भारतीय संस्कृती 6
“ऐंसे भाग्य कधी लाहता होईन,
अवघे देखें जन ब्रह्मरूप
मग तया सुखा अंत नाहीं पार,
आनंदे सागर हेलावती”
अवघा समाज ज्याला स्वत:इतका पूज्य वाटत आहे, प्रिय वाटत आहे, त्याच्या भाग्याचे कोण वर्णन करील?
“जिकडे तिकडे देखें उभा
अवघा चैतन्याचा गाभा”
जिकडे तिकडे चैतन्यमय मूर्ती दिसत आहेत. दगडा-धोंड्यांतही चैतन्य पाहून डोलणारा संत मानवातील चैतन्य नाही का पाहणार?
“जेथें तेथें देखें तुझीच पाऊलें
सर्वत्र संचले तुझें रूप”
सर्वत्र तेच स्वरूप आहे. चैतन्यमय मूर्तीची सेवा करावयास संत तडफडत असतो. त्याला वाटते की सहस्त्र हात असते तर सहस्त्र बोलत्या-चालत्या मूर्तींना वस्त्रे नेसविली असती, जेवूखाऊ घातले असते!
परंतु लाखो वस्त्रहीन, अन्नहीन, चैतन्यमय देवाची पूजा करावयास कोण उभा राहतो! अद्वैत म्हणजे मरण आहे, स्वत:चे मरण!
“आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां”
स्वत: मेल्याशिवाय या आसमंतात पसरलेल्या परमेश्वराचे दर्शन होणार नाही. स्वत:चा अहंकार कमी करा. स्वत:ची पूजा कमी करा. जसजसे तुमचे ‘अहं’चे रूप क्षुद्र होत जाईल, तसतसे परब्रह्म तुम्हांला दिसू लागेल. बुद्धाने स्वत:चे निर्वाण केले, स्वत:ला मालवून टाकले, तेव्हा त्याला सर्व चराचराला अपरंपार प्रेम देता आले.
अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वत:च्या स्वार्थी सुखावर निखारा ठेवणे!
“तुका म्हणे व्हावी प्राणांसवें तुटी
नाहीं तर गोष्टी बोलूं नये”
प्राण द्यावयास तयार असाल तर वेदान्ताच्या वल्गना करा. दुस-यासाठी दोन दिडक्याच नव्हेत, तर सर्वस्व अर्पण करावयास तयार असणे म्हणजे अद्वैताची दीक्षा.
“जीवतळीं आंथरिती। जीव आपुला”
आपल्या प्राणाच्या पायघड्या दुस-यासाठी आनंदाने घालणारे, ते अद्वैताचे अधिकारी.