोर उभा राहतो आणि मग त्यासंबंधी सहज मोकळ्या वृत्तीने मी लिहू शकतो. तुरुंगात सारे अस्पष्ट, छायामय; प्रत्यक्ष अनुभवात जी निश्चिती असते, काळाशी जी झटापट असते ती तेथे नाही. खरे म्हणजे वर्तमानकाळाचे सद्य:स्वरूप माझ्यासमोर उरतच नाही; परंतु भूतकाळाचे अविचल मूर्तीचे स्थाणुवत असे स्वरूपही त्याला आलेले नसते.
किंवा एखाद्या भविष्यवाणी बोलणार्या द्रष्ट्याची भूमिकाही मी घेऊ शकत नाही; आणि भविष्यासंबंधी लिहिणे करू शकत नाही. माझे मन भविष्याचे चित्र स्वत:शी रंगवीत असते ही गोष्ट खरी. पुष्कळ वेळा मी भविष्याचा विचार करीत असतो, त्याच्या तोंडावरचा पडदा फाडून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो; माझ्या आवडीच्या वस्त्रांनी त्याला नटवतो. परंतु हे कल्पनातरंग शेवटी फोल आहेत. भविष्याचे स्वरूप अनिश्चित, अज्ञात असेच राहते; आपल्या आशा फोल ठरणार नाहीत, मानवजातीची स्वप्ने वाया जाणार नाहीत, याची ग्वाही कोण देणार ? खातरजमा कोण करणार ?
शेवटी भूतकाळ उरतो. परंतु एखाद्या पंडिताप्रमाणे, इतिहासकाराप्रमाणे वस्तुस्थितिनिरपेक्ष असे मी लिहू शकत नाही; माझ्याजवळ तेवढे ज्ञानही नाही. तसेच अशा लेखनासाठी लागणारी तयारी, ते विवक्षित शिक्षण, याही गोष्टी माझ्याजवळ नाहीत. तशा प्रकारचे लिखाण करण्याची या वेळची माझी मन:स्थितीही नाही. भूतकाळाचे पुष्कळदा माझ्यावर असह्य दडपण पडते. कधी कधी जेव्हा भूतकाळ वर्तमानकाळाला स्पर्श करतो, त्या वेळेस माझे हृदय उचंबळते, थोडी जिवंतपणाची ऊब येते. कारण त्या भूतकाळाला एक प्रकारचे वर्तमानकालीन स्वरूप त्या क्षणी येत असते. परंतु असे ज्या वेळेस नसते त्या वेळेस भूतकाळ मला थंड गोळ्यासारखा निर्जीव, नीरस, उजाड असा भासतो. कसलीच ऊब तेथे मिळत नाही. मी मागे ज्याप्रमाणे लिहिले त्याचप्रमाणे गतकालीन इतिहासाला माझ्या आजकालच्या विचारांशी, कृतीशी, कोणत्यातरी संबंधाने जोडून मगच मला भूतकाळाविषयी लिहिणे शक्य होईल. अशा प्रकारचा इतिहास लिहिल्याने गटे म्हणे त्याप्रमाणे भूतकाळाचा मग बोजा वाटत नाही; तो बोजा उचलतानाही एक प्रकारचा आधार वाटत असतो, विसावा मिळत असतो. मनोविश्लेषणपध्दतीप्रमाणेच हीही पध्दती आहे असे मला वाटते. फरक इतकाच की, येथे ही पध्दती एखाद्या व्यक्तीला लावण्याऐवजी एखाद्या मानववंशाला किंवा सर्व मानवजातीलाच लावण्यात येत असते.
भूतकाळाचे ओझे, त्यातील वाइटाचे नि चांगल्याचे ओझे आपल्या शक्तीला झेपण्यासारखे नसते. कधी कधी तर त्या ओझ्याखाली आपण जवळजवळ गुदमरतो. हिंदुस्थान आणि चीन यांच्यासारख्या इतिहासाच्या बाबतीत तर विशेषेकरून हा अनुभव येतो. या दोन्ही देशांच्या संस्कृती अति प्राचीन अशा आहेत. निट्शेने म्हटल्याप्रमाणे ''शतकानुशतकांचा शहाणपणाच नव्हे, तर वेडेपणाही आपणातून प्रकट होऊ लागतो. वारसदार होणे धोक्याचे आहे.''