प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 21
उपनिषदे
ख्रिस्तपूर्व ८०० हा उपनिषदांचा काळ समजला जातो. त्यांच्यामुळे इंडो-आर्यन विचारांच्या प्रगतीने आणखी एक पाऊल— फार मोठे पाऊल पुढे टाकले. आता आर्य स्थिरावल्याला बराच काळ होऊन गेला होता एक नवी संस्कृती स्थिर होऊन भरभराटू लागली होती. नव्याजुन्यांचे मिश्रण झाले होते. आर्यांचे विचार व आर्यांची ध्येये यांचेच जरी या संमिश्रणात प्रभुत्व दिसले तरी पूजेच्या अतिप्राचीन प्रकारांची, अतिजुन्या धार्मिक कल्पनांची पार्श्वभूमीही त्यात होती. वेदांचा आदराने उल्लेख करण्यात येई. तरी कधी कधी त्या उल्लेखात सौम्य वक्रोक्तीही दिसे. त्या वैदिक देवदेवतांवर आता भागत नव्हते व विधीच्या अगडबंब अवडंबराची तर टर उडविण्यात येऊ लागली. परंतु जुन्याचे संबंध तोडण्याची खटपट नव्हती, उलट जुन्याचा आधार घेऊनच प्रगतीचे पुढचे पाऊल पडलेले दिसते.
उपनिषदांत सर्वत्र जिज्ञासूची वृत्ती, बुध्दीचा साहसी स्वैर संचार व सत्य काय ते शोधायची तळमळ दिसते. अर्वाचीन वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पध्दती अर्थातच नाही. परंतु या सत्यसंशोधनाच्या प्रयोगात वैज्ञानिक पध्दतीचे काहीसे स्वरूप दिसून येते. बाबावाक्य म्हणून प्रमाण मानण्याची तयारी मुळीच नाही. ज्या उपनिषदांतून पुष्कळसे अगदी सामान्य असेही आहे; अर्थहीन आणि आजच्या परिस्थितीशी ज्याचा काही संबंध नाही असेही भारूड भरपूर आहे. आत्म-साक्षात्कारावर सारा भर आहे, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याचा सारा प्रयत्न आहे. हे दृश्य जगत् केवळ मिथ्या मानलेले नाही; परंतु त्याची सत्यता सापेक्ष मानलेली आहे. दृश्य जगत् म्हणजे त्याच्या अंतरी जे गूढ, शाश्वत सत्य आहे, त्याचे एकरूप आहे असे मानले आहे.
उपनिषदांत अनेक दुर्बोध स्थळे आहेत, त्यांचे नाना अर्थ लावण्यात येत असतात. पण ते वाद पंडितांचे, तत्त्वज्ञान्यांचे आहेत. उपनिषदांचा एकंदरीत ओघ अद्वैतमताकडे आहे; व त्या काळी भिन्नभिन्न मतांचे जे वाद आवेशाने चालत असतील त्यांचा समन्वय करून तत्त्वबोध काढण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. पध्दती समन्वय करण्याची आहे, जादूटोणा, आणि अशाच प्रकारची भूतविद्या, प्रेतविद्या इत्यादी परलोक विद्येची साधने यांना निषिध्द ठरविले आहे. खरा अर्थ न समजता आचरलेले कर्मकाण्ड व धर्मविधी फोल आहेत असे म्हटले आहे. खरा अर्थ न समजता आचरलेले कर्मकाण्ड व धर्मविधी फोल आहेत असे म्हटले आहे. कर्मकाण्डात, यज्ञयागांत गढलेले स्वत:ला विद्वान आणि ज्ञानी समजतात; परंतु आंधळ्याने आंधळ्याला न्यावे त्याप्रमाणे ते चाचपडत जात असतात; आणि त्यांना अंतिम ध्येय मुळीच सापडत नाही. वेद हे सुध्दा अपरा विद्येपैकीच; त्यांचे ज्ञानही खालच्या दर्जाचे. त्यापेक्षा आत्मविद्या ही श्रेष्ठ, पराविद्या असे सांगून प्रत्यक्ष आचरणात संयमाशिवाय नुसते तात्त्विक पांडित्य व्यर्थ आहे अशीही सूचना दिलेली आहे. आध्यात्मिक तत्त्वशोधनाचे धाडशी प्रयत्न व सामाजिक कर्तव्ये यांचा मेळ घालण्याचा सारखा प्रयत्न आहे. जीवनामुळे स्वत:वर येऊन पडलेली कर्तव्ये, ॠणे ही पार पाडलीच पाहिजेत; परंतु अनासक्त रीतीने ते सारे करावे.
व्यक्तीच्या पूर्णत्वावर, व्यक्तीच्या मोक्षावर अधिक भर दिल्यामुळे सामाजिक दृष्टी असायला पाहिजे तेवढी नाही. उपनिषदे सांगतात, ''व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही. आत्म्याहून अधिक मोठे काही नाही.'' समाज आता स्थिर झाला आहे, नीट व्यवस्थित चालला आहे असे गृहीत धरलेले असावे; व म्हणूनच व्यक्तीच्या विकासावर अधिक भर दिला जाऊन ही पूर्णता, हा वैयक्तिक मोक्ष याचा शोध करीत मानवी मन स्वर्ग-पाताळ हिंडून अखेर मनाच्या आत-आतल्या गुहा-गुंफा धुंडू लागले. हिंदी दृष्टी ही संकुचित राष्ट्रीय दृष्टी नव्हती, तरीही हिंदुस्थान म्हणजेच जगाचा प्राण, जगाचा मध्यबिंदू अशी कल्पना असावी. प्राचीन काळी चीन, ग्रीस, रोम सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या काळात असेच वाटत असे. परंतु महाभारत म्हणते, ''शरीराचे अवयव जसे एकमेकांवर अवलंबून असतात, तसे या मर्त्यलोकातले मानव परस्परावलंबी आहेत.''