प्रकरण ५ : युगायुगांतून 65
इ.स. १०८८ मधला एक गंमतीदार तामीळ लेख आहे. 'पंधराशांचा सहकारी संघ' असा त्यात उल्लेख आहे. हा संघ बहुधा व्यापार्यांचा असावा. त्या लेखात पुढील वर्णन आहे. ''हे शूर लोक कृतयुगापासून जगातील अनेक देशांतून हिंडत फिरत आहेत; त्यासाठीच त्यांचा जन्म आहे. जमिनीवरील मार्गाने आणि समुद्रमार्गाने साही खंडांत ते शिरून सर्व प्रकारचा व्यापार करतात. हत्ती, घोडे, हिरे, माणके, सुगंधी पदार्थ, औषधे घाऊक किंवा किरकोळ दोन्ही प्रकारे विकतात.''
हिंदी लोकांच्या त्या आरंभीच्या वसाहतींच्या साहसापाठीमागची ही अशी पार्श्वभूमी होती. व्यापार, साहस, आपले राज्य वाढविण्याची उत्कट इच्छा इत्यादी अनेक कारणांमुळे हिंदुस्थान पूर्वेकडील प्रदेशांकडे वळला. या पूर्वेकडील प्रदेशांचे जुन्या संस्कृतीतील सर्वसाधारण नाव स्वर्णभूमी असे आहे. सोन्याची भूमी किंवा स्वर्णदीप-सोन्याचे बेट असेही नाव आहे. या नावातही आकर्षकता आहे. पहिले वसाहतवाले गेले ते तेथेच घरदार करून कायम राहिले. त्यांच्या पाठोपाठ दुसरे गेले. अशा प्रकारे शांततामय आक्रमण सुरू झाले. तेथे जे मूळचे लोक होते, त्यांच्यात हिंदी लोक मिसळले व संमिश्र संस्कृती उत्क्रान्त होऊ लागली. इतकी सिध्दता झाल्यावरच बहुतेक हिंदुस्थानातून राजकीय वर्ग म्हणजे क्षत्रिय आले. ते मोठ्या घराण्यातील तरुण लोक साहसाच्या हौशीने किंवा नवीन राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने आले. या बाजूला जे लोक आहे, त्यांतील पुष्कळसे मालव भागातील-माळव्यातील— असावेत आणि त्यावरूनच मलाया शब्द आलेला असावा असे म्हणतात. इंडोनेशियाच्या इतिहासात मलायाचा फार मोठा भाग आहे. काही आरंभीचे वसाहतकार कलिंगातून (ओरिसातून) गेले असावेत असा तर्क आहे. परंतु वसाहतीसाठी योजनाबध्द संघटित प्रयत्न दक्षिणेकडे पल्लव राजांनीच केला. आग्नेय आशियातील विख्यात असे शैलेन्द्र घराणे ओरिसातूनच आले अशी कल्पना आहे. त्या वेळेस ओरिसा म्हणजे बौध्दधर्माचा बालेकिल्ला होता, परंतु तेथील राजघराणे ब्राह्मणधर्मी होते. या सर्व वसाहती चीन आणि हिंदुस्थान या दोन सुधारलेल्या व सुसंस्कृत अशा फार मोठ्या देशांमध्ये होत्या. काही काही तर जमिनीच्या मार्गाने चिनी साम्राज्याला जाऊन भिडल्या होत्या, काही चीन व हिंदुस्थानच्या समुद्रमार्गावर होत्या. त्यामुळे या वसाहतींवर दोन्ही देशांचा परिणाम होऊन चिनी-हिंदी संस्कृतीचे संमिश्रण तेथे सुरू झाले. या दोन्ही संस्कृतींत संघर्ष नव्हता आणि त्यामुळे नाना प्रकारचे, विविध अर्थाने भरलेले असे अनेक संमिश्र नमुने निर्माण झाले. जमिनीवरचे ब्रह्मदेश, सयाम, इंडोचायना यांच्यावर चीनचा अधिक परिणाम झाला, तर जावा-सुमात्रादी बेटे, मलाया द्वीपकल्प यांच्यावर भारतीय परिणाम अधिक झाला. सामान्यत: जीवनाचे तत्त्वज्ञान आणि राज्यकारभाराची पध्दती चीनपासून आली, तर धर्म आणि कला ही हिंदुस्थानची आली. जमिनीवरचे प्रदेश व्यापारासाठी चीनवर अधिक अवलंबून असत. पुष्कळ प्रसंगी उभय देशांत एकमेकांच्या वकिलाती सुरू करीत. परंतु कांबोडियातीलही आणि अंग्कोर येथीलही भग्न अवशेषांमध्ये जी कला आहे ती भारतीय आहे, भारतीय वळणाची आहे हे स्पष्ट आहे. भारतीय कला लवचिक होती, विकासक्षम होती; ती जेथे जेथे जाई तेथे मूळ धरून नव्याने फले, नवरंग दाखवी. त्या देशाला अनुरुप अनुकूल असे रूप ती घेई, परंतु तसे करताना मूळचे भारतीय अंतरंग मात्र कायम राही. सर जॉन मार्शल म्हणतो, ''हिंदी कलेतील प्राणमयता आणि लवचिकपणा केवळ अपूर्व आहेत.'' त्याने पुढे असेही म्हटले आहे की, ''हिंदी आणि ग्रीक— दोन्ही कलांमध्ये त्या त्या देशांच्या गरजांप्रमाणे स्वत:चे स्वरूप बनविण्याची शक्ती आहे. त्यांचा ज्यांच्या ज्यांच्याशी म्हणून संबंध येई, त्या लोकांच्या धर्माला, देशाला व वंशाला अनुरूप असे रूप देण्यात ग्रीक आणि हिंदी कलांचा सारखाच हातखंडा आहे.''