प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 52
राज्याची व्यवस्था
ख्रिस्त पूर्व ३२१ मध्ये उत्पन्न झालेल्या या साम्राज्याची, उत्तरेस काबूलपर्यंत आणि इकडे सर्व उत्तर हिंदुस्थानभर पसरलेल्या या मुलखाची व्यवस्था कोणत्या प्रकारची होती ? साम्राज्ये पूर्वी असत किंवा आजही आहेत त्याप्रमाणे हे साम्राज्यही अनियंत्रित सत्तेचे सर्वांच्या डोक्यावर माथ्याला एक सर्वसत्ताधीश व्यक्ती असणारे असे होते. खेडी, लहान गावे या स्वायत्त घटकांना असलेली स्थानिक स्वतंत्रता पुष्कळ होती व त्यांचा स्थानिक कारभार तेथील लोकांनीच ठरविलेल्या पोक्त मंडळींकडे असे. या स्थानिक स्वायत्ततेला लोक फार जपत आणि राजे-महाराजे या कारभारात फारशी ढवळाढवळ करीत नसत. तथापि मध्यवर्ती सत्तेचा, त्या सत्तेच्या चळवळींचा परिणाम सर्वत्र अनेक प्रकारे होतच असे, व काही बाबतींत हे मौर्य साम्राज्य अर्वाचीन हुकुमशाहीचीच आठवण करुन देते. आज व्यक्तीवर जितक्या प्रकारे सरकारी नियंत्रण आहे तितके ठेवणे त्या कृषिप्रधान संस्कृतीच्या काळात शक्य नव्हते. तरीही शासनसत्ता त्यातल्या त्यात शक्य तेवढे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. त्या वेळचे ते सरकार केवळ पोलिसी सरकार नव्हते. बाहेरुन कोणी स्वारी करणार नाही, देशात शांतता राहील येवढ्यापुरतेच पाहणारे आणि फक्त कर वसूल करणारे कोतवाली कारभारापुरते ते सरकार नव्हते.
सर्वत्र देशभर नोकरशाहीची पक्की चौकट होती. गुप्तहेरांचेही वारंवार उल्लेख आहेत. शेतकीचेही अनेक प्रकारे नियंत्रण करण्यात येत असे व व्याजाच्या दरावर मर्यादा असे. खाण्याकरता तयार केलेले व विक्रीकरता ठेवलेले अन्नाचे पदार्थ बाजारपेठा, उद्योगधंदे, कसाईखाने, गुरांची निपज, पाण्याचे हक्क, खेळ, वेश्या, गुत्ते यांचेसंबंधी नियम केलेले होते व त्यांची वरचेवर तपासणी करण्यात येत असे. वजने-मापे सर्वत्र एक करण्यात येऊन त्यांचे प्रमाण ठरविण्यात आलेले होते. धान्यात भेसळ करणे व धान्याचा साठा करुन गिर्हाइकाला पेचात धरणे याबद्दल कडक शासन होई. व्यापारावर कर असत; तसेच काही धार्मिक कृत्यांवरही कर होता. मठवाल्यांनी किंवा मंदिराच्या मालकांनी एखाद्या नियमाचा जर भंग केला, वेडेवाकडे वर्तन केले तर, त्यांची मिळकत जप्त करण्यात येई. व्यापार्यांनी अन्यायाचे कशाचा अपहार केला किंवा राष्ट्रावर संकट आले असता अपरंपार नफेबाजी केली तर त्यांची मालमत्ता जप्त होई. आरोग्याची व रुग्णालयांची तरतूद केली जात असे व मुख्य-मुख्य केंद्रांच्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यांची नेमणूक केलेली असे. विधवा, पोरकी मुले, आजारी आणि अपंग माणसे यांना सरकारी मदत मिळे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याकडे सरकारचे विशेष लक्ष असे; सरकारची जी धान्यकोठारे असत, त्यांतील निम्मा भाग दुष्काळ किंवा धान्यटंचाईच्या काळासाठी म्हणून शिलकी ठेवण्यात येत असे.
हे सारे कायदे, नियम खेड्यापेक्षा विशेषेकरुन शहरांनाच लागू असतील, आणि तेथेही प्रत्यक्षात पुन्हा कितपत पाळले जात असतील याचीही शंकाच आहे. परंतु प्रत्यक्षात हे सारे अमलात येत नसले तरी एकंदरीत ही तत्त्वेसुध्दा विचारात घेण्यासारखी आहेत. ग्रामपंचायही बहुधा स्वयंपूर्ण व स्वायत्त असत.
चाणक्याच्या अर्थशास्त्रात शेकडो विषयांचा ऊहापोह आहे. राज्यशास्त्राच्या तसेच प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या अंगोपांगांचा जवळजवळ सर्व दृष्टींनी त्यात विचार केला आहे. राजा, त्याचे मंत्री व त्याचे सल्लागार यांचे कर्तव्य, मंत्र्यांच्या व सल्लागारांच्या बैठकी, सरकारी खाती, कारस्थाने, राजनीती, मुत्सद्देगिरी, युध्द, तह या सर्व विषयांचे विवेचन या ग्रंथात आहे. चंद्रगुप्ताजवळ जे पायदळ, घोडदळ, रथ व हत्ती मिळून चतुरंग अवाढव्य सैन्य होते त्याची विस्तृत माहिती त्यात दिलेली आहे. *
-------------------------
* बुध्दिबळाचा खेळ हिंदुस्थानातच जन्मला. सैन्याच्या चतुरंगावरुनच हा खेळ सुचला असावा. चतुरंगापासूनच 'शतरंज' हा बुध्दिबळवाचक शब्द आहे. हिंदुस्थानातल्या पध्दतीप्रमाणे या खेळात चार गडी असत असे या खेळाच्या वर्णनात अल्बेरुणी लिहितो.