प्रकरण ५ : युगायुगांतून 4
उत्कृष्ट माल तयार करण्याबद्दल व दर्यावर्दी व्यापाराबद्दल दक्षिण हिंदुस्थानची विशेष ख्याती होती. दक्षिणेकडील लोकांचे आरमारी वर्चस्व होते व त्यांची मालाने भरलेली गलबते दूर द्वीपांतरी जात. ग्रीक लोकांच्या वसाहती दक्षिणेस होत्या आणि रोमन नाणीही उपलब्ध झाली आहेत. चालुक्य राजे आणि इराणचे सस्सनिद राजे यांच्यामध्ये एकमेकांचे वकील असत.
उत्तरेकडे जे पुन्हापुन्हा हल्ले येत, त्यांचा दक्षिणेवर तितकासा प्रत्यक्ष परिणाम होत नसे. अप्रत्यक्ष परिणाम होई तो असा की, उत्तरेकडचे काही लोक इकडे दक्षिणेकडे स्थलांतर करीत. त्यांच्यात काही कलावन्त, शिल्पी व नाना प्रकारचे कारागीरही असत. त्यामुळे प्राचीन कलात्मक परंपरेचे दक्षिण हिंदुस्थान केंद्र बनला व उत्तरेकडील परंपरेत परकीय आक्रमकांनी आणलेले नवेनवे प्रवाह मिसळून खूपच बदल पडला. हा क्रम पुढच्यापुढच्या शतकांत उत्तरोत्तर वाढत जाऊन दक्षिण हिंदुस्थान हा जुन्या हिंदु कर्मठ परंपरेचा बालेकिल्ला बनला.
शांततामय विकास; युध्दपध्दती
पुन:पुन्हा होणार्या सार्या आणि साम्राज्यामागून निर्माण होणारी साम्राज्ये यांची ही हकीकत ऐकून हिंदुस्थानात काय घडत होते याविषयी कदाचित चुकीची कल्पना होणे शक्य आहे. जवळजवळ एक हजार वर्षांचा काळ आपण पाहिला हे विसरता कामा नये. या दीर्घकालात मधूनमधून सुखशांतीची, व्यवस्थित राज्यकारभाराची शतके जात. उत्तरेकडील मौर्य, कुशान आणि गुप्त, तसेच दक्षिणेकडील आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट व इतर घराणी प्रत्येकी जवळजवळ दोन-तीनशे वर्षे राज्य करीत होती. हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेला निदान आतापर्यंत जितकी वर्षे झाली त्याहून अधिक वर्षे ती घराणी राज्य करीत होती. ही सारी घराणी एतद्देशीय होती आणि कुशान जरी उत्तर सीमेच्या पलीकडून आलेले असले तरी त्यांनी या देशातील परंपरेशी, संस्कृतीशी जुळवून घेतले आणि हिंदी राजांप्रमाणेच येथले रहिवासी होऊन राज्य केले. जवळच्या राज्यांच्या आपसात मधूनमधून लढाया होत, कधी सरहद्दीवर चकमकी झडत. परंतु एकंदरीत देशात सर्वत्र शांततेचा राज्यकारभार असे. सांस्कृतिक आणि कलात्मक गोष्टींना उत्तेजन देण्यात राजांना अभिमान वाटे. या सांस्कृतिक आणि कलात्मक चळवळी राज्याच्या सीमा ओलांडून सर्वत्र पसरत. कारण सांस्कृतिक आणि साहित्यिक एकच पार्श्वभूमी हिंदुस्थानभर होती. एखादा धार्मिक किंवा तात्त्विक वाद सुरू झाला की त्याचे पडसाद हिंदुस्थानभर उमटून, दक्षिणेत आणि उत्तरेकडे त्याची ठायीठायी लगेच चर्चा सुरू होई.
दोन राजांमध्ये जरी युध्द पेटले, किंवा कधी अंतर्गत क्रांती झाली, तर बहुजनसमाजाच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे फारशी ढवळाढवळ होत नसे; एकमेकांशी लढत असलेल्या राजांचे स्वायत्त ग्रामपंचायतींचे प्रमुख जे पंच त्यांच्याबरोबर झालेले करारमदार उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारे पिकांची नासाडी आम्ही होऊ देणार नाही आणि उद्देश नसताही यदाकदाचित जमिनीची नासधून झाली तर नुकसानभरपाई देऊ असे युध्दयमान राजे करारात कबूल करीत. बाहेरून येणार्या स्वार्यांच्या बाबतीत किंवा सत्तेसाठी होणार्या खर्याखुर्या रणकंदनात या गोष्टी लागू पडणे शक्य नसे हे सांगायलाच नको.