प्रकरण ६ : नवीन समस्या 23
जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था यांचे शास्त्र व आचार. एकत्र कुटुंबपध्दती
हॅव्हेल म्हणतो, ''हिंदुस्थानात धर्म म्हणजे अंधश्रध्देने मानण्याची वस्तू नसून, मानवी व्यवहाराचे, आचाराचे, ते एक प्रात्यक्षिक शास्त्र आहे; आध्यात्मिक विकासाच्या निरनिराळ्या पायर्यांना अनुकूल, जीवनातील नानाविध परिस्थितींशी जुळवून घेणारी अशी ही प्रत्यक्ष व्यावहारिक पध्दती आहे.'' प्राचीन काळी जेव्हा हिंदी-आर्य संस्कृतीला पहिला आकार आला, तेव्हा सांस्कृतिक बाबतीत त्याचप्रमाणे बौध्दिक आणि आध्यात्मिक विकासाच्या बाबतीत परस्परांपासून अत्यन्त भिन्न असणार्या अशा सर्व लोकांच्या गरजा धर्माला भागविणे प्राप्त होते. प्राथमिक अवस्थेतील वनचारी लोक तेथे होते. नाना चिन्हांची पूजा करणारे, नाना आकृतींची पूजा करणारे लोक होते. सर्व प्रकारच्या शकुन, मंत्र वगैरेसारख्या भोळसट धर्मसमजुतीवर विश्वास ठेवणारे लोक होते; आणि आध्यात्मिक विचारक्षेत्रात उंच भरार्या मारणारे असेही लोक होते. या दोन टोकांमध्ये नाना प्रकारचे विश्वास, नाना आचार-विचार, नाना कल्पना यांचे साम्राज्य होते. परमोच्च विचारांच्या पाठीमागे कोणी जात होते तर इतरांना त्या विचारांचे आकलन होणेही दुरापास्त होते. सामाजिक जीवन जसजसे वाढू लागले, तसतसे काही समान विचार, समान कल्पना यांचाही प्रचार झाला. तरीही सांस्कृतिक भेद, स्वभावभेद होतेच. हिंदी आर्य-संस्कृतीचा एक विशेष हा होता की, जुलूम जबरदस्ती करून शक्तीच्या जोरावर कोणतीही धार्मिक श्रध्दा दडपून टाकायची नाही, कोणतेही धर्ममत मोडून टाकायचे नाही. त्या त्या लोकसमूहांचा आपापल्या समजुतीप्रमाणे, मानसिक विकासाच्या पायरीप्रमाणे स्वत:ची ध्येये ठरवायला व तद्नुरूप वागायला पूर्ण स्वातंत्र्य असे. दुसर्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न चाले, परंतु कोणाचाही विरोध नसे. कोणावर दडपण नसे.
सामाजिक संघटनेच्या बाबतीत हीच, किंबहुना अधिकच कठीण परिस्थिती होती. परस्परांपासून अत्यन्त विभिन्न असलेल्या जातिजमातींना, जनसमूहांना एका सामाजिक पध्दतीत कसे गोवायचे हा प्रश्न होता. सर्व समाजाशी सहकार्य तर करायचे आणि पुन: स्वत:च्या जातीचे, स्वत:च्या समूहाचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र जीवनक्रम यांना बाध आणू न देता आपापला विकास करून घ्यायचा, हे सारे कसे साधायचे ? आजकाल सर्वच देशांत अल्पसंख्य जातिजमातींचे जे प्रश्न उभे राहिले आहेत, तशाच प्रकारचा तो प्राचीन भारतीय प्रश्न होता. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांनी प्रत्येक नागरिकाला शंभर टक्के अमेरिकन करून हा प्रश्न सोडविला आहे. काही एका विशिष्ट नमुन्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असे ते करतात. परंतु ज्यांना प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचा भूतकाळ आहे, अमेरिकेप्रमाणे सोपा, सुटसुटीत ज्यांचा प्रश्न नाही, त्यांना हा प्रश्न सोडविणे कठीण जाते. कॅनडातही वंश, धर्म आणि भाषा या बाबतीत स्वतंत्र जाणीव बाळगणारे असे फ्रेंच आहेत. युरोपात हे विरोध अधिकच खोल गंभीर आहेत, असे असूनही ते अमेरिकेत आले की अमेरिकन नमुन्याप्रमाणे वागतात. ते सारे अमेरिकन होतात. परंतु ही गोष्ट फक्त युरोपातून येणार्यांनाच लागू आहे, कारण अमेरिकन व युरोपियन यांची एक समान पार्श्वभूमी आहे, एक समान अशी त्यांची संस्कृती आहे. परंतु जे युरोपियन नाहीत, ते अमेरिकन नमुन्याशी जुळत नाहीत. अमेरिकेतील निग्रो शंभर टक्के अमेरिकन असूनही त्यांची निराळीच जात आहे. त्यांना अलग ठेवण्यात आले आहे. इतरांना जे हक्क, ज्या संधी सहजपणे मिळतात, त्या निग्रोंना नाहीत. इतर देशांतून यापेक्षाही दुष्ट प्रकार आहेत. अनेक राष्ट्रांचे संघराज्य निर्मून सोव्हिएट रशियानेच फक्त नाना राष्ट्रे व नाना अल्पसंख्यजमाती यांचा प्रश्न सोडविला आहे असे सांगतात.