प्रकरण ५ : युगायुगांतून 42
बुध्दविरोधी अशी मुळीच नव्हती, परंतु ही ब्राह्मणधर्मानुकूल होती, ब्राह्मणधर्माचे महत्त्व व सत्ता वाढली : बौध्दधर्मातील पारलौकिकतेविरूध्द हे बंड होते. निवृत्तिमार्गाविरुध्द प्रवृत्तिमार्गाचे ते पुनरुत्थान होते. नंतरच्या गुप्त राजांना हूण वगैरेंच्या हल्ल्यांशी निकराने तोंड द्यावे लागले; आणि जरी शेवटी त्यांचा नि:पात झाला, तरी एकंदरीत देश डबघाईला येऊन एक प्रकारचा अवनतकाळ, र्हासाचा काळ सर्वत्र दिसू लागला. त्यानंतरही तेजस्वी, प्रतापी कालखंड दिसत नाही असे नाही, थोर पुरुष मधूनमधून दिसतातही. परंतु बौध्दधर्म आणि हिंदुधर्म दोन्हीही अवनत झाले, दोघांना उतरती कळा लागली, व नाना भ्रष्ट प्रकार त्यांच्यात शिरून रूढ झाले. दोन्ही धर्मात काही फरकच दिसेना. शेवटी ब्राह्मणधर्माने जरी बौध्दधर्माला आत्मसात केले असले, तरी तसे करीत असताना ब्राह्मणधर्मातही अनेक फेरफार झाले.
आठव्या शतकात हिंदुस्थानातील अत्यंत महान अशा तत्त्वज्ञान्यांपैकी एक जन्माला आला. या महापुरुषाचे नाव शंकराचार्य. हिंदू संन्याशांसाठी त्यांनी मठ स्थापिले. बौध्दधर्मातील भिक्षूंच्या संघाचे हे अनुकरण होते. यापूर्वी ब्राह्मणधर्मात संन्यासी नव्हते असे नाही. परंतु संन्याशांची संघटना अशी नव्हती.
बौध्दधर्माचे काही अवनत प्रकार पूर्वबंगाल, सिंध, वायव्य भाग यात सुरू राहिले. बाकी इतरत्र हिंदुस्थानात त्याचे नाव फारसे उरले नाही व तो लोपला.
भारतीय तात्त्विक दृष्टी
जरी एका विचारातून दुसरा येत असतो, आणि प्रत्येक विचाराचा जीवनाच्या हरघडी बदलणार्या विणावटीशी संबंध असतो, आणि मानवी मनोबुध्दीची तर्कानुसारी गति-प्रगतीही दिसत असते तरी, विचारांची गल्लत होतच असते, जुने आणि नवे विचार बरोबरीने जात असतात, त्यांचे एकमेकांशी जमत नसते; पुष्कळदा ते विरोधी असतात. व्यक्तीचे मनसुध्दा नाना विरोधांनी भरलेले असते. त्याच्या डोक्यात एकाच वेळी परस्परविरोधी विचार थैमान घालीत असतात. त्याच्या कृतीतही कधी कधी मेळ घालणे कठीण पडते. जे राष्ट्र संस्कृतीच्या वाढीच्या सर्व पायर्यांचा अंतर्भाव करून उभे असते, त्या राष्ट्रातील व्यक्तीत व लोकांच्या वृत्तिप्रवृत्तींत, विचारांत, आचारांत, समजुतींत भूतकाळापासून आतापर्यंतच्या विविध युगांचे, कालखंडांचे नमुने आपणांस दिसून येत असतात. जरी त्यांचे आजचे जीवन आजकालच्या सामाजिक व सांस्कृतिक नमुन्याप्रमाणे चाललेले दिसले—आणि असे ते न करतील तर जीवनाच्या वाहत्या प्रवाहापासून ते दूर फेकले जातील, अलग केले जातील- तरी त्याच्या आचारविचारांच्या पाठीमागे पूर्वीच्या प्राचीन समजुती, विचार केल्यावाचूनही खर्या मानलेल्या अनेक गोष्टी दिसून येतील. आश्चर्य हे की, औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशांतूनही हे दिसून येईल. ज्या देशातील लोक अगदी नवीनातील नवीन शोधाचाही उपयोग करून घेत असतात त्या देशातील लोकांजवळही बुध्दीला न पटणार्या, तर्कासमोर न टिकणार्या अनेक समजुती आपणांस दिसतात. राजकारणी मनुष्य बुध्दिमत्तेने तर्कशक्तीने अलौकिक नसूनही आपल्या धंद्यात तो यशस्वी होऊ शकेल. एखादा वकील सुप्रसिध्द कायदेपंडित असूनही अनेक बाबतींत केवळ अडाणी आढळेल. अर्वाचीन युगाचा विशेष आदर्श म्हणजे जो शास्त्रज्ञ तोही शास्त्राची विशिष्ट दृष्टी व पध्दती प्रयोगालयाच्या बाहेर येताच विसरतो, हे आश्चर्य. आपल्या रोजच्या प्रश्नासंबंधी संसारातील ऐहिक गोष्टींच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येईल. तत्त्वज्ञानात, अध्यात्मात जरा दूरचे प्रश्न असतात. रोजच्या जीवनाशी त्यांचा तितकासा संबंध नसतो, जास्त शाश्वत स्वरूपाचे ते प्रश्न असतात, आपणापैकी पुष्कळांना त्याचे आकलनही होणे, मनोबुध्दीला शिक्षण दिल्याशिवाय काहीएक वळण, दृष्टी दिल्याशिवाय ते प्रश्न समजणे कठीणच असते. परंतु असे असूनही आपण स्वत: विचार करून जाणूनबुजून निश्चित केलेले म्हणा, किंवा परंपरागत, किंवा दुसर्या एखाद्याचे परंतु स्वयंसिध्द समजून आपण स्वीकारलेले काही एक जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रत्येक व्यक्तीचे असते. कधी कधी विचारांचे संकट टाळण्यासाठी आपण कोणत्याही धार्मिक गोष्टीवर श्रध्दा ठेवतो, कधी राष्ट्राच्या भवितव्यावर श्रध्दा ठेवून असतो, किंवा कधी अस्पष्ट परंतु सुखदायी अशा मानवहितबुध्दीवर विसंबून स्वस्थ असतो. पुष्कळ वेळा या सर्व आणखी कितीतरी गोष्टींची मनात अशी खिचडी असते की, त्या खिचडीत नाना प्रकारांचा एकमेकांशी अगदी थोड संबंध असल्यामुळे एकाच व्यक्तीच्या डोक्यात आपापले संसार भिन्नभिन्न चालविणारी अनेक व्यक्तिमत्त्वे बळावून वृत्ती द्विधा, अनेकमुखी होते.