प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 5
मनुष्याचे परस्पर-संबंध कसे असावेत हा प्रश्न किती महत्त्वाचा ! किती मूलगामी ! परंतु राजकारण नि अर्थकारण यांतच चर्चा व खडाजंगी करताकरता आपली सारी शक्ती खर्च होत जाते, आणि तो प्रश्न उपेक्षिलाच जातो. भारताच्या नि चीनच्या प्राचीन संस्कृतीत या प्रश्नाकडे नीट लक्ष दिले जात असे. या दोन्ही संस्कृती किती जुन्या, परंतु किती शहाण्या. समाजात सर्वांनी कसे वागावे याचे आदर्श त्यांनी घालून दिले होते. सामाजिक वर्तनाच्या विशिष्ट साच्याचा-नमुन्याचा-त्यांनी विकास केला होता. त्यांच्या त्या आदर्शात चुका असतील, परंतु व्यक्तीला त्यांनी एक प्रकारचे स्थैर्य दिले होते, एक प्रकारची दृढता दिली होती, तोल ठेवला होता. हिंदुस्थानात आज तो तोल सारा सुटला आहे, आणि इतर बाबतींत प्रगती करणार्या पाश्चिमात्य देशांत तरी तो कोठे आहे ? जीवनात तोल असणे म्हणजे स्थाणू होणे तर नव्हे ? प्रगतिपर फरक करायला समतोलपणा का विरोध करतो ? प्रगती पाहिजे असेल तर का बेतालपणाच हवा ? आणि समतोलपणा हवा असेल वर का प्रगती दूरच ठेवायला हवी ? एका गोष्टीसाठी का दुसरीचा त्याग करायला हवा ? समतोलपणा आणि अंतर्बाह्य प्रगती यांचा समन्वय आपणास करता आला पाहिजे. प्राचीनांचे शहाणपण आणि अर्वाचीनांचे विज्ञान आणि सामर्थ्य यांचा मेळ आपण घातला पाहिजे. जागतिक इतिहासाच्या अशा एका विशिष्ट टप्प्यावर आपण आज आलो आहोत की, असा मेळ जर आपण घालू शकलो नाही तर दोन्ही गोष्टी नष्ट होऊन सर्वनाश होईल.
१८३५ चा नाताळ
कमलाची प्रकृती सुधारू लागली होती. तसा फार मोठा फरक पडला होता असे नव्हे. परंतु काही दिवस फार चिंतेचे गेले तसे आता नव्हते. मनाला थोडा धीर आला होता. ताण थोडा कमी झाला होता. आलेल्या धोक्यातून ती पार पडली. प्रकृतीतील चढउतार जरा कमी झाले; आणि हीही एक प्रकारे प्रगतीच असे वाटले. आणखी एक महिना अशाच स्थितीत तिने काढला. तेवढ्यात इंदिरेसह मी इंग्लंडला उडत भेट देण्याची संधी साधली. आठ वर्षांत मी तेथे गेलो नव्हतो. आणि भेटून जा असा पुष्कळ मित्रांचा आग्रह सुरू होता, म्हणून गेलो.
मी बेडेनवेलरला परत आलो आणि पूर्ववत नित्याचा क्रम पुन्हा सुरू झाला. हिवाळा सुरू होऊन जिकडेतिकडे बर्फाने पांढरेशुभ्र दिसे आणि कमलाची प्रकृती पुन्हा ढासळली. पुन्हा आणीबाणीची-धोक्याची वेळ आली. तिचे प्राण जणू एखाद्या तंतूवर टांगले होते. जीव घुटमळत होता. १९३५ सालचे ते अखेरचे दिवस. बर्फातून, चिखलातून मी तिच्याकडे रोज जात होतो. वाटे किती दिवस, किती घटका आणखी कमला राहणार ? कोण सांगणार, कोणाला कळणार ? सर्वत्र हिवाळ्यातील शुभ्र शांती होती. बर्फाचा पांढरा कपडा पसरून झाकलेल्या वर्षाच्या शेवटच्या त्या शांत सृष्टीकडे पाहिले की मला मृत्यूच्या निश्चल शांततेचा भास होई व मला पूर्वी वाटत असलेली आशा लोपून मन खिन्न होई.
परंतु या आणीबाणीच्या प्रसंगालाही कमलाने तोंड दिले आणि तिचा जीव असा चिवट की ती त्यातूनही तगली. पुन्हा ती बरी दिसू लागली; अधिकच उत्साही दिसू लागली. मला येथून दुसरीकडे न्या असाही तिचा सारखा आग्रह होता. त्या जागेचा तिला कंटाळा आला होता. त्याला दुसरेही एक कारण होते. त्या सॅनिटोरियममधला एक आजारी मनुष्य मरण पावला. तो एक आयरिश मुलगा होता. तो कधी कधी कमलाला फुले पाठवी, एकदोन वेळा तिला भेटायलाही आला होता. कमलापेक्षा त्याची स्थिती पुष्कळच बरी होती. त्याला फिरायची परवानगी होती. परंतु तो अकस्मात गेला. त्याच्या मरणाची बातमी कमलापासून लपवून ठेवण्याची आम्ही कोशीस केली. परंतु आम्हाला यश आले नाही. जे आजारी असतात, आणि विशेषेकरून ज्यांना दुर्दैवाने अशा 'धामात' राहणे भाग असते त्यांना जणू सहावे ज्ञानेंद्रिय येते व त्यांच्यापासून आपण जे लपवू पाहतो ते नेमके त्यांना या नव्या इंद्रियाकडून कळते.
जानेवारीत थोडे दिवस मी पॅरिसला गेलो होतो व तेथून लंडनलाही गेलो. जीवन मला कर्मक्षेत्रात पुन्हा जोराने खेचू पाहात होते. लंडनमध्ये मला बातमी कळली की, एप्रिलमध्ये भरणार्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासाठी फिरून दुसर्यांदा माझी निवड करण्यात आली आहे. मित्रांनी आधी सूचना दिलीच होती. त्यामुळे ही गोष्ट मी अपेक्षितच होतो. कमलाबरोबर मी ह्या गोष्टीची चर्चा केली होती. माझ्यासमोर प्रश्न होता, की कमलाला तशा स्थितीत सोडून जावे का अध्यक्षपद नाकारावे. ती मला राजीनामा देऊ देईना. तिला थोडे बरे वाटत होते व आम्हा दोघांनाही वाटे की अधिवेशन संपल्यावर मला पुन्हा परत तिच्याकडे येता येईल.
१९३६ च्या जानेवारीच्या शेवटी कमलाला बेडेनवेलर येथून हलवून स्वित्झर्लंडमधील लॉसेन येथील आरोग्यधामात नेऊन ठेवले.