प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 56
केमाल पाशा : आशियातील राष्ट्रवाद : इक्बाल
केमाल पाशा हिंदुस्थानातील हिंदु-मुसलमान दोघांचाही आवडता होता. परकी सत्ता आणि विच्छेद यांपासूनच त्याने केवळ तुर्कस्थानाचे रक्षण केले असे नाही, तर युरोपातील साम्राज्यवादी सत्तांची कुटिल कारस्थाने- विशेषत: इंग्लंडची- त्याने हाणून पाडली होती. परंतु आता तुर्कांचे धोरण जसजसे संपूर्णपणे प्रकट होऊ लागले तसतसे त्यांच्याविषयी सनातनी मुसलमानांना वाटणारे प्रेम कमी होऊ लागले. केमाल धर्मांध नव्हता. धर्मांकडे त्याचे लक्ष नव्हते. सल्तनत आणि खिलाफत त्याने नष्ट केली. धर्मापासून फारकत असलेले सरकार त्याने स्थापिले. धार्मिक संप्रदाय नष्ट केले म्हणून त्याच्या ह्या अर्वाचीनतम धोरणामुळे एक प्रकारचा मूक संताप येथील मुसलमानांत वाढत होता. परंतु नेमक्या त्याच्या याच धोरणामुळे तरुण हिंदु-मुसलमानांच्या गळ्यातील तो ताईत होता. १८५७ च्या काळापासून हिंदी मुसलमानांनी जे एक स्वप्न मनात खेळविले होते, ते आता तुर्कांच्या या धोरणामुळे समूळ भंगले. पुनश्च एक प्रकारची शून्यता त्यांना वाटू लागली. राष्ट्रीय चळवळीत सामील होऊन अनेक मुसलमानांनी ही पोकळी भरून काढली. पुष्कळांनी तर पूर्वीच प्रवेश केलेला होता. सरंजामशाही स्वरूपाचे विचार आणि अर्वाचीन वृत्तीप्रवृत्ती यांच्यामध्ये खरा झगडा होता. खिलाफतीच्या प्रचंड चळवळीमुळे सरंजामशाही नेतृत्व पार नष्ट झाले होते. परंतु ही चळवळ सामाजिक किंवा आर्थिक पायावर उभारलेली नव्हती. बहुजनसमाजाच्या गरजांचा तिच्यात विचार नव्हता. तिचा मध्यबिंदू अन्यत्र होता. परंतु आता तुर्कांच्या धोरणामुळे तो प्राणमय मध्यबिंदूच नष्ट झाला आणि खिलाफत चळवळ कोलमडून पडली. बहुजन मुस्लिम समाज गोंधळला आणि राजकीय चळवळीचाच त्यांना वीट आला. ते जुने सनातनी पुढारी पुन्हा हळूहळू पुढे सरकले. ब्रिटिशांच्या धोरणाचीही त्यांना यथापूर्व मदत झाली. परंतु पूर्वीच्या स्पर्धातीत नेतृत्वाप्रत ते पुन्हा जाऊ शकले नाहीत. कारण परिस्थितीच बदलली होती. उशीराने का होईना मुसलमानांतूनही एक मध्यमवर्ग पुढे येत होता आणि राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालच्या प्रचंड राष्ट्रव्यापक चळवळीच्या अनुभवामुळे महत्त्वाचे बदल झाले होते.
मुस्लिम बहुजनसमाजाची आणि नव्या वर्धमान मध्यम वर्गाची मनोरचना परिस्थितीमुळेच जरी बदलत होती तरी सर अहंमद इक्बाल यांनीही या बाबतीत खूप परिणाम केला आहे. मध्यमवर्ग, विशेषत: नवतरुण मंडळी यांच्यावर इक्बालांच्या विचारांची प्रभावी छाप पडली. बहुजनसमाजावर इक्बालांमुळे फारसा परिणाम झाला नाही. उर्दूत तेजस्वी राष्ट्रीय काव्ये लिहून इक्बालांनी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली होती. त्या कविता अती लोकप्रिय झाल्या. बाल्कन युध्दाच्या वेळी ते इस्लामी विषयाकडे वळले. परिस्थितीचा आणि मुसलमानांत सर्वत्र पसरलेल्या भावनांचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्यांनी स्वत:ही त्या भावनांना वळण दिले, त्या भावना अधिक प्रज्वलित केल्या. परंतु ते बहुजन समाजाचे पुढारी असे नव्हते. ते कवी होते, जुन्या सरंजामशाही व्यवस्थेशी संबंध असलेले एक बुध्दिप्रधान तत्त्वज्ञानी होते. कश्मिरी ब्राह्मणकुळातून ते आलेले. मुस्लिम नवसुशिक्षितांना, नवबुध्दिमंतांना पर्शियन आणि उर्दूमधील सुंदर काव्याने त्यांनी एक वैचारिक तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी दिली; त्यांचे मन या काव्यातील तत्त्वज्ञानाने सवता सुभा निर्माण करण्याकडे वळले. त्यांच्या काव्यगुणामुळे त्यांना लोकप्रियता लाभली होती, यात शंका नाही; परंतु मुस्लिम मनोबुध्दीची त्यांनी एक भूक भागविली होती. चिकटून राहायला त्यांना काहीतरी एक ध्येय हवे होते, ते त्यांनी दिले म्हणून त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली. ते जुने सर्वंकष इस्लामी ध्येय आता अर्थहीन झाले होते. खिलाफतीची चळवळ खतम झाली होती. प्रत्येक इस्लामी देश- तुर्कस्थान तर फारच- प्रखर राष्ट्रीय बनला होता. इतर इस्लामी देशांविषयी कोणी विचार करीत नव्हते. अन्यत्रानुसार आशियातही राष्ट्रवाद ही एक प्रभावी शक्ती होत होती, हिंदी राष्ट्रीय चळवळ सामर्थ्यसंपन्न होऊन पुन:पुन्हा ब्रिटिश सत्तेला आवाहन देत होती. हिंदी राष्ट्रीय चळवळीने मुसलमानांची मते हलली होती, आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात पुष्कळ मुसलमानांनीही मोठा भाग उचलला होता. तथापि हिंदी राष्ट्रीय चळवळीत हिंदूंचे वर्चस्व असे आणि या राष्ट्रीय चळवळीस थोडेफार हिंदुस्वरूप आले होते; आणि म्हणून मुस्लिम मनात संघर्ष सुरू झाला. या राष्ट्रीय चळवळीस आपण आपल्या इच्छेनुरूप रंगरूप देऊ शकू, असा प्रयत्न करू शकू या भावनेने अनेकांनी राष्ट्रीय चळवळीचा स्वीकार केला. पुष्कळांना या राष्ट्रीय चळवळीविषयी सहानुभूती वाटत असूनही ते अलिप्त राहिले; त्यांचा काही निश्चय होईना, आणि इक्बालांच्या काव्यात्मक तत्त्वज्ञानाने ज्या गोष्टींची भूमिका तयार करून ठेवली होती, त्या सवत्यासुभ्याच्या ध्येयाकडे दुसरे पुष्कळसे वळले.