प्रकरण ५ : युगायुगांतून 66
हिंदू धर्माने व तत्त्वज्ञानाने जे आदर्श घालून दिले आहेत, त्यातूनच हिंदी कलेचे मूळ स्वरूप तयार झाले आहे. या पूर्वेकडील देशांत हिंदुस्थानातून धर्म प्रथम गेला आणि धर्मानुसारिणी कलाही पाठोपाठ गेली. आरंभीच्या वसाहती या बहुतेक नक्कीच ब्राह्मणधर्मी होत्या, बौध्दधर्म मागून पसरला. दोन्ही धर्म गोडीत शेजारी शेजारी नांदत होते. त्यामुळे संमिश्र असे पूजाप्रकारही अस्तित्वात आले. तेथील बौध्दधर्म हा मुख्यत: महायानपंथी असल्यामुळे लवचिक होता. तो त्या त्या परिस्थितीशी लगेच मिळवून घेई. स्थानिक चालीरीती, रुढी यांचा अधिक परिणाम झाल्यामुळे बौध्दधर्मातील आणि हिंदुधर्मातील मूळची वैचारिक आणि तात्त्विक शुध्दता तेथे राहिली नाही. पुढेपुढे बौध्दधर्मी आणि हिंदुधर्मी राज्यांत प्रचंड संघर्ष झाले, परंतु त्या लढाया राजकीय आणि आर्थिक स्वरूपाच्या, समुद्रमार्ग आणि व्यापार यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी म्हणून होत्या, धर्मासाठी नव्हत्या.
या हिंदी वसाहतींचा इतिहास जवळजवळ तेराशे वर्षांचा आहे. ख्रिस्त शकाच्या पहिल्या दुसर्या शतकापासून तो पंधराव्या शतकाच्या अंतापर्यंतचा काळ यात येतो. आरंभीच्या काही शतकांचा इतिहास सारा अंधारातच आहे. काही मोघम माहिती मिळते. लहान लहान राज्ये ठायी ठायी होती. हळूहळू ती एकत्र येताना आढळतात आणि पाचव्या शतकात मोठमोठी शहरे दिसू लागतात. आठव्या शतकात दर्यावर्दी साम्राज्ये उभी राहतात; ही साम्राज्ये केंद्रीभूत सत्तेची असली तरी अनेक भागांवर त्यांची सार्वभौमसत्ता मोघम स्वरूपात असे. सार्वभौमसत्ता मान्य केल्यावर त्या त्या देशांना स्वायत्तता बहुधा असे. कधी कधी असे हे मांडलिक देश स्वतंत्र होत आणि मध्यवर्ती सत्तेवरच हल्ला चढवायला निघत. या सार्या गोंधळामुळे त्या त्या कालखंडाचे स्वरूप नीट समजत नाही.
या राज्यांतील सर्वांत बलाढ्य शैलेंद्र साम्राज्य होते. यालाच श्रीविजयाचे साम्राज्य असेही म्हणतात. आठव्या शतकाच्या सुमारास सर्व मलायाशियात याचीच जमिनीवर व समुद्रावर अधिसत्ता होती. सुमात्रात याचीच राजधानी होती असा प्रथम समज होता, परंतु नवीन शोधांनी सिध्द झाले की, या साम्राज्याचा आरंभ मलायाद्वीपकल्पातच झाला होता. या साम्राज्याची सत्ता जेव्हा कळसाला पोचली होती, त्या वेळी या साम्राज्यात मलाया, सीलोन, सुमात्रा, जावाचा काही भाग, बोर्निओ, सेलिबीम, फिलिपाइन्स, फोर्मोसाचा भाग हे होते. हे साम्राज्य बौध्दधर्मी होते.
परंतु शैलेंद्र घराणे दृढमूल होऊन साम्राज्य स्थापण्याच्या पूर्वीच मलायात बलिष्ठ राज्ये होती व कांबोडिया, जावा येथेही होती. आर. जे वुइल्किन्सन म्हणतो, ''मलाया द्वीपकल्पाच्या उत्तरेला, सयामच्या सरहद्दीजवळ कितीतरी जुने अवशेष आहेत; ते दूरवर पसरलेले अवशेष हेच दर्शवतात की येथे पूर्वी प्रबळ राज्ये होती, समृध्द संस्कृती होती, सुखसंपत्तीला, ऐषारामाला तोटा नव्हता.'' चंपामध्ये (अनाममध्ये) तिसर्या शतकात पांडुरंगम् हे मोठे शहर होते; आणि पाचव्या शतकात कांबोज हे सुप्रसिध्द नगर होते. नवव्या शतकात जयवर्मा नावाचा राजा झाला. त्याने लहानसहान राज्यांचे एकीकरण केले आणि कांबोडियन साम्राज्य स्थापिले. त्याची अंग्कोर ही राजधानी होती. शैलेंद्र घराण्याच्या सत्तेखाली कांबोडिया मधूनमधून होता, परंतु शेवटी जू झुगारून कांबोडिया नवव्या शतकात स्वतंत्र झाला असे दिसते. हे नवे साम्राज्य चारशे वर्षे टिकले. त्यात मोठमोठे पराक्रमी राजे झाले. त्यांनी पुरे पट्टणे बांधली. जयवर्मा, यशोवर्मा, चंद्रवर्मा, सूर्यवर्मा इत्यादी राजे पराक्रमी व वैभवशाली होते. त्यांची अंग्कोर राजधानी आशियावर विख्यात झाली. तिला वैभवशाली अंग्कोर असे म्हणत. सीझरच्या रोम राजधानीहून ही राजधानी अधिक विशाल व भव्य असून दहाबारा लाख लोकांची तीत वस्ती होती. शहराजवळच प्रचंड 'अंग्कोरवट' हे मंदिर होते. तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य भरभराटले. इ.स. १२९७ मध्ये तेथे गेलेल्या एका चिनी वकिलाने राजधानीतील ऐश्वर्य व संपत्ती याचे वर्णन करून ठेवले आहे. परंतु असे हे भरभराटलेले साम्राज्य एकाएकी नष्ट झाले. ते इतके एकाएकी की काही नवीन बांधायच्या इमारती अर्धवटच राहिल्या. बाहेरूनही हल्ले आले आणि अंतर्गतही भानगडी होत्या. परंतु मेकांग नदीतील गाळ एकदम सर्वत्र पसरून शहराकडे जाणारे सारे रास्ते बुजून गेले व सभोवती सर्वत्र दलदल होऊन ही राजधानी ओस पडली.