प्रकरण ६ : नवीन समस्या 18
सर्व हिंदुस्थानभरच ही नवीन चळवळ होत होती. नवनवीन कल्पना लोकांच्या मनात येऊन नवीन विचारांमुळे लोकांच्या मनातही चलबिचल झाली होती. पूर्वीप्रमाणे न कळत भारतीय मनोबुध्दीत प्रतिक्रिया होत होती. विदेशी वृत्तिप्रवृत्तींना आत्मसात करण्याचा प्रयत्न होत होता आणि त्याचबरोबर स्वत:मध्येही काही बदल होत होते. या चळवळीतून नवीन धर्मसुधारक उदयाला आले. त्यांनी समन्वयी संस्कृतीचा उपदेश केला. जातिभेद, वर्णभेद इकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. कधी कधी या भेदांबर त्यांनी प्रखर टीका केली. दक्षिणेकडे पंधराव्या शतकात रामानंद साधू पुढे आला. परंतु त्याच्यापेक्षा त्याचा विणकर शिष्य कबीर याचेच नाव सर्वत्र दुमदुमले. कबिराच्या कविता, गाणी, दोहे सर्वत्र पसरली. आजही त्याचे काव्य लोकप्रिय आहे. उत्तरेकडे शिखांचा धर्मसंस्थापक नानक हा उदयाला आला. त्या पंथापुरतीच त्याची शिकवण राहिली नव्हती. त्याची शिकवण पंथांतीत होऊन सर्व जनतेत पसरली. या नवीन विचारांचा हिंदुधर्मावर परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही, आणि हिंदुस्थानातील मुसलमान धर्मही इतर ठिकाणच्यापेक्षा निराळा झाला. इस्लाममधील तीव्र एकेश्वरी मताचा हिंदुधर्मावर परिणाम झाला आणि हिंदुधर्मात अनेक भिन्नभिन्न देवदेवता आहेत या कल्पनेचा हिंदी मुसलमानांवर परिणाम झाला. बहुतेक हिंदी मुसलमान हे मूळचे हिंदूच होते. प्राचीन परंपरेतच ते वाढलेले होते, त्यांच्या आजूबाजूला तीच परंपरा असे. काही थोडे मुसलमान बाहेरून आलेले होते. नवप्लेटोवादातून ज्याचा मूळचा आरंभ बहुधा असेल तो मुस्लिम गूढवाद, सुफीपंथ यांचीही वाढ झाली.
परकीयांना आत्मसात करून घेण्यात येत होते, याचे एक स्पष्ट गमक हे होते की हे परकी लोकही देशी भाषेचा आधिकाधिक उपयोग करू लागले. अद्याप दरबारी भाषा पार्शियन होती. परंतु कितीतरी या पहिल्या मुसलमानांनी हिंदीत रचना केली आहे, चांगल्या प्रकारची पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यातील सर्वांत प्रसिध्द लेखक म्हणजे अमीर खुश्रू हा होय. हा तुर्क होता. संयुक्तप्रांतात त्याचे पूर्वज येऊन स्थायिक होऊन दोनतीन पिढ्या त्यांच्या अफगाण सुलतानांच्या कारकीर्दीत होऊन गेल्या होत्या. पर्शियन भाषेतील तो पहिल्या दर्जाचा कवी होता व त्याला संस्कृतही समजत असे. तो मोठा संगीतज्ज्ञ होता. हिंदी संगीतात त्याने नवेनवे प्रकार आणिले व असे म्हणतात की, हिंदुस्थानात लोकप्रिय असलेले तंतुवाद्य जे सतार, त्याचा अमीर खुश्रू हा निर्माता होता. अनेक विषयांवर त्याने लिहिले आहे. हिंदुस्थान कोणकोणत्या बाबतींत वरचढ आहे, श्रेष्ठ आहे, ते वर्णून त्याने या देशाची स्तुती केली आहे. धर्म, तत्त्वज्ञान, ज्ञान, न्याय, भाषा, व्याकरण (विशेषत: संस्कृत), संगीत, गणित, विज्ञान आणि रसाळ असे ते आम्रपाल- या सर्व गोष्टींत हिंदुस्थान अतुलनीय आहे असे तो म्हणतो !
परंतु अमीर खुश्रूची कीर्ती त्याने लोकभाषेत, हिंदीत जी गीते लिहिली आहेत, त्यांच्यामुळे मुख्यत्वे आहे. काही मूठभर पंडितांना समजेल अशी भाषा या लोकगीतांसाठी त्याने शहाणपणाने वापरली नाही. तो खेड्यातील लोकांकडे वळला. त्यांच्या भाषेसाठीच नव्हे, तर त्यांची रीतभात, त्यांची राहणी, त्यांचे जीवन कळावे म्हणून. निरनिराळ्या ॠतूंचे त्याने वर्णन केले आहे, आणि ते प्राचीन हिंदी पध्दतीप्रमाणे त्या त्या ॠतूंचे त्या त्या विशिष्ट छंदात आणि अनुकूल शब्दात त्याने वर्णन केले आहे. जीवनातील अनेक प्रसंगांचे या गीतांतून वर्णन आहे. नववधूचे आगमन, प्रियकरापासून किंवा प्रियेपासून ताटातूट, बरसातीचे दिवस आणि तापलेल्या भूमीतून पावसामुळे वर येणारे नवजीवन- या सर्वांचे वर्णन त्याच्या गाण्यांतून आहे. ही गाणी अद्यापही गायिली जातात. उत्तर आणि मध्य हिंदुस्थानातील कोणत्याही खेड्यात ती ऐकू येतील. विशेषत: पावसाळ्याचे दिवसांत जेव्हा झाडांना झोके बांधून खेड्यातील मुली-मुलगे झोके घेतात, आंब्याच्या किंवा पिंपळाच्या फांद्यांना झोके बांधून रमतात तेव्हा ही तुम्हांला ऐकू येतील.
अमीर खुश्रूने अनेक कोडी रचिली आहेत. लहानथोर सर्वांनाच ती आवडतात. एकप्रकारचे जणू ते उखाणेच आहेत. गीते, उखाणे, कोडी यांसाठी स्वत:च्या हयातीतच अमीर खुश्रू सर्वत्र प्रसिध्द झाला होता. त्याची ती कीर्ती वाढत राहिली, पसरत गेली आणि आजही ती आहे. सहाशे वर्षांपूर्वी लिहिलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. शब्दांत बदल न होता, सहाशे वर्षांपूर्वीची ज्याची गाणी अद्यापही लोकांच्या ओठांवर आहेत, अजूनही लोकांच्या हृदयाला ती मोहिनी पाडतात, असा दुसरा कवी मला माहीत नाही.